कोकण प्रांतात विहिंप धर्माचार्य संपर्क आयामाची बैठक उत्साहात संपन्न..
विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या धर्माचार्य संपर्क आयामाची प्रांत मार्गदर्शक मंडळ बैठक ४ ऑगस्ट रोजी पार पडली.बैठकीचे अध्यक्षस्थान पूज्य स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज यांनी भूषवले. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री तथा धर्माचार्य संपर्काचे केंद्रीय प्रमुख अशोकजी तिवारी, क्षेत्रीय संघटनमंत्री अनिरुद्धजी पंडित, महाराष्ट्र-गोवा राज्य धार्मिक विभाग प्रमुख संजय मुरदाळे, कोकण प्रांत मंत्री मोहनजी सालेकर, कोकण प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख परशुरामजी दुबे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आणि धर्माचार्य संपर्काचे केंद्रीय प्रमुख अशोकजी तिवारी यांनी बीजभाषणातून बैठकीतील चिंतनाची दिशा स्पष्ट केली. कुटुंब प्रबोधन, व्यसनमुक्ती, सामाजिक समरसता आणि संत रविदासजींच्या ६५० व्या जयंती वर्षाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, या चार प्रमुख विषयांची त्यांनी सविस्तर मांडणी केली. या विषयांचे वर्तमान सामाजिक संदर्भ, त्यासमोरील आव्हाने तसेच समाजप्रबोधनामध्ये संत-महंत, धर्माचार्य, कीर्तनकार आणि प्रवचनकारांची भूमिका यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
संत रविदासजींच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे विचार व्यापक प्रमाणावर समाजापर्यंत पोहोचवण्याचा विषयही बैठकीत प्रामुख्याने मांडण्यात आला. अशोकजी तिवारी यांनी श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दानपेटीशी संबंधित चोरीच्या प्रकरणाबाबत उपलब्ध तथ्यांची सविस्तर माहिती दिली.या घटनेचा श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारी अथवा विश्व हिंदू परिषदेच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दानराशीची मोजणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांशी संबंधित हे प्रकरण असून संबंधित कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्तरावरील संबंधित पदाधिकाऱ्यांनीच हे प्रकरण समोर आणले आणि शासनाकडे विशेष चौकशीच्या माध्यमातून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाविषयी समाजात माहिती देताना केवळ वस्तुस्थितीच्या आधारावरच माहिती द्यावी, जेणेकरून अपूर्ण अथवा दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे समाजात संभ्रम निर्माण होणार नाही, असे आवाहन त्यांनी संतांना केले.
दुसऱ्या सत्रात विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री अनिरुद्ध पंडितजी यांनी आगामी जनगणनेच्या संदर्भात समाजामध्ये जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
जनगणनेच्या वेळी नागरिकांनी आपली धार्मिक ओळख स्पष्टपणे नोंदवावी. जे हिंदू आहेत त्यांनी धर्मासंबंधीच्या रकान्यात आपली ओळख स्पष्टपणे ‘हिंदू’ अशी नोंदवावी, असे त्यांनी सांगितले. धार्मिक ओळख संदिग्ध ठेवल्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि सांख्यिकीय परिणामांविषयी संत आणि धर्माचार्यांच्या माध्यमातून तथ्याधारित जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.या विषयाची योग्य माहिती संतांनी आपल्या भक्तांपर्यंत आणि व्यापक समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
संदर्भ: विश्व हिंदू परिषद फेसबुक
https://www.facebook.com/share/p/1EQeYiURSo/
