HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग १

आजपासून वारीला सुरवात होतेय.. पुढील १९ दिवसांत लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पायी पंढरीच्या दिशेने निघालेले वारकरी मोठ्या उत्साहात, मुखाने अभंग म्हणत पंढरपूरला पोहोचतील. या निमित्ताने १९ भागांची विशेष मालिका पुढीलप्रमाणे..

“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

ऐतिहासिक दृष्टीने पाहता वारी एक चळवळच होती. कारण चार वर्णात आणि अठरापगड जातीमध्ये विखुरलेला हिंदू समाज एकत्र आणणे हे तसे दुष्कर कार्य होते. तत्कालीन धुरिणांनी ते यशस्वीपणे केले. त्यासाठी ‘विठ्ठला’ला आळवले गेले त्यात कोण कोण समाविष्ट झाले हे बघितले, या मांदियाळीवर दृष्टिक्षेप टाकला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. संत निवृत्तिनाथादी भावंडे, संत मुक्ताई, चांगदेव, संत नामदेव, शिंपी, दासी जनाबाई, परिसा भगवत, खेचरी विद्याप्राप्त विसोबा, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे… हे सांगणारे गोरा कुंभार, श्रीविठ्ठलाकडे आकर्षिले जाणारे शैवपंथी नरहरी सोनार, सावता माळी, केशकर्तन करणारे सेना आणि वंचित समुदायातील चोखा मेळा आणि त्यांचे कुटुंबीयः याशिवाय दासी जनाबाई, कान्होपात्रा, सोपराबाई, निर्मळाबाई इत्यादी सर्व संतत्व प्राप्त झालेली मंडळी श्रीविठ्ठलाच्या उपासनेसाठी एकत्र प्रवासरत होती. सगळे आठ-पंधरा दिवस एकत्र असत. त्यामुळे एकत्र भजन, एकत्र भोजन असे वारीचे स्वरूप पूर्वीपासूनच राहिलेले आहे. यावेळी विचारांची देवाणघेवाण, सुखदुःखाचे आकलन होऊन परिस्थितीची जाणीव होणे शक्य होते. त्यामुळेच जातिपातीत विखुरलेला हिंदू समाज एकत्र येणे..समरस होणे आवश्यक आहे.

संत तुकारामांची ‘रामभक्ती’

वारकरी भक्तिपंथाच्या मंदिराचे ‘कळस’ संत तुकाराम महाराजांची विठ्ठलभक्ती महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे, पण त्यांची रामभक्ती अपरिचित आहे. त्यांच्या अभंगगाथेमध्ये १४ अभंगांचे ‘श्रीराम चरित्र’ नावाचे स्वतंत्र प्रकरण आहे. स्वतःस ‘राघवदास’ म्हणवून घेत त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. ‘विठ्ठल’ आणि ‘राम’ या नामरूप भेदापलीकडचे व्यापक अद्वैत त्यांनी अभंगातून प्रतिपादिले आहे. नित्य रामजप हे जीवनमुक्तीचे अत्यंत सुलभ व श्रेष्ठ साधन आहे, असे तुकोबा म्हणतात.

संत तुकाराम विठ्ठलभक्त होते हे प्रसिद्ध आहे, पण ते रामभक्तही होते हे तितकेसे सर्वश्रुत नाही. वारकरी संप्रदायाचा आणि तुकोबांना स्वप्नदृष्टान्तात गुरुकडून लाभलेला मंत्रही ‘राम कृष्ण हरी’ हा असल्याने, रामभक्ती ही प्रत्येक वारकऱ्यामध्ये स्वाभाविकपणे दिसून येते, तशीच ती तुकोबांच्या अभंगामधून दिसून येते. तुकोबांच्या अभंगातून विशेषत्वाने जाणवणाऱ्या रामभक्तीविषयी डॉ. शं.दा. पेंडसे म्हणतात – ‘ही रामभक्ती संत एकनाथांकडून तुकोबांना मिळालेली दिसते. तुकोर्बानी साधकावस्थेमध्ये संत एकनाथांच्या ‘भावार्थ रामायण’ ग्रंथाचेही अध्ययन केले होते. याविषयी संत चरित्रकार महिपती (ताहराबादकर) म्हणतात –

प्रासादिक एकनाथांची वचने । जे का भावार्थ रामायण।

त्याचेही पाठांतर पूर्णी निजप्रीतीने करीतसे ॥

तुकोबांच्या अभंग गाथेमध्ये ‘रामचरित्र’ नामक जे १४ अभंग आहेत, त्यामध्ये रामगुणवर्णन आहे, रामचरित्रातील काही प्रमुख प्रसंगांचा उल्लेख आहे, रामनाम मंत्राची थोरवी आहे, रामराज्य आल्याचा आनंद आहे आणि सर्वांनी सोपा असलेला रामनाम मंत्र जप करून साधनेने, आराधनेने आपले जीवन मुक्त करून घ्यावे असा उपदेशही आहे.

ऐसा राम जप नित्य । तुका म्हणे जीवनमुक्त ॥

धूप-दीप राम, कृष्ण, हरी।

https://www.instagram.com/p/DafBxoMtED-

राम, कृष्ण, हरी। हा वारकरी भक्तिपंथाचा नाममंत्र आहे, हे सर्वविदित आहे. या नाममंत्रात विठ्ठलाचे थेट नाव नाही, तरी हा विठ्ठलभक्त वारकऱ्यांचा प्राणप्रिय नाममंत्र आहे, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा तीन नावांचा समावेश असलेला नाममंत्र हेच व्यापक, उदात्त, अद्वैत विचाराचे दर्शन आहे. ही समन्वयात्मक दृष्टी हेच वारकरी विचाराचे अधिष्ठान आहे.

बाबाजी चैतन्य सांगितले नाम । मंत्र दिला ‘राम कृष्ण हरी॥

आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।

नाममंत्र म्हणजे परमात्म्याच्या प्रेमस्वरुपास भावभक्तियुक्त आवाहन. या नाममंत्राने आईला हाक मारताना लेकराला जसा प्रेमाचा पान्हा फुटतो, तसाच भक्ताच्या मनात ईश्वराविषयी प्रीतीचा पान्हा फुटतो.

तुकोबांनी विविध प्रकारे रामनाममंत्राचे माहात्म्य कथन केलेले आहे. या नाममंत्रासाठी काही आर्थिक मूल्य-पैसे मोजायचे नाहीत, ते मोफत आहे. त्यासाठी जाती-वर्णाचेही बंधन नाही. हे नाम घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. हा सर्वात सोपा व उघडा मंत्र आहे.

रामनाम ठरावीक वेळी, मोजून मापून घेण्याची गोष्ट नाही, तर साधकाचे अवघे जीवन-कर्म राममय झाले पाहिजे. जेवताना, काम करताना, वाट चालताना असा नित्य जप केला पाहिजे, असे तुकोबा म्हणतात –

राम म्हणे ग्रासो ग्रासी । तो चि जेवला उपवासी ॥॥॥ धन्य धन्य ते शरीर। तीर्थाव्रतांचे माहेर ॥ राम म्हणे करिता धंदा। सुखसमाधि त्या सदा ॥

राम म्हणे वाट चाली। यज्ञ पाऊलापाऊली ॥ राम म्हणे भोगी त्यागी। कर्म न लिंपे त्या अंगी । ऐसा राम जपे नित्य। तुका म्हणे जीवनमुक्त ॥

ऐसा नित्य राम ध्याय। तुका वंदी त्याचे पाय॥ (अ.क्र.1099)

https://www.facebook.com/VSKKokan/?ref=embed_page#

अशा प्रकारे रामनामाचा जप, ध्यान नित्य करणाऱ्या राममय झालेल्या साधकाचे मी चरण वंदीन असे तुकोबा म्हणतात आणि केवळ रामनामच नव्हे, तर रामनाम घेणारे साधक-भक्त हेसुद्धा तुकोबांना वंदनीय वाटतात, हा त्यांचा भाव लक्षात घेण्यासारखा आहे.

‘तुकादास’ म्हणवून घेणाऱ्या तुकोबांचे असेच एक हिंदी पदसुद्धा प्रसिद्ध आहे. ‘तुका दास रामका। मन में एकहि भाव।’ तुकोबांची अनेक हिंदी पदे (काव्य) उपलब्ध आहेत.

‘रामनाम धन्य झालो, कृतकृत्य झालो’ असे कृतार्थतेच्या तृप्तीचे अनेक उद्गार तुकोबांच्या अभंगवाणीत आहेत.

रामनामाचे पवाडे। अखंड ज्याची वाचा पढे। धन्य तो एक संसारी। रामनाम जो उच्चारी। तुका म्हणे रामनामी। कृतकृत्य जालो आम्ही ॥

Back to top button