CultureNewsSpecial Day

स्वामी विवेकानंद यांचे गितेविषयी काय मत होते? अपप्रचार आणि सत्य..

srimad bhagavad gita jayanti swami vivekananda

गीता आणि फुटबॉल याविषयी विवेकानंदांचे अपूर्ण वाक्य वेळोवेळी लोकांना जाणीवपूर्वक सांगितले जाते, त्या वाक्यामागील संदर्भ सांगितलेला नाही, त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात.

स्वामी विवेकानंदांनी गीतेबाबत वेळोवेळी अनेक मते व्यक्त केली आहेत. जर आपण सूक्ष्मपणे स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येते की त्यांनी त्यांच्या अनेक कृतीमध्ये सुद्धा गीता आचरणात आणली होती. असे असूनही गीता आणि फुटबॉल याविषयी विवेकानंदांचे अपूर्ण वाक्य वेळोवेळी लोकांना जाणीवपूर्वक सांगितले जाते, त्या वाक्यामागील संदर्भ सांगितलेला नाही, त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. हा गैरसमज टाळण्यासाठी आपण त्यांचे मत जाणून घेऊया, आणि गीतेबद्दलचे त्यांचे मत पाहू या. फक्त जाणून चालणार नाही त्यावर चिंतन करावे लागेल.

स्वामी विवेकानंद म्हणतात, माझा तुम्हाला उपदेश आहे. गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल. हे धाडसाचे शब्द आहेत; पण तुमच्यावर माझे प्रेम असल्याने मी हे तुम्हाला सांगितले आहे. चूक कोठे होत आहे हे मला दिसते. मला थोडाफार अनुभव आला आहे. तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल. तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा व अपार सामर्थ्य यांचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल. तुमचे शरीर मजबूत होऊन आपण ‘मनुष्य‘ आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल.

स्वामी विवेकानंदांच्या फुटबॉल आणि गीता विचाराच्या प्रकरणावर थेट असा अपप्रचार करतात की स्वामी विवेकानंदांनी गीता नाकारली. वरील स्वामी विवेकानंदांचे वाक्य स्पष्ट आणि पूर्ण आहे ते यात कुठेही गीता नाकारत नाही. नेमक ते काय सांगू पाहत आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, फुटबॉल हा शब्द एक रूपकात्मक शब्द आहे, ते यातून बलोपासणा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ज्या गांडीवधारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण यांनी गीता सांगितली, तो बलवान होता, तो बलाचा उपासक होता.

गीतेतील कर्मयोग आचरणात आणण्यासाठी सामर्थ्य हवे, बल हवे, गीता सांगण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला माध्यम बनवले असले तरी ती गीता आपल्याला सर्वसामान्य माणसाला सांगितली आहे. दुर्जन शक्ती सोबत लढणारा अर्जुनासारखा समाज कृष्णाला घडवायचा आहे. विवेकानंदांना हेच अभिप्रेत आहे की तुम्ही बलवान व्हा बलोपसक व्हा. मग तुम्हाला गीता अधिक चांगली कळेल त्या विराटरुपी कृष्णाची प्रतिमा तुम्हाला आकलन होइल.

स्वामी विवेकानंदांचे याव्यतिरिक्त गीतेवर अनेक विचार आहेत ज्यातून त्यांच्या मनात गितेविषयी परम आदर होता, हे समजून येतं.

  • गीतेच्या द्वारे श्रीकृष्णांनी दिलेल्या शिकवणुकीला उभ्या जगात तोड नाही. इतकी थोर, इतकी उदात्त शिकवण जगात आणखी दुसरी नाही. ज्याने त्या अद्भुत काव्याची रचना केली तो, ज्यांच्या जीवनाने अखिल जगाला संजीवन लाभत असते तशा विरळ महात्म्यांपैकी एक होय. ज्याने गीता लिहिली त्याच्यासारखी बुद्धी मानवजातीला फिरून कधीही बघावयास मिळायची नाही.
  • गीतेला वेदान्त तत्त्वज्ञानावरील सर्वोत्कृष्ट भाष्य म्हणता येईल. विस्मयाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष रणक्षेत्रावर ती उपदेशिली गेली आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ऐन रणकंदनास तोंड लागतेवेळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचे तत्त्वज्ञान अर्जुनाला सांगितले आहे. गीतेच्या पानापानातून कोणते एकच तत्त्व, कोणता एकच संदेश अगदी ठसठशीतपणे मनावर बिंबत असेल तर तो म्हणजे प्रबल कर्मशीलतेचा. परंतु या गीतोक्त कर्मशीलतेचे एक वैशिष्ट्य आहे. ते हे की, त्या प्रबल कर्मशीलतेच्या अंतर्यामी एक विराट, अनंत शांती विराजमान आहे. प्रचंड कर्मशीलता, आणि तिच्याच अंतरंगी विशाल शांतभाव हेच कर्माचे रहस्य होय. ह्या असल्या अवस्थेचा लाभ करून घेणे हेच वेदान्ताचे लक्ष्य होय.

भगवद्गीता हा वेदान्तावरील सर्वांत अधिकृत आणि प्रमाणभूत ग्रंथ होय.

स्वामी विवेकानंद यांच्या मते गीता हा आचरणात आणायचा विषय आहे, नुसता वाचून विसरण्याचा विषय नाही, हा त्यांच्यासाठी श्रीकृष्णाची भक्ती प्रकट करण्याचा विषय आहे. स्वामी विवेकानंदांच्या काळात मोठ्याप्रमाणवर तरुण पिढी भोगवादच्या मागे धावत होती आणि त्यापेक्षा अधिक आज धावत आहे. आज तरुण पिढी वेगवेगळ्या मानसिक तणावांचे शिकार होत आहे. बलोपसाना, योग, प्राणायाम यांच्याशी त्यांचा दूरपर्यंत संबंध नाही. थोडं चालल्यावर त्यांना दम लागतो, निराशा वाढत आहे, यांचे चेहरे निस्तेज झाले आहे, आत्महत्या वाढत आहे. अश्यावेळी बलोपसना करावी लागेल, गीतेचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा कुठेतरी खंबीर मन तयार होईल, जीवनाला अर्थ प्राप्त होईल, जीवनात उत्साह येईल, विजिगीषू वृती निर्माण होईल.

लेखक – दीपक राठोड

साभार :- विश्व संवाद केंद्र देवगिरी..

Back to top button