Newsकोकण प्रान्त

चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष होता – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

महाड, दि. २८ जून २०२६ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने विवेक विचार मंच यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ ला केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू यांनी संबोधित केले.

विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे तसेच राज्यातील विविध सहयोगी संस्थांच्या सहभागातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू म्हणाले, “चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष होता. तथागत गौतम बुद्धांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, हे आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकलो आहोत. महाड सत्याग्रहास शंभर वर्ष होताना, महाड येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित सामाजिक न्याय परिषद होणे विशेष महत्त्वाचे आहे.”

परिषदेच्या प्रारंभी संविधानास अभिवादन करून संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश धायरकर यांनी केले, तर आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील वारे यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले, “आंबेडकरी जनतेला अन्य समाजाशी जोडून घेण्याची संधी मिळेल तिथे गेले पाहिजे. सगळा समाज माझा आहे, हे लक्षात घेऊन संवाद वाढवला पाहिजे. जो मैत्रीचा हात देईल तो स्वीकारला पाहिजे. संधी मिळेल त्या पक्षात जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने काम केले पाहिजे.”

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महाड चौदार तळे नूतनीकरण व विकासकामाबाबत माहिती दिली व त्याचे उद्घाटन पुढील 20 मार्च रोजी महाड सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री दादा इदाते यांनी परिषदेचा समारोप करताना छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे कार्य पुढे घेऊन जाणे म्हणजे जातीच्या बेड्या तोडून समाज जोडण्याचे काम प्रत्यक्ष कृतीत आणणे महत्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी विवेक विचार मंचच्या वतीने महाराष्ट्रातील सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावासाठी कार्य करणाऱ्या अकरा संस्था व व्यक्तींना “राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्कारार्थी :-

१. ॲड. विजय लक्ष्मण गव्हाळे (बारामती)
२. मिलिंद मधुकर जाधव (पिंपरी-चिंचवड)
३. नागेश मोहन कंडारे (धुळे)
४. प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे (छत्रपती संभाजीनगर)
५. नागसेन शामराव पुंडगे (परभणी)
६. डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड)
७. प्रभाकर मनोहर शिंदे (नागपूर)
८. शाम वसंत माळवंदे (खामगाव, बुलढाणा)
९. स्मिता सुशांत कवडे (मुंबई)
१०. विजय अंबुजी जाधव (अंधेरी, मुंबई)
११. महादेव कृष्णाजी गोठणकर (राजापूर, रत्नागिरी)

या परिषदेस केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू, सामाजिक न्याय मंत्री श्री. संजय शिरसाट, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री दादा इदाते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनिश कामत, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील वारे, आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आमदार श्री. सुनील कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विवेक विचार मंचचे कार्यवाह श्री. महेश पोहनेरकर यांनी सामाजिक न्याय परिषदेचा उद्देश व आवश्यकता स्पष्ट करत मंचाच्या महाराष्ट्रातील सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. पद्मश्री दादा इदाते यांनी परिषदेचा समारोप केला.


सामाजिक न्याय परिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव

परिषदेत सामाजिक समता, संविधान संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

ठराव क्र. १ : “एक गाव – एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी”

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहातून सर्व मानव समान असल्याचा संदेश दिला. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये पाणवठा, मंदिर व स्मशानभूमीवर सर्व समाजघटकांना समान व मुक्त प्रवेश मिळावा यासाठी “एक गाव – एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी” हा ठराव मंजूर करण्यात आला.

ठराव क्र. २ : छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार एकसंघ भारत निर्माण करण्याचा संकल्प

आरक्षण व संविधानाबाबत गैरसमज निर्माण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा परिषदेत निषेध करण्यात आला.

छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा मार्ग दाखविला. संविधानाच्या मूल्यांवर आधारित एकसंघ भारत निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.

ठराव क्र. ३ : केंद्र सरकारच्या नक्षलमुक्त भारत अभियानाचे अभिनंदन

देशातील हिंसक नक्षलवाद व माओवादी हिंसाचारामुळे झालेल्या हानीची दखल घेत परिषदेत नक्षलमुक्त भारत अभियानाबद्दल केंद्र सरकार व सुरक्षा यंत्रणांचे अभिनंदन करण्यात आले.

लोकशाही, संविधान आणि शांततामय सामाजिक परिवर्तनाच्या मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प परिषदेत करण्यात आला.

वरील सर्व ठरावांना उपस्थित संस्था, संघटना व प्रतिनिधींनी एकमताने अनुमोदन दिले.

संपर्क – आप्पासाहेब पारधे

Back to top button