Health and WellnessOpinion

डब्ल्यूएचओ (WHO) एक डागाळलेली संस्था!

डब्ल्यूएचओने कोविडकाळातील भारतातील मृत्यूंचे अवास्तव व खोटे आकडे जाहीर करून भारताला जगात बदनाम केले आहे. यासाठी अतिशय मनमानी पद्धतीने माहिती गोळा केली आहे. याबद्दल भारत सरकारने डब्ल्यूएचओला जाब विचारला आहे. पण त्याचे उत्तर अजूनही आले नाही. महामारी आटोक्यात आणण्यासाठी भारताने उचललेली पावले आणि त्याचे सकारात्मक परिणाम सर्वश्रुत आहेतच. पुढारलेल्या अनेक देशांत मात्र ह्या साथीने हाहाकार उडविलेला पाहायला मिळाला. सध्या चीनमध्ये कोविडचे पुनरागमन होत आहे. पण डब्ल्यूएचओ संघटना चीनच्या दावणीला बांधली असल्याने चीनला दोष देत नाही. भारताशी चीनचे शत्रुत्व असल्याने ह्या संघटनेचा उपयोग करून भारताला शक्य तितके बदनाम करण्याचे जुनेच खेळ पुनः खेळले जात आहेत.

जागतिक आरोग्य संघटना, म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ही युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत असलेली एक संघटना आहे. सर्व जगाच्या स्वास्थ्याची आणि जागतिक प्रजेच्या आरोग्याची काळजी घेणे हे ह्या संघटनेचे कार्य आहे. त्यासाठी ह्या संस्थेला यूएनकडून प्रचंड निधी आणि उच्चशिक्षित आणि भरपूर पगार – तोही टॅक्स फ्री – घेणारे कर्मचारी मिळालेले आहेत. असे सर्व असूनही गेली काही वर्षे ह्या संघटनेचे काम नेहमीच वादग्रस्त पद्धतीने चालले आहे असे दिसते! हिचे सध्याचे प्रमुख डॉक्टर टेड्रॉस अधानोम घेब्रेसस हे आफ्रिकेतील इथियोपिया देशाचे नागरिक आहेत. हे गृहस्थ वैद्यकीय डॉक्टर नाहीत, तर ह्यांना सामाजिक आरोग्यशास्त्रातील पीएच.डी. मिळाली आहे. वैद्यकीय डॉक्टर नसलेली व्यक्ती डब्ल्यूएचओच्या प्रमुखपदी ह्यापूर्वी कधीही नेमलेली नाही! टेड्रॉस हे उत्तर इथियोपिया येथील ‘टिग्रे’ ह्या एका आदिवासी जमातीचे आहेत. ह्या जमातीच्या डाव्या दहशतवादी संघटनेने, ‘टिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट’ने इथियोपिया सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करून गृहयुद्ध चालविलेले आहे. ह्या संघटनेला चिनी सरकारची सक्रिय मदत असते. टेड्रॉस हे ह्या संघटनेशी संबंधित होते. इथूनच त्यांच्या आणि चिनी राज्यकर्त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली.

डब्ल्यूएचओमध्ये डायरेक्टर जनरल म्हणजे सर्वोच्च प्रमुख म्हणून 2017 साली पाच वर्षांसाठी ह्यांची नेमणूक झाली. ह्या निवडीमागे चीन देशाच्या राजकीय नेतृत्वाचा प्रचंड आधार आणि वशिला होता, असे म्हणतात. पुढे जेव्हा 2019 साली चीनमधील वुहान येथे कोविड-19चा उद्रेक झाला, त्या वेळेस टेड्रॉस ह्यांनी चीनच्या ह्या उपकाराची पुरेपूर परतफेड केली. ह्या रोगाचा उगम चीन येथे झाल्याकडे सर्व पुरावे स्पष्ट निर्देश करत असताना ह्या टेड्रॉस ह्यांनी मात्र चीनला संपूर्णपणे निर्दोष ठरविले! इतकेच नाही, तर चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ह्या संस्थेची तपासणी करण्यासदेखील नकार दिला आणि त्या संस्थेला आपल्या येथील पुरावे नष्ट करण्यास अवधी मिळवून दिला! त्यानंतर कोविड हा रोग हवेतून पसरतो हे सत्यदेखील मानण्यास ह्या टेड्रॉस ह्यांनी खूप दिवस नकार दिला होता, त्यामुळे चीन येथून येणार्‍या-जाणार्‍या विमानसेवा स्थगित करण्याची मागणीदेखील ह्यांनी नाकारली. त्या काळात सर्व जगात कोविडचा प्रसार निर्वेधपणे होऊ शकला! ह्यांच्या अशा मनमानीला कंटाळूनच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ह्यांनी डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून दिले जाणारे भरघोस अनुदान स्थगित केले होते!
 
 तर अशा ह्या टेड्रॉस महाशयांच्या डब्ल्यूएचओने नुकताच 5 मे रोजी एक अहवाल सादर केला आहे. जगातील मुख्य देशांमध्ये कोविडमुळे किती जास्तीचे मृत्यू झाले (म्हणजे इतर वेळी दर वर्षी होणार्‍या मृत्युसंख्येहून जास्तीचे जे मृत्यू असतील ते कोविडमुळे झाले असे मानण्यात येईल, म्हणून ‘जास्तीचे’ मृत्यू हा शब्दप्रयोग.) ह्याविषयीचा हा अहवाल आहे. त्यात भारताबद्दल अतिशय चुकीची आणि भारताच्या कोविडविरुद्ध चालविलेल्या यशस्वी लढ्याला अवमानित करणारी माहिती दिलेली आहे. ह्या अहवालात म्हटले आहे की सर्व जगात कोविडमुळे जास्तीचे सुमारे दीड कोटी लोक मरण पावले आणि त्यातील जवळजवळ एक तृतीयांश – म्हणजे सत्तेचाळीस लाखाहूनही अधिक मृत्यू भारतात झाले! भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हा आकडा 5.24 लाख आहे. अर्थात हा आकडा अजून बदलत आहे, कारण नवीन माहितीची त्यात सतत भर पडत असते. परंतु डब्ल्यूएचओचा आकडा ह्या आकड्याच्या जवळजवळ दहापट आहे! भारत सरकारने ह्यावरून डब्ल्यूएचओला जाब विचारला आहे. आपले केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण ह्यांनी सांगितले आहे की, ‘आम्ही डब्ल्यूएचओला गेल्या चार महिन्यांत दहाहून अधिक पत्रे पाठवून त्यांच्याकडून हा अहवाल करण्यासंबंधीचा खुलासा मागितला आहे. पण एकही पत्राला उत्तर आलेले नाही.’ डब्ल्यूएचओच्या मते त्यांनी भारतातून काही वेबसाइट्सवरून आणि मीडिया रिपोर्ट्सवरून हा आकडा घेतलेला आहे. भारतात सुमारे तीन लाखाहूनही अधिक सरकारी कर्मचारी जन्म-मृत्यूच्या नोंदणीत गुंतलेले असतात. त्यांनी गोळा केलेल्या आकडेवारीनुसारच भारत सरकार आपले आकडे जाहीर करते. डब्ल्यूएचओने कुठेही ह्या आकड्यांचा वापर केलेला नाही. त्याशिवाय त्यांनी आपल्या येथील 17 निरनिराळ्या राज्यांकडून घेतलेले आकडे, वर म्हटल्याप्रमाणे, ‘काही वेबसाइट्सवरून आणि मीडिया रिपोर्ट्सवरून’ घेऊन, त्यावर कॉम्प्युटर प्रोग्रॅम आणि सांख्यिकीय प्रारूप – म्हणजेच ीींरींळीींळलरश्र मॉडेलिंग करून हा आकडा काढलेला आहे! विशेष म्हणजे ह्या मॉडेलिंग करून काढलेल्या अहवालात चीन देशातील जास्तीच्या मृत्यूंची संख्या उणे 2 (-2) अशी दाखविलेली आहे! म्हणजे चीनचे किती कौतुक करायचे ह्याची सर्व मर्यादा पार केलेली आहे. हा आकडा खरा मानायचा, तर चीनमध्ये दोन जणांचा कोविडनंतर पुनर्जन्म झाला की काय? तरी बरे, आता समोर येत आहे की चीनमध्ये कोविडचा उद्रेक प्रचंड वाढलेला आहे आणि हे सगळे रुग्ण ‘चिनी’ लस घेऊन ‘सुरक्षित’ झालेले लोक होते!

ह्या प्रकारे अतिशय उथळ पद्धतीने केलेल्या अहवालाबद्दल भारत सरकारने तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे-
मॉडेलिंग करून अहवाल करण्याचा हा जो प्रकार आहे, हा अशा देशांच्या बाबतीत वापरला जातो, ज्या देशात पुरेशी आरोग्यसेवा नाही आणि डेटा नोंदण्याची काही परिणामकारक यंत्रणा नाही. भारतात चांगली आरोग्यसेवा आहे आणि डेटा नोंदण्याचीदेखील उत्तम यंत्रणा असताना डब्ल्यूएचओला ही मॉडेलिंग पद्धत वापरण्याचे काहीच कारण नव्हते.
 
 
वर म्हटल्याप्रमाणे डब्ल्यूएचओने ‘काही वेबसाइट्सवरून आणि मीडिया रिपोर्ट्सवरून’ सतरा राज्यांकडून हा डेटा घेण्याचे काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही!
 
ह्या सर्व अहवालासाठी जो मूळ महितीस्रोत आहे, तो म्हणजे, डब्ल्यूएचओच्याच म्हणण्याप्रमाणे ‘जागतिक आरोग्य अंदाज 2019’ असा एक अहवाल आहे, जो फक्त एक ‘अंदाज’ आहे, निश्चित माहितीचा स्रोत नाही!

ह्याप्रमाणे एका अतिशय मनमानी पद्धतीने माहिती गोळा करून तिच्या योगाने भारताने कोविड-19शी केलेल्या लढ्याचा विपर्यास आणि अवमान केल्याबद्दल भारत सरकारने डब्ल्यूएचओला जाब विचारला आहे आणि असा जाब विचारायलाच हवा! खरे म्हणजे डब्ल्यूएचओने आणि इतर पाश्चात्त्य विचारवंतांनी कोविड-19 साथीच्या सुरुवातीलाच ‘भारतात ह्या साथीने कोट्यवधी लोक मरण पावतील आणि सर्व देशात मृत्यूचे थैमान दिसेल’ असे भयानक अंदाज व्यक्त केले होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही! आपल्या येथे मोदी सरकारने त्वरित योग्य पावले उचलली व देशव्यापी ‘लॉकडाउन’ अमलात आणून त्यायोगे ही साथ लवकरच आटोक्यात आणली. त्याशिवाय ह्या साथीच्या निवारणासाठी उत्तम प्रकारे लस उत्पादन सुरू केले. ह्या प्रचंड देशात आजपर्यंत 97 टक्के प्रजेला लसीचा किमान एक डोस (विनामूल्य) नक्की देऊन झाला आहे आणि अजूनसुद्धा लसीकरण व्यवस्थित रितीने सुरू आहे. अगदी ‘बूस्टर’ डोसदेखील योग्य गतीने दिले जात आहेत. इतकेच नाही, तर भारताने इतर अनेक देशांनादेखील अशी लस पुरविली आहे, मदतीच्या स्वरूपात. ह्याउलट, पुढारलेल्या अनेक देशांत ह्या साथीने हाहाकार उडविलेला पाहायला मिळाला. अनेक देश अजूनसुद्धा ह्यातून बाहेर आलेले नाहीत आणि सध्या चाचपडत आहेत. टेड्रॉस ह्यांचा मित्र देश चीन येथे सध्या कोविडचे पुनरागमन होत आहे आणि बीजिंग वा शांघायसकट अनेक शहरांत अत्यंत कठोर उपाय योजून लॉकडाउन लावले जात आहेत. ह्याच चीन देशाला कोविडसाठी जबाबदार ठरविण्याचीदेखील हिंमत हे डब्ल्यूएचओचे अधिकारी अजूनही दाखवू शकलेले नाहीत. ह्या सर्व प्रकरणावरून आपल्या एक लक्षात येईल की डब्ल्यूएचओ ही संघटना चीनने आपल्या दावणीला बांधली आहे आणि भारताशी चीनचे शत्रुत्व असल्याने ह्या संघटनेचा उपयोग करून भारताला शक्य तितके बदनाम करण्याचे जुनेच खेळ पुनः खेळले जात आहेत. त्या प्रकारात नेहमीचेच यशस्वी कलाकार म्हणजे ‘न्यूयॉर्क टाइम्स’सारखी भारतद्वेष्टी माध्यमेदेखील सामील झालेली आहेतच. अपेक्षेप्रमाणेच काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांनी ‘नरेंद्र मोदी ह्यांचे केंद्र सरकार खोटे बोलत आहे’ असे बाष्कळ विधान केले आहेच! परंतु ह्या सर्व प्रकारामुळे डब्ल्यूएचओची आधीच कमी झालेली विश्वासार्हता पूर्णपणे लयास गेलेली आहे. टेड्रॉस ह्यांची मुदत आता ह्या जुलै महिन्यात संपत आहे. त्यानंतर डब्ल्यूएचओमध्ये काही सकारात्मक परिवर्तन घडेल तर बरे. पण इथे आपण मात्र मनाशी एक खूणगाठ बाळगली पाहिजे की डब्ल्यूएचओ, यूनो आणि पाश्चात्त्य देशांनी चालविलेल्या ह्यासारख्या आणि त्यांचा प्रभाव असणार्‍या संघटना आपल्या देशाबाबत कायमच एक पूर्वग्रह मनात ठेवून असतात, त्यामुळे त्यांनी प्रसृत केलेल्या अहवाल आदीवर आपण किती विश्वास ठेवायचा आणि त्यांना किती महत्त्व द्यायचे, हे एकदा नक्की केले पाहिजे!

चंद्रशेखर नेने

सौजन्य : सा. विवेक

Back to top button