ECONOMYNews

आत्मनिर्भर भारताचे बळ “प्रचंड”

भारतीय हवाई दलात(indian air force) सोमवारी स्वदेशी बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर “प्रचंड” (prachand) दाखल झाल्याने आता हवाई दलाची ताकद आणखीनच वाढली आहे. ‘प्रचंड’ असे या हेलिकॉप्टरचे नाव असून राजस्थानमधील जोधपूर येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या १० हेलिकॉप्टरची तुकडी भारतीय हवाई दलात दाखल झाली.५ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी या आधीच थलसेनेत दाखल झाली आहे.

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या लढाऊ हेलिकॉप्टरचे पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशीच वायुसेनेत लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाल्याने लष्कराची ताकद आणखीन वाढणार आहे. उंच डोंगररांगांमध्ये शत्रूशी दोन हात करणे आता हवाई दल आणि लष्कराला शक्य होणार आहे. सुमारे ३८८५ कोटी रुपये खर्च करून १५ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तयार केली आहेत. बंगळुरूहून तीन हेलिकॉप्टर जोधपूरला पोहोचली असून उर्वरित सात लवकरच हवाई दलात दाखल होतील. यासाठी हवाई दलाच्या १५ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाला उचं पर्वतरांगांमध्ये लढणे सोपे व्हावे, या हेतूने या स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.

‘अनेक दिवसांपासून या हेलिकॉप्टरची प्रतिक्षा होती. १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धातही या हेलिकॉप्टरची उणीव जाणवली. ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर हे दोन दशके करण्यात आलेल्या संशोधनातून निर्माण झाले आहे. शत्रूला बेसावध करून त्याच्यावर हल्ला करण्यासाठी हे हेलिकॉप्टर सक्षम आहे. मोठ्या प्रमाणात दारूगोळा घेऊन ते तत्काळ घटनास्थळी दाखल होऊ शकते.’ – राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री.

प्रचंड हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) केली आहे.अन्य लढाऊ हेलिकॉप्टरच्या तुलनेत ‘प्रचंड’ हलक्या वजनाचे आहे. त्याचे वजन ५.८ टन एवढे असून, अनेक हत्यांरासह त्याचे परीक्षण करण्यात आले आहे.

ताशी २७० किलोमीटर वेग असून लांबी ५१.१ फूट आणि उंची १५.५ फूट आहे.

प्रचंड हेलिकॉप्टरमध्ये ‘स्टेल्थ’ नावाची आधुनिक प्रणाली आहे. त्या माध्यमातून शत्रूच्या रडारवरदेखील हे हेलिकॉप्टर दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी हल्ला करण्याची क्षमताही या हेलिकॉप्टरमध्ये आहे. प्रचंड हेलिकॉप्टर १६,४०० फूट उंचीवरून सुद्धा शत्रूवर हल्ला करू शकते.

एलसीएच हे हलके असल्याने त्याचा वेग जास्त आहे. कुठल्याही प्रकारच्या हवामानात हे हेलिकॉप्टर लढाऊ, शोध आणि बचावकार्य तसेच शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश करण्यासाठी सक्षम आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठीही या हेलिकॉप्टरचा वापर केला जाऊ शकतो.

नवीन जागतिक परिस्थितीत, जेव्हा आपण स्वावलंबी होऊ तेव्हाच आपण जागतिक शक्तींशी स्पर्धा करू शकू, आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी इतर देशांवरील आपले अवलंबित्व कमी होईल.स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत सातत्याने स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे आणि जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. आणि भारतामध्ये अनेक सामाजिक आणि आर्थिक बदल झाले आहेत आणि या कारणास्तव भारताची अर्थव्यवस्था आज आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

संरक्षण,शेतीपासून अंतराळापर्यंत, दळणवळण क्रांतीपासून ट्रेन बनवण्यापर्यंत कोणत्याही क्षेत्रात असो, भारत प्रत्येक कामात स्वावलंबनाकडे वेगाने वाटचाल करत आहे.

Back to top button