NewsRSS

शाखेतून समाज संघटन आणि समाज संघटनेतून राष्ट्रनिर्माणाची यात्रा म्हणजे संघ – दत्तात्रेय होसबाळे जी

आपण राष्ट्रासाठी काय करु शकतो याचा विचार प्रत्येक नागरिकाने करायला हवा – दत्तात्रेय होसबाळे जी

लाल परेड मैदानावर ३० हजार स्वयंसेवकांचे विराट एकत्रीकरण; ५ हजार समाजबांधवांचाही सहभाग

भोपाळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांतील एक उपक्रम म्हणून रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर स्वयंसेवकांचे विराट एकत्रीकरण आयोजित करण्यात आले होते. शिस्त, संघटन आणि राष्ट्रभावनेने ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमात सुमारे ३० हजार स्वयंसेवकांसह समाजातील ५ हजार मातृशक्ती आणि मान्यवर सहभागी झाले. कार्यक्रमात संघाच्या शताब्दी यात्रेचा, समाजसंपर्काचा आणि सेवा कार्यांचा अहवाल सादर करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एम्स भोपाळचे संचालक लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे जी, मध्यभारत प्रांत संघचालक अशोक पांडे जी आणि भोपाळ विभाग संघचालक सोमकांत उमाळकर जी हेही व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वयंसेवकांनी केलेल्या सामूहिक योगासनांच्या प्रात्यक्षिकाने झाली. त्यानंतर सामूहिक योगाभ्यासाचे सादरीकरण झाले. या सादरीकरणांनंतर संघाच्या घोषवादकांनी विविध रचनांचे वादन केले.

शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवणे ही प्राथमिकता असावी

या कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यात्रा समाजनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणापर्यंतची यात्रा आहे. अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. संघाचे कार्य व्यक्तीपासून सुरू होऊन कुटुंब, समाज आणि राष्ट्रापर्यंत पोहोचते. कोणत्याही राष्ट्राची शक्ती ही केवळ त्याच्या भौतिक उपलब्धींवर अवलंबून नसते, तर नागरिकांचे चारित्र्य, सामाजिक एकता, कर्तव्यबोध आणि परस्पर सहकार्य यांवरही अवलंबून असते.”

ते पुढे म्हणाले, “समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाच्या संधी पोहोचतील आणि प्रत्येक नागरिक स्वतःला राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेचा सहभागी समजेल, तेव्हाच राष्ट्राच्या प्रगतीचा खरा अर्थ साध्य होईल.” तसेच समाजासमोर मांडण्यात आलेल्या पंच परिवर्तनाच्या विषयांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. सामाजिक समरसता, कुटुंब आणि संस्कार, पर्यावरण संरक्षण, आत्मनिर्भरता आणि नागरीक कर्तव्य यांसारखे विषय समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “भारताची यात्रा ही निरंतर सुरू राहणारी यात्रा आहे. समस्या येत राहतील, परिस्थिती बदलत राहील आणि नवी आव्हाने समोर येत राहतील, मात्र समाजाने आपल्या शक्ती, चारित्र्य आणि संघटनाच्या बळावर त्यांचा सामना करण्याची क्षमता कायम राखली पाहिजे. भारताच्या दीर्घकाळ टिकून राहिलेल्या सभ्यतेचे हेच वैशिष्ट्य आहे.”

भारताची प्रगती संपूर्ण मानवतेसाठी आवश्यक

मुख्य वक्ते दत्तात्रेय होसबाळे जी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, “भारत वेगाने प्रगती करत आहे आणि ही प्रगती अनेक क्षेत्रांत दिसून येत आहे. भारताची प्रगती केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण विश्वाच्या मानवतेसाठीही आवश्यक आहे. विज्ञान, अंतराळ संशोधन आणि इतर अनेक क्षेत्रांत भारतीय शास्त्रज्ञांनी उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव जगभरात उंचावले आहे. त्याचबरोबर जगातील अनेक भागांत भारताविषयी उत्सुकतेसोबतच आदर, श्रद्धा आणि गौरवाची भावनाही निर्माण होताना दिसत आहे.

ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताला परम वैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. ही वाटचाल एखाद्या एका यशावर किंवा उपलब्धीवर थांबणारी नाही. समाजसंघटन आणि व्यक्तीच्या चारित्र्यनिर्मितीचे कार्य ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे.

भारत पाच हजार वर्षांच्या प्रवासानंतरही चिरंतन

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे जी यांनी सांगितले की, भारताच्या सुमारे पाच हजार वर्षांच्या सांस्कृतिक आणि सभ्यतागत प्रवासाकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, संकट कितीही मोठे असले, तरी भारताने प्रत्येक वेळी त्यावर मात करून पुढे वाटचाल केली आहे. भारताने विविध कालखंडांत संकटे आणि संघर्षांचा सामना केला, मात्र समाजाची जीवनशक्ती कधीही संपुष्टात आली नाही.”

ते पुढे म्हणाले, “ जगात अशा अनेक संस्कृती आणि राष्ट्रे होऊन गेली, जी कधीकाळी सामर्थ्यवान होती. आज मात्र त्यांची आठवण इतिहासाच्या पानांत राहिली आहे किंवा त्यांचे अवशेष संग्रहालयांत पाहायला मिळतात. याउलट भारत आजही एक जिवंत आणि चैतन्यशील समाज म्हणून उभा आहे. भारताला ‘अविनाशी आणि मृत्युञ्जयी राष्ट्र’ संबोधताना त्यांनी सांगितले की, एखाद्या समाजाची खरी शक्ती त्याच्यासमोर समस्या येतात की नाही, यात नसते; तर त्या समस्यांना सामोरे जाण्याचे आणि त्यांवर मात करण्याचे सामर्थ्य समाजामध्ये किती आहे, यात असते.”

भारताच्या इतिहासात अनेक आक्रमणे झाली, संघर्ष झाले, सामाजिक शिथिलता आली आणि विविध प्रकारची आव्हाने उभी राहिली. तरीही भारतीय समाजाने आपले अस्तित्व आणि सांस्कृतिक सातत्य टिकवून ठेवले.

दत्तात्रेय होसबाळे जी यांनी सांगितले की, दीर्घकाळ चाललेल्या पराधीनतेच्या काळात भारतीय समाजाला आपल्या स्वरूपाची आणि सामर्थ्याची काही अंशी विस्मृती झाली. समाजाची अंतर्निहित शक्ती, राष्ट्रीय भाव आणि आपल्या सामूहिक दायित्वाबाबतची सजगता काही प्रमाणात कमी झाली.

आपसातील राग-द्वेष, संघर्ष आणि सामाजिक कुप्रथांमुळेही समाजाच्या एकतेवर परिणाम झाला. समाज जेव्हा आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि सामूहिक दायित्वाची जाणीव विसरतो, तेव्हा त्याची शक्ती क्षीण होते, असे त्यांनी नमूद केले.

याच संदर्भात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांनी विचार केला की भारताने इतिहासात असे कालखंड अनुभवले आहेत, जेव्हा तो भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही क्षेत्रांत प्रगतीच्या शिखरावर होता आणि जगावर त्याचा प्रभाव होता. मग अशी परिस्थिती का निर्माण झाली की भारतीय समाजाला पराधीन व्हावे लागले?

त्यांच्या मते, यामागील एक कारण म्हणजे समाज आपल्या राष्ट्रभावाची, स्वतःच्या भूमिकेची आणि सामूहिक दायित्वाची जाणीव विसरला होता. या विस्मृतीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी व्यक्तिनिर्माण आणि समाजसंघटनाला केंद्रस्थानी ठेवून कार्य सुरू करण्यात आले.

हनुमान आणि जांबुवंताच्या उदाहरणातून समाजाच्या सामर्थ्याची जाणीव

सरकार्यवाह जी यांनी रामायणातील हनुमान आणि जांबुवंत यांच्या प्रसंगाचा दाखला देत सांगितले की, अनेकदा व्यक्तीला स्वतःच्या सामर्थ्याचीच जाणीव राहत नाही. सीतेच्या शोधासाठी समुद्र पार करण्याचा प्रश्न समोर आला, तेव्हा वानरसेनेतील अनेक जण आपापली क्षमता सांगत होते; मात्र निर्णायक झेप घेण्याचे धैर्य कोणामध्येही दिसत नव्हते.

त्या वेळी जांबवंतांनी हनुमानांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. हनुमानांच्या ठायी सामर्थ्य आधीपासूनच होते; गरज होती ती केवळ त्या सामर्थ्याला जागृत करण्याची. बालपणी सूर्याला फळ समजून त्याच्याकडे झेप घेतल्याच्या प्रसंगाची आठवण करून देत जांबवंतांनी त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. त्यानंतर हनुमानांनी समुद्र लांघला
.
ते म्हणाले की, हिंदू समाजही अनेकदा आपल्या शक्तीचे आणि सामर्थ्याचे विस्मरण करतो. अशा वेळी समाजातूनच एखादा महापुरुष, एखादा विचार किंवा एखादी संघटनात्मक शक्ती समाजाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. डॉ. हेडगेवार यांनी संघाच्या स्थापनेच्या माध्यमातून समाजातील याच अंतर्निहित शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न केला.

समाजाला जेव्हा स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते, तेव्हा अशक्य वाटणारी कामेही शक्य होऊ लागतात आणि असाध्य वाटणारी उद्दिष्टे साध्य करता येतात, असे त्यांनी सांगितले.

ही राम, बुद्ध आणि महावीरांची भूमी

सरकार्यवाह जी यांनी सांगितले की, भारताची ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमांनी होत नाही. भारत म्हणजे केवळ भूमीचा एक तुकडा किंवा शासनव्यवस्था नाही, तर ही अशी संस्कृती आहे, जिने जीवनाकडे केवळ भौतिक सुख आणि उपभोगाच्या दृष्टिकोनातून पाहिलेले नाही. ही राम, बुद्ध आणि महावीरांची भूमी आहे. याचा अर्थच ही शील आणि चारित्र्याची भूमी आहे. भारतीय चिंतनात व्यक्तीच्या चारित्र्यनिर्मितीला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे.
म्हणूनच संघाच्या शाखेच्या माध्यमातून व्यक्तीचे चारित्र्य घडवण्याबरोबरच समाजात संघभावना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो. शाखा म्हणजे केवळ शारीरिक व्यायामाचे ठिकाण नाही. येथे व्यक्ती स्वतःच्या पलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्राचा विचार करायला शिकते.

ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने आपण या राष्ट्राचे नागरिक आहोत आणि त्यामुळे राष्ट्राप्रती आपलीही काही जबाबदारी आहे, याचा विचार केला पाहिजे. आपल्या गावासाठी, परिसरासाठी, कार्यक्षेत्रासाठी आणि समाजासाठी राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपण काय करू शकतो, याचा विचार दररोज व्हायला हवा. देशभक्ती ही केवळ २६ जानेवारी, १५ ऑगस्ट किंवा एखाद्या विशेष प्रसंगी व्यक्त होणारी भावना नाही. देशभक्ती म्हणजे व्यक्तीच्या जीवनात चोवीस तास राष्ट्राप्रती दायित्वाची भावना जागृत असणे.

आपले काम प्रामाणिकपणे करणे, समाजासाठी वेळ देणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, आपल्या परिसरातील वातावरण अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करणे आणि निर्णय घेताना राष्ट्रहिताचा विचार करणे, हेही नागरिकांच्या कर्तव्याचाच भाग आहे, असे त्यांनी सांगितले.

कोविड महामारीच्या काळाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्या कठीण काळात स्वयंसेवक आणि समाजाने एकत्र येऊन अनेक सेवा कार्ये केली. संकटाच्या वेळी समाजातील विविध घटक एकत्र आले आणि गरजेनुसार सेवा कार्यात सहभागी झाले.

राष्ट्रभक्ती किंवा सेवा ही केवळ स्वयंसेवकांची जबाबदारी नाही. संकटाच्या वेळी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढे आले पाहिजे. समाजातील या सामूहिक शक्तीला जागृत करण्याचा संघाचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

आसाममध्ये आलेल्या पुराच्या काळात सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी केलेल्या मदतकार्याचे उदाहरण त्यांनी दिले. पूरग्रस्त भागांत स्वयंसेवक मदत आणि बचावकार्यामध्ये सहभागी झाले होते. समाजातील विविध घटकांनीही प्रभावित कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

सेवेची भावना कोणत्याही एका संघटनेपुरती मर्यादित राहू शकत नाही. संकटाच्या वेळी संपूर्ण समाज एकजुटीने उभा राहणे, हे सुदृढ सामाजिक व्यवस्थेचे लक्षण आहे, असे त्यांनी सांगितले.

पंच परिवर्तन : समाजातील सकारात्मक बदलाचा आधार

दत्तात्रेय होसबाळे जी यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजासोबत कोणती सकारात्मक कामे करता येतील, यावर विचारमंथन करण्यात आले. त्यातून पंच परिवर्तनाचा विचार समाजासमोर मांडण्यात आला.

पंच परिवर्तनामध्ये सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, स्वबोध, पर्यावरण संवर्धन आणि कुटुंब प्रबोधन या पाच विषयांना महत्त्व देण्यात आले आहे. हे पाचही विषय समाजजीवनाशी निगडित असून, त्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तनाची दिशा निर्माण करता येऊ शकते.

महामना मदन मोहन मालवीय यांचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, गाव किंवा वस्तीच्या विकासाची जबाबदारी केवळ शासन आणि प्रशासनाची असू शकत नाही. तेथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचीही त्यात महत्त्वाची भूमिका आहे.

एखाद्या गावात शिक्षण, स्वच्छता, आरोग्य किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात कमतरता असेल, तर केवळ सरकारकडून अपेक्षा न ठेवता समाजानेही आपल्या क्षमतेनुसार त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सामूहिक जबाबदारीची ही भावना गाव आणि वस्तीला अधिक स्वावलंबी व सक्षम बनवू शकते.

समाजाने आपल्या नव्या पिढीला रामायण, महाभारत, संतवाणी आणि गुरूंच्या उपदेशांशी परिचित करून दिले पाहिजे. या परंपरांमध्ये जीवन, कर्तव्य, त्याग, सेवा आणि चारित्र्यनिर्मितीचे अनेक संदेश आहेत. हे मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुटुंब आणि समाजाने प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

जात, पंथ, भाषा आणि प्रांताच्या भेदांमुळे समाजाची शक्ती कमी होते

जात, पंथ, भाषा आणि प्रांताच्या आधारावर स्वतःला वेगळे मानल्यास समाजाची सामूहिक शक्ती कमी होते, असे त्यांनी सांगितले. चार बोटे वेगवेगळी असतील तर त्यांची शक्ती मर्यादित असते; मात्र तीच बोटे एकत्र येऊन मूठ बनली, तर त्यांची शक्ती अनेक पटींनी वाढते. हीच संघटनेची शक्ती आहे.

भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात एकतेचा अर्थ विविधता नष्ट करणे असा नाही. विविधता कायम ठेवत स्वतःला एका व्यापक राष्ट्रीय कुटुंबाचा भाग मानणे, हीच खरी एकता आहे. आपण सर्वजण एका विशाल भारत कुटुंबाचे सदस्य आहोत. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भावना भारताच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांना जोडणे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आवश्यक आहे.

शाखेत दररोज एक तास समाजासाठी

सरकार्यवाह जी यांनी सांगितले की, समाजसंघटन हे एका दिवसात पूर्ण होणारे काम नाही. एखाद्या खेळाडूला किंवा धावपटूला आपली क्षमता टिकवून ठेवण्यासाठी दररोज सराव करावा लागतो. त्याचप्रमाणे समाजसंघटनेसाठीही सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. धावपटूसाठी दररोज धावण्याचा सराव करणे नेहमीच सोपे नसते; मात्र सातत्यपूर्ण सरावाशिवाय त्याची क्षमता विकसित होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे समाजाचे संघटन करणे सोपे वाटत असले, तरी ते सातत्याने करत राहण्यासाठी शिस्त आणि संयम आवश्यक असतो. ते म्हणाले की, शाखेत जात आणि भाषेचे भेद बाजूला ठेवून राष्ट्रसेवेची भावना विकसित केली जाते. व्यक्तिनिर्माण आणि समाजसंघटनाचे हे कार्य सातत्याने सुरू राहिले पाहिजे.

सरकार्यवाह जी यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला समाजापासून वेगळे मानून कार्य करत नाही. संघ हा समाजाचाच एक भाग आहे. समाजाच्या शक्तीचे संघटन करणे, व्यक्तीमध्ये चारित्र्य निर्माण करणे आणि समाजाला त्याच्या दायित्वाची जाणीव करून देणे, हा संघाच्या कार्याचा एक भाग आहे. संघाचे कार्य कोणत्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही. व्यक्तिनिर्माणातून समाजसंघटन आणि समाजसंघटनेतून राष्ट्रनिर्माण, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
भारताचे परम वैभव म्हणजे केवळ आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्य नव्हे. चारित्र्यवान, सक्षम, संघटित, संवेदनशील आणि आपल्या दायित्वाची जाणीव असलेला समाज उभा राहणे, हेच भारताच्या परम वैभवाचे खरे स्वरूप आहे.

ते म्हणाले की, समाजासाठी केवळ आत्मविश्वास पुरेसा नाही; त्यासोबत सामर्थ्य आणि क्षमता असणेही आवश्यक आहे. सामर्थ्यवान समाजाचा उद्देश इतर कोणत्याही समाजाला किंवा व्यक्तीला हानी पोहोचवणे नसून, मानवतेच्या कल्याणासाठी आणि मानवी जीवनाच्या विकासासाठी योगदान देणे हा असला पाहिजे. भारताच्या परंपरेत शक्तीचा संबंध नेहमीच लोककल्याणाशी जोडला गेला आहे. त्यामुळे समाजाच्या सामर्थ्याचा उपयोग मानवता, राष्ट्र आणि संस्कृतीचे संरक्षण व विकास यासाठी झाला पाहिजे.

भारत वेगाने प्रगती करत असून त्यासोबत देशातील नागरिकांचा आत्मविश्वासही वाढत आहे. जगभरात भारताविषयी वाढत असलेली उत्सुकता आणि आदर हे या परिवर्तनाचे एक महत्त्वाचे संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारताच्या पुनरुत्थानाच्या या प्रवासात प्रत्येक नागरिकाची भूमिका आहे. भारताकडे केवळ भौगोलिक प्रदेश म्हणून न पाहता, एक जिवंत संस्कृती आणि समाज म्हणून पाहण्याची गरज आहे.

शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊन, शेतकरी आपल्या श्रमातून, शास्त्रज्ञ आपल्या संशोधनातून, सैनिक आपल्या सेवेतून, व्यापारी प्रामाणिकपणे व्यवसाय करून आणि सामान्य नागरिक आपल्या आसपासच्या समाजाप्रती जबाबदारी पार पाडून राष्ट्रनिर्माणात योगदान देऊ शकतो. राष्ट्राप्रती असलेले दायित्व हे दैनंदिन जीवनापासून वेगळे करता येत नाही. व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात ज्या प्रकारे वागते, त्याचा परिणाम समाजाच्या वातावरणावरही होत असतो.

Back to top button