अमर हुतात्मा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी

5 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या संसदेने काश्मीरला लागू असलेले कलम 370 रद्द केले. हा ऐतिहासिक निर्णय होता.एक देश मे दो प्रधान,दो विधान,दो निशान, नही चलेंगे, नही चलेंगे अशी घोषणा देत ज्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये सत्याग्रह केला व आपले बलिदान दिले त्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाचे व लाखो आंदोलकांच्या त्यागाचे या दिवशी सार्थक झाले.
15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा काश्मीरचे राजा हरिसिंह हे होते. व त्यांनी पाकिस्तानात सामील व्हायचे की भारतात सामील व्हायचे याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता.याचा फायदा घेऊन पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. राजा हरिसिंहांनी भारत सरकारकडे लष्करी मदतीची मागणी केली.परंतु राजा हरिसिंह जोपर्यंत भारतात सामील होण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण लष्करी मदत करू शकणार नाही अशी भूमिका भारत सरकार ने घेतलेली होती.शेवटी महाराजा हरि सिंह यांनी भारतामध्ये काश्मीरचे विलीनीकरण करण्या च्या करारावर स्वाक्षरी केली.
काश्मीर विलीनीकरण कराराच्या वेळी काश्मीरला विशेष दर्जा असावा ज्यामध्ये काश्मीरला वेगळा ध्वज, संविधान आणि तिथल्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान संबोधले जावे अशी शेख अब्दुल्लांची मागणी होती. भारताला केवळ संरक्षण, परराष्ट्र व दळणवळण यासंबंधी कायदे करण्याचा सीमित अधिकार यामुळे राहणार होता. तर उर्वरित सर्व अधिकार काश्मीर कडेच राहणार होते. या विशेष दर्जाला डॉक्टर आंबेडकरांसहित अनेक राष्ट्रवादी भावनेच्या नेत्यांचा विरोध होता.
21 ऑक्टोबर 1951 रोजी भारतीय जनसंघाची स्थापना झाली. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे जन संघाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी सरकारच्या काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या निर्णयाला विरोध केला व त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की एक देश मे दो प्रधान,दो विधान,दो निशान, नही चलेंगे, नही चलेंगे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये त्यांनी देशव्यापी आंदोलन सुरू केले याचाच एक भाग म्हणून त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये जाण्याचा निर्णय घेतला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ही भूमिका पंडित नेहरू यांना आवडलेली नव्हती.
सत्याग्रह व अटक
पठाणकोट व अमृतसर मार्गे ते माधवपूर नावाच्या चौकीवर पोचले जेथून जम्मू कश्मीर राज्याची हद्द सुरू होत होती.त्या चौकीवर त्यांना थांबवण्यात आले व त्यांना अटक करण्याचा सरकारी आदेश दाखविण्यात आला. त्यावेळेस टेकचंदआणि गुरुदत्त नावाच्या दोन सहकाऱ्यांना घेऊन श्यामाप्रसाद जींनी स्वतःला अटक करवून घेतली. व इतर साथीदारांना त्यांनी भारतात परत पाठवले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते. त्यांना परत पाठवताना श्यामाप्रसाद जी म्हणाले की अटल जी तुम्ही येथून परत जा व देशाला सांगा की जम्मू-काश्मीरला भारताचे अभिन्न अंग बनविण्यासाठी मी सत्याग्रह करीत स्वतःला अटक करवून घेतलेली आहे. श्यामाप्रसाद जीं ना अटक झाली ही बातमी ज्यावेळेला संपूर्ण देशांमध्ये पसरली त्यावेळेला संपूर्ण देश पेटून उठला. जागोजागी निदर्शने, सभा, मोर्चे, निघू लागले.

बंदीवास व प्रकृती अस्वास्थ्य
श्यामाप्रसादजीं ना श्रीनगरमधील दल झील च्या जवळ एका बंगल्यात 12 मे 1953 ला बंदी म्हणून ठेवण्यात आले. त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू जरी देण्यात येत होत्या तरीपण श्यामाप्रसाद जींचे मन भारतात चाललेल्या विविध घटनांबद्दल अधिक आसक्त होते. त्यांना जम्मूतील सत्याग्रह आणि काश्मीर मधील जनतेचा बातम्या ऐकण्यात विशेष रुची होती. परंतु अब्दुल्ला सरकार त्यांना वर्तमानपत्र सुद्धा पाच-सहा दिवस जुने वाचायला देत असे. त्यांच्या कडे आलेले पत्र सुद्धा त्यांना लवकर देण्यात येत नसे. त्याचप्रमाणे त्यांनी पाठवलेले पत्र सुद्धा लोकांना खूप उशिराच मिळायचे. त्यांना रोज सकाळ-संध्याकाळी फिरण्याची आवड होती आणि सवय होती. तर त्या ठिकाणी त्यांच्या फिरण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली होती. काही संसद सदस्यांनी तथा वकिलांनी श्यामाप्रसादजीं ना भेटण्याचा प्रस्ताव सरकार समोर ठेवला. परंतु तो सुद्धा मान्य झाला नाही.
अशा वातावरणात राहिल्याने श्यामाप्रसादजींचे स्वास्थ्य प्रतिदिन खराब होत चाललेले होते. पायामध्ये दुखणे, ताप येणे, भूक कमी होणे असे प्रकार त्यांचे सुरू झाले होते. 18 जून ला उच्च न्यायालयाचे वकील उमाशंकर त्रिवेदी त्यांना भेटले.त्यावेळेला अतिशय सुदृढ शरीराचे श्यामाप्रसाद जी अत्यंत कृश व रोगी दिसत होते. 19 जून ला प्रजा परिषद पक्षाचे नेते प्रेमराज डोंगरा यांनी पण श्यामाप्रसाद जीं ची भेट घेतली. ते सुद्धा श्यामाप्रसाद जीं ची तब्येत पाहून आश्चर्यचकित झाले.
20 जून ला अली मोहम्मद नावाच्या डॉक्टरांना बोलविण्यात आले.त्यांनी श्यामाप्रसाद जीं ना स्टेप्टोमाईसीन हे इंजेक्शन देण्याचे ठरविले.त्या इंजेक्शन बद्दल शामाप्रसाद जीं ना माहिती होती. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना सांगितले की हे इंजेक्शन मला लागू होत नाही व माझ्या तब्येतीला हे घातक आहे. तरीसुद्धा डॉक्टर म्हणाले की मी डॉक्टर आहे व या इंजेक्शन बद्दल मी तुमच्यापेक्षा अधिक जाणतो. असे म्हणून त्यांनी त्यांना ते इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जूनला शामाप्रसाद जीं वर हृदयविकाराचा आघात झाला. तरीसुद्धा एक सामान्य नविन डॉक्टर झालेल्या मुलाला त्यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यानंतर डॉक्टर अली मोहम्मद हे आले व त्यांनी श्यामाप्रसाद जीं ना इस्पितळा मध्ये घेऊन जाण्याची सूचना केली.

बलिदान
वास्तविक पाहता एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून जर इतका मोठा नेता आजारी होता तर काश्मीर सरकारने त्यांना त्याच वेळेस इस्पितळा मध्ये ठेवून त्यांची सेवा सुश्रुषा करायला पाहिजे होती. परंतु कदाचित अब्दुल्ला सरकारच्या मनामध्ये निश्चितच काहीतरी खोट होती.पंडित नेहरूंनी सुद्धा देशाचा इतका सन्माननीय नेता काश्मीर मध्ये कैदेत असताना व त्याची प्रकृती अत्यंत खराब असताना त्यांच्याकडे कोणतेही लक्ष दिले नाही. तेथील न्यायालयात उच्च न्यायालयाचे वकील उमाशंकर त्रिवेदी यांनी श्यामाप्रसाद जीं ना बंदिवासातून मुक्त करण्यासाठी याचिका दाखल केली व त्यावर युक्तिवाद सुद्धा केला. त्यानंतर ते नर्सिंग होम मध्ये श्यामाप्रसाद जीं ना भेटायला आले व त्यांना सांगितले की कदाचित उद्या तुम्हाला न्यायालयाच्या आदेशाने सोडले जाईल .त्यावेळेसही श्यामाप्रसाद जीं नी वकिलांशी व्यवस्थित बोलणे केले व काही कागदांवर हस्ताक्षर सुद्धा केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला श्यामाप्रसाद जीं सोबत असलेले त्यांचे दोन साथी गुरुदत्त व टेकचंद यांच्यासमवेत वकील उमाशंकर त्रिवेदी व प्रेमनाथ डोंगरा हे नर्सिंग होम मध्ये पोहोचले त्यावेळेस प्रशासनाने त्यांना सांगितले की आज 23 जून 1953 ला पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी श्यामाप्रसाद जीं चा स्वर्गवास झालेला आहे. ही गोष्ट ऐकल्यावर सर्वच लोक स्तब्ध राहिले. सर्वांना धक्का बसला.
अखेरचा हा तुला दंडवत
पाहता-पाहता ही बातमी संपूर्ण देशांमध्ये पसरली.संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. श्रीनगर वरून त्यांचे पार्थिव अंबाला येथे आणण्यात आले. व तिथून विमानाने कोलकाता येथे नेण्यात आले. आपल्या प्रिय नेत्याला भेटण्यासाठी लाखोच्या संख्येने मध्ये लोक जमा झाले.हा एकमात्र नेता असा होता ज्यांनी भारत ज्या वेळेला पारतंत्र्यात होता त्यावेळेला त्यांनी देशाच्या स्वतंत्रते साठी प्रयास केले. देशाच्या विभाजनाच्या वेळेला सुद्धा बंगाल, पंजाब व आसाम हे भारतातून पूर्ण पाकिस्तानात जाऊ नये यासाठी खूप मोठे जनआंदोलन उभारले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे या एकाच मागणीसाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. लोकशाही जिवंत राहण्यासाठी भारतीय जनसंघ नावाच्या एका सशक्त विरोधी पक्षाचे निर्माण सुद्धा त्यांनी केले होते.देशाच्या एकतेसाठी,अखंडते साठी एखाद्या राज नेत्याने केलेले हे सर्वोच्च कार्य व सर्वोच्च बलिदान होते. आणि म्हणूनच श्यामाप्रसाद जी हे खरोखरच भारतमातेचे सुपुत्र होते.
लेखक :- अमोल पुसदकर..
