HinduismTravelकोकण प्रान्त

मुंबईतील अपरिचित देवींची श्रद्धास्थाने…

नवरात्र हा आसुरी शक्तीचा नाश करण्यासाठी, लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी आणि वातावरण उल्हासित करण्यासाठी साजरा केला जाणारा उत्सव. सर्वत्र ९ दिवस आनंद आणि सकारात्मकतेचा उत्साह यामुळे वातावरणात आपल्याला पाहायला मिळेल.

महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीत ९ दिवस मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्त दुरून या क्षेत्रांना भेटी देत असतात. मात्र मुंबईतील लोकांना कामातील व्यस्थतेमुळे तिथे जाऊन देवींचे दर्शन घेणे अवघड होते. याच मुंबईकरांसाठी आज प्रसिद्धीच्या वलयापासून दूर असणाऱ्या मात्र शेकडो वर्षे सामाजिक – सांस्कृतिक – ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवलेल्या काही देवींच्या मंदिरांची नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या लेखाच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया…

वाळकेश्वरची श्री गुंडी देवी

राजभवनाच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डावीकडे खाली समुद्राच्या दिशेने उतरत जाणाऱ्या लहानशा रस्त्याच्या अगदी टोकावर श्री गुंडी देवीचे लहानसे देवालय आहे. समोर तिन्ही बाजूने समुद्र, त्याच्या दगडावर आपटणाऱ्या फेसाळ लाटा, भणाणता वारा, मागे राजभवनाची भव्य वास्तू, टेकडीवरची घनदाट झाडी, सहज दिसणारे मोरांसहितचे विविध पक्षी असे हे अत्यंत रमणीय स्थान. राजभवनाच्या परिसरात हे देवस्थान असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव एरवी इथे जायला मिळत नाही. मात्र गुरुपौर्णिमेनंतर या देवीच्या वार्षिक जत्रेच्या दिवशी मात्र या पवित्र आणि रमणीय स्थळाचे दर्शन कुणालाही घेता येते..!! छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि राघोबादादा पेशवे या इतिहास गाजवलेल्या महापुरूषांनी श्री गुंडीला भेट दिल्याच्या कथा सांगितल्या जातात. या देवीची पुजा मुख्यतः कोळी समाज करतो, असे राजभवनातील जुने लोक सांगतात.

जोगेश्वरीची देवी

पाचव्या शतकाच्या सुमारास जोगेश्वरी येथील गुंफालेण्यात जोगेश्वरी देवीची स्थापना झाली. असं म्हणतात की, वसईतील पोर्तुगीज आक्रमणानंतर या देवीला वाचविण्यासाठी गुहेत ती दडवली गेली होती. हनुमान जयंती, महाशि‍वरात्र आणि अश्विनी नवरात्र असे वार्षिक उत्सव इथे होतात. येथील प्रवेशद्वारी दोन दगडी दीपमाळा आहेत. पूर्व-पश्चिम अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. विशेष म्हणजे या सभा मंडपाच्या मध्यभागी देवीचा गाभारा आहे. अतिक्रमणामुळे गुंफेवरील टेकडीवर वसाहती झाल्यामुळे हे देवालय काहीसे घुसमटलेल्या अवस्थेत आहे. मात्र पूजा-अर्चा इथे नित्य होत असते. मळिवली येथील एकवीरा देवीचेच हे मूळ रूप मानले जाते. अनेक पाठारे प्रभू, कायस्थ प्रभू यांची ही कुलदेवता आहे.

गोलफादेवी

गोलफादेवी हे वरळी येथे उंच टेकडीवर वसलेले कोळी बांधवांचे मंदिर. इथे अजूनही मंदिरात देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. इथे नवरात्रीत पहिल्या दिवशी देवीची घटस्थापना होते. सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सर्व भक्त गणांसाठी हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. श्री गोलफादेवीची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला, म्हणजे शाकभरी पौर्णिमेला भरते. साधारणतः जानेवारी महिन्यात ही तिथी येते. यात्रेच्या आदल्या रात्री मंदिरात सामुदायिक अभिषेक आणि हरिपाठ केला जातो. यात्रेच्या दिवशी हजारो भक्तगण नवस फेडण्यासाठी इथे येत असतात.

बारादेव

मुंबई महानगरातील परळगावात बाराव्या शतकातील पुरातन चंडिका देवी आणि वाघेश्वर देवीच्या शेजारी सहाव्या शतकातील बारादेव या मूर्तीचे दर्शन केवळ नवरात्रोवामध्ये भक्तांसाठी खुले केले जाते. चंडिका देवी मंदिराच्या मागच्या आवारात बाराव्या शतकातील वीरगळ आहे. ही अकरा फुटांची दगडाची भव्य मूर्ती आहे. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात परळ ते शिवडी रस्त्याचे काम चालू असताना बारदेवाची ही मूर्ती मिळाली आणि तेव्हापासून परळ गावातंच तिचे स्थान आहे. एकसंध दगडात कोरलेली मूर्ती ही बारादेव किंवा बारादेवी मूर्ती या नावाने ओळखली जाते. एकाच मूर्तीमध्ये बारा प्रतिमा पेरलेल्या असल्यामुळे तिला बारदेवी असे नाव देण्यात आल्याचे, तेथील नागरिक सांगतात. बारादेवच्या एकाश्म आणि ११ फुटी मूर्तीमध्ये शंकराच्या बारा अवतारांचे दर्शन घडते.

वैकुंठमाता

मुंबादेवीप्रमाणेच माझगाव जवळच्या डोंगरावरची वैकुंठमाता मुंबईची ग्रामदेवता मानली जाते. समोर अथांग समुद्र आणि तुलनेने शांत परिसर…असे म्हणतात की, १७३७ मध्ये वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यावर पेशवे सेनापती चिमाजी आप्पा या देवीच्या दर्शनाला आले होते आणि त्यांनीच या देवळाचा जीर्णोद्धार केला होता.

गावदेवी दुर्गामाता मंदिर

गिल्बर्ट हिल पर्वत हे एक ऐतिहासिक वास्तू शिल्प स्मारक आहे. लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखी लवामुळे त्याची निर्मिती झाली होती. या गिल्बर्ट टेकडीच्या माथ्यावर ४०० वर्षे जुने गावदेवी दुर्गामाता मंदिर आहे. १८५ पायऱ्या चढल्यावर हे सुंदर मंदिर आपल्याला पाहता येते. या गावातील धनगर समाज, वडारी समाज, कोळी समाजाच्या लोकांची गावदेवीवर अपार श्रद्धा आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून लोकांची या देवीवर श्रद्धा आहे. त्यामुळे येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते.

Back to top button