HinduismNews

डोंगर दऱ्यातील वनवासींचा गणेशोत्सव: समाजप्रबोधन, संस्कृती आणि एकतेचा नवा श्रीगणेश

‘वनवासी जीवन हे निसर्गाच्या सहवासात फुलणारं, बहरणारं! स्वैर-स्वच्छंदी!!’ वनवासी जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे एक जिवंत उत्सवच असतो. या भोळ्या-भाबड्या वनवासी बांधवांच्या जीवनाला गणेशोत्सवामुळे एक नवी सामाजिक परिमिती लाभली आहे. डोंगरकपारीतून ऐकू येणारा ‘गणपती बाप्पा मोरया’चा उद्घोष, टाळ-मृदुंगाचे आवाज आणि पाड्यापाड्यावर ढोल-तारप्याच्या तालावर नाचणारे वनवासी बांधव पाहिले की, खऱ्या भक्तीभावातून उत्सव साजरा होणे म्हणजे काय, याचा प्रत्यय येतो. शहरांमध्ये उत्सवाच्या स्वरूपात बदल करण्याचे प्रयत्न होत असताना, वनवासी क्षेत्रात मात्र धर्म, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.

उत्सवाचा विस्तार आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार

मोखाडा तालुक्यात गेल्या पस्तीस वर्षांपूर्वी सुरू झालेला हा गणेशोत्सव ११० ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा होत आहे. वनवासी बांधवांमधील या उत्साहाचा आणि शक्तीचा विनियोग योग्य मार्गाने व्हावा, या दृष्टीकोनातून वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद आणि सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ या संघटनांनी विशेष प्रयत्न केले आहेत. देवबांध येथील ‘श्री सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्रा’चे प्रमुख श्री. वसंत साठे व अन्य कार्यकर्ते श्री. प्रकाश झाटाळ श्री.सोमनाथ जाबर श्री.संतोष पादीर ढवळू वारे यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व ११० गणेशोत्सवांना गणेशाची मूर्ती उपलब्ध करून दिली जाते.

पारंपरिक कलाकुसर आणि ‘अखंड दीप’

कोणत्याही मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध नसताना वनवासी बांधव आपल्या पारंपरिक कलाकुसरीने उत्सव सजवतात. केळीचे खांब, कागदावरील सुंदर नक्षीकाम आणि पताकांनी उंचावर केलेल्या आराशीत बाप्पा विराजमान होतात. उत्सवाचे स्वरूप: गावात किंवा पाड्यावर एका झोपडीत अथवा शाळेत गणेशाची स्थापना केली जाते. दिवसभर भजन-कीर्तन आणि रात्री ढोल-तारप्याच्या तालावर पारंपरिक नृत्य चालते.

अखंड दीप परंपरा: या उत्सवात प्रसादाचा कोणताही अट्टाहास नसतो. ‘शेंड्याची मेठ’सारख्या गावात प्रत्येक घराकडून केवळ १ रुपया वर्गणी गोळा करून दिव्यासाठी तेल व उदबत्त्यांचा खर्च केला जातो. देवापाशी अखंड दिवा जळत राहिला पाहिजे, असा येथील उत्सवकर्त्यांचा आग्रह असतो.

भक्ती, संस्कृती आणि निष्पाप मागणे

उत्सवाच्या काळात मुलांसाठी विविध स्पर्धा, हळदी-कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. डोल्हारे येथील शाळेतील विद्यार्थिनींनी गाण्याच्या तालावर सादर केलेला गरबा नाच विशेष लक्ष वेधून घेतो:

“गणपती देवा काय करू सेवा ।” “काय मागू मागणं, काय मागू मागणं रे देवा !”

पैसा, धन वा संपत्तीचे कोणतेही साकडे देवाला न घालता, वनवासी मुली अत्यंत निष्पाप भावाने देवाकडे मागणी मागतात:

“कपाळाचं कुंकू अखंड राहू दे हेच माझं मागणं रे, देवा हेच माझं मागणं”

विसर्जनाची आगळीवेगळी पद्धत

वनवासींच्या या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत स्त्री-पुरुष एकत्र नाचतात, गातात आणि मिरवणुकीत सहभागी होतात. विसर्जनाच्या वेळी ज्याच्या डोक्यावर मूर्ती असते, तो गावातील प्रत्येकाच्या घरासमोर जातो. तिथे त्याचे पाय धुतले जातात, गणपतीची पूजा केली जाते आणि नंतर सर्व स्त्री-पुरुष एकत्र येऊन नदीवर विसर्जन करतात.

व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधन

या गणेशोत्सवाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे फलित म्हणजे व्यसनमुक्ती. उत्सवाच्या ५ दिवसांत कोणीही दारूला स्पर्श करत नाही. या उत्सवाच्या प्रेरणेतून या परिसरातील सुमारे ३५० वनवासी बांधवांनी दारूसारख्या व्यसनापासून मुक्त होण्याची शपथ घेतली आहे. ‘एक गाव एक गणपती’च्या दृष्टीकोनातून साधले जाणारे हे समाजप्रबोधन खरोखरच कौतुकास्पद आहे.

निष्कर्ष: राष्ट्रनिर्मितीचा भक्कम पाया

काही घटकांकडून “वनवासींना देवच नाही, दगडाचा कुठे देव असतो का?” असे सांगून वनवासींची मने विचलित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु “हाच आमचा देव, हीच आमची परंपरा आणि संस्कृती आहे” हे या लोकांनी हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करून सिद्ध केले आहे.
महाराष्ट्रात सामाजिक ऐक्यासाठी, जनजागृतीसाठी व देशभक्ती जागवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. धार्मिक उपासनेला घरगुती स्वरूपापेक्षा सामुदायिक स्वरूप देऊन माणसाला समाजाभिमुख करणे हा यामागचा मूलगामी हेतू होता. मोखाड्याच्या डोंगर-दऱ्यांत साजरा होणारा हा गणेशोत्सव वनवासी बांधवांमध्ये एकता, संस्कृतीचे संरक्षण आणि विकासाचा नवा ‘श्रीगणेश’ करत असून, तो आदर्श समाज आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यंत भक्कम पाया ठरेल यात शंका नाही.

Back to top button