पाऊले चालती..

आता सगळ्यांनाच वारीचे वेध लागले आहेत. लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पायी पंढरीच्या दिशेने निघालेले वारकरी मोठ्या उत्साहात, मुखाने अभंग म्हणत यथावकाश मुक्कामी पोहोचतील. तसे पाहायला गेले तर ज्येष्ठापासूनच पंढरीच्या वारीसंबंधीच्या वार्ता येऊ लागतात. नियोजन, वारीचे वेळापत्रक, व्यवस्था, सुरक्षा आदींची चर्चा होते. कोणत्या दिंडीतून पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायचे, याचा विचार आता लाखो वारकरी करतात. लोकमान्य टिळकांनी राजकीय परिस्थितीमुळे लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव, शिवजन्मोत्सव सुरू केले. पण त्याआधी समाज एकत्र आणण्याचे कार्य वारकरी पंथाने आरंभले होते, हे दरवेळी प्रकषनि समोर येते.
संत ज्ञानदेवांच्या आधीपासून वारी प्रचलित होती, असे सांगितले जाते. या प्रथेता बाळसे आले ते मात्र माउलीच्या प्रेरणेने, ‘चला जाऊ पंढरीसी, भेटू विठ्ठल रखुमाईसी ही आस उरी धरून ‘पाऊले चालती पंढरीची वाट… अशा भावनेने मंडळी कामधाम, संसार विसरून प्रतिआषाढमासी पंढरीकडे निघतात. ऊन-पाऊस, दुष्काळ या कशाचीही तमा न बाळगता वारीला जाण्याचे जणू व्रत मानणारी ही वारकरी मंडळी आहेत. प्रारंभी मोजकी मंडळी वारी करीत असावीत. हळूहळू त्यांची संख्या एवढी वाढली की, जणू पूर येऊन नदी दुथडी वाहू लागली.
आता तर पौर्णिमेला सागराला उधाण यावे, असे वारीचे रूप्प झाले आहे. ठिकठिकाणी बघितले तर हेच दृश्य समोर दिसते. संत सेनामहाराज म्हणतात, ‘वाट धरिता पंढरीची, चिंता हरि संसाराची अशीच भावना असते वारकऱ्यांची. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, असे प्रत्येक वारकरी मोठ्या अभिमानाने सांगत असतो.

वारीची प्रथा सुरू होण्याला केवळ श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन हे कारण होते काय, असा विचार मनाला चाटून जातो. त्या वेळची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मुसलमानी आक्रमक महाराष्ट्रापर्यंत येऊन धडकले होते. त्यामुळेब सुलतानी संकट घोंघावत होते. अशा वेळी समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा असण्याची गरज होती. एकमेकांना साह्य करण्याची निकड होती. सामान्यांकडून आक्रमकांशी दोन हात करण्याची अपेक्षा नसली, तरी सर्वांमध्ये एकोपा असण्याची गरज मात्र प्रामुख्याने समोर येत होती. त्यावेळी महाराष्ट्रात समाजातील विचारवंत असणारी सगळी संत मंडळी होती, त्यांनीच श्रीविठ्ठलाची वारी सुरू केली होती.
धार्मिकदृष्ट्या तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास दिसते की, प्रत्येक घटकांचे वेगवेगळे दैवत कुलदैवत होते. शिवाय शैव आणि वैष्णवांचे वेगळे गट होतेच. या सगळ्यांना एकत्र आणण्याची नितांत गरज होती. संत ज्ञानेश्वरादी काही जण नाथपंथी होते तर कोणी दत्तात्रेयाचे उपासक होते. आणखी कोणाचे ग्रामदैवत वेगळे होते. तेव्हा आपापले दैवत कुटुंबापुरते मर्यादित ठेवून एका सामुदायिक दैवताने समाजाला एकत्र बांधून ठेवणे ही तेव्हाची गरज होती. श्रीविठ्ठल या सर्वांना बांधून ठेवण्यास सक्षम ठरले आणि वारकरी पंथ उदयास आला. मग सर्वांना झेपेल असे नित्यनियम ठरले. आषाढी-कार्तिकीचे उपवास, गळधात तुळशीची माळ, कपाळावर गोपिचंदनाचा टिळा आणि पंढरीची वारी यांचे पालन करणे असे सगळे नियम ठरले. हे कोणी ठरवले हे सांगता येत नाही, पण सगळे वारकरी आजही ते पाळताना दिसतात.
ऐतिहासिक दृष्टीने पाहता ही एक चळवळच होती. कारण आधी उल्लेख केल्याप्रमाणे चार वर्णात आणि अठरापगड जातीमध्ये विखुरलेला समाज एकत्र आणणे हे तसे दुष्कर कार्य होते. तत्कालीन धुरिणांनी ते यशस्वीपणे केले. त्यासाठी ‘विठ्ठला’ला आळवले गेले आणि गोपाळांचा मेळा अस्तित्वात आला. त्यात कोण कोण समाविष्ट झाले हे बघितले, या मांदियाळीवर दृष्टिक्षेप टाकला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. संत निवृत्तिनाथादी भावंडे, संत मुक्ताई, चांगदेव, संत नामदेव, शिंपी, दासी जनाबाई, परिसा भगवत, खेचरी विद्याप्राप्त विसोबा, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे… हे सांगणारे गोरा कुंभार, श्रीविठ्ठलाकडे आकर्षिले जाणारे शैवपंथी नरहरी सोनार, सावता माळी, केशकर्तन करणारे सेना आणि जातीने महार असणारे चोखा मेळा आणि त्यांचे कुटुंबीयः पाशिवाय दासी जनाबाई, कान्होपात्रा, सोपराबाई, निर्मळाबाई इत्यादी सर्व संतत्व प्राप्त झालेली मंडळी आपापले आराध्य दैवत असतानाही श्रीविठ्ठलाच्या उपासनेसाठी एकत्र येण्याचे प्रयोजन काय असावे, याचा विचार क्वचितच केलेला दिसतो.

अनेक दिवस वारीच्या निमित्ताने हे सर्व आपापल्या अनुयायांसमवेत वारीसाठी सज्ज असत. आठ-पंधरा दिवस एकत्र असत. त्यामुळे एकत्र भजन, एकत्र भोजन असे वारीचे स्वरूप पूर्वीपासूनच राहिलेले आहे. यावेळी विचारांची देवाणघेवाण, सुखदुःखाचे आकलन होऊन परिस्थितीची जाणीव होणे शक्य होते. त्यामुळेच जातिपातीत विखुरलेला समाज एकत्र येणे ही मुस्तिमांचे आक्रमण होत असतानाची समाजाची मुख्य गरज असत्याची बाब प्रकषनि समोर येते. त्या वेळच्या सरदार, लढवय्ये मंडळींकडून क्षात्रतेजाची अपेक्षा होती तर त्या काळचा समाज एकत्र असणे आवश्यक होते. म्हणून विठ्ठल हे एकच सर्व जातीतील लोकांचे दैवत ठरले. (विठ्ठलावर अभंग रचले गेले तेवढे इतर कोणत्याही देवतेसंबंधी रचले गेलेले नाहीत.) या मंडळींनी संत नामदेव आणि ज्ञानेश्वरादींच्या समवेत राजस्थानमार्गे पंजाबपर्यंत वारकरी पंथाचे भगवे झेंडे घेऊन जाण्यामागील एक कारण उत्तरेकडील अनेक राज्यातील राजकीय परिस्थिती आजमावणे हेही असावे. त्यामागेही भारतवर्षातील सर्व समाज एकत्र राहावा, हे धोरण असावे असे वाटते.
मला वाटते की, राजकीय क्षेत्रात अराजक माजले असताना समाज स्थिर आणि एक प्रकारे संघटित असण्याची गरज लक्षात घेऊनच वारी सुरू झाली असावी. पुढे संत एकनाथांच्या काळीही मुसलमानी सत्तेचा जुलूम सुरूच होता. श्राद्धाच्या दिवशीचे जेवण भुकेल्या महारांना वाढल्याचा प्रसंग आपणास माहिती आहे. पण पाचा आशय समाजातील आपपरभाव नाहीसा करणे असाच असावा असे वाटते. संत एकनाथांच्या काळीही सामाजिक स्थिती किती भयानक होती, याचे प्रत्यंतर एका घटनेवरून आपणास कळते.
संत तुकाराम महाराजांचा काळ म्हणजे वारकरी पंथाचा भक्तिरसात न्हाऊन निघणारा, रंजल्या-गांजलेल्यांना आपलेसे मानणारा काळ होता. म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात, ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस त्याच वेळी समर्थ रामदास ‘वन्ही तो चेतवा रे, चेतविता चेततों अशी आरोळी देतात. समाजाने निराश, उदास होऊ नये तर सामर्थ्यपूर्ण चळवळ करावी, हा विचार यामागे दिसतो. त्यातच आता सकलजनांचा आधार असलेल्या धर्मपालक शिवाजी महाराजांचे छत्र हिंदू समाजाला लाभले होते. ‘मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे त्यांचे धोरण होते. जिहादी मुसलमानांनी मोडलेली क्षेत्रे पुन्हा बांधली जाण्याचा हा काळ होता. हे सगळेच अभ्यासण्याजोगे आहे. ‘राईज ऑफ मराठा पावर’ या ग्रंथाचे लेखक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वारकरी पंथाचे मर्म जाणले होते, हे येथे प्रकर्षाने दिसते.
२० व्या-२१ व्या शतकात मात्र हे स्वरूप बदलून गेल्याचे दिसते. आता वारीचा अभ्यास करणारे, तिच्यातील शिस्त, वक्तशीरपणा यांचा गौरव, त्याचे आलोचन करणारे वारीत असतात तसेच हवशे-नवशेही असतात. अर्थातच यामुळे वारीचे अर्थकारणही बदलले. राजकीय परिस्थितीही बदलली. गावोगावी वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था केली जाऊ लागली. त्यांच्या राहण्यासाठी सोयी केल्या जाऊ लागल्या. मात्र, यात प्रत्येक दिंडीतील वारकरी आपापल्यापुरते पाहू लागला. विशेष म्हणजे इकडे लोककल्याणकारी शासनाचेही लक्ष गेले. स्वच्छता, आवश्यक त्या गरजा भागवण्याची निकड लक्षात घेणे त्यांना आवश्यक वाटू लागले. आता आवश्यकता असेल तेथे औषधे, डॉक्टर्स यांची पोजना केली जाते आहे. वारी मार्गावर गावोगावची मंडळी वारकऱ्यांची सेवाभावाने दखल घेत आहेत. एकूणच वारीचे स्वरूप बदलले आहे. मात्र वारक-यांच्या मनात चला जाऊ पंढरीसी, भेटू विठ्ठल रखुमाईसी’ हा भाव अढळ आहे. पंढरपुरी पोचण्याची त्यांना आस असते. कारण विठू ती पालवीत असतो, असा त्यांचा विश्वास असतो आणि त्याच्या हाकेला साद देत वारकरी पायी चालत असतो.
लेखक:- डॉ. गो. बं. देगलुरकर (ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ)
