HinduismNews

गणपती : राष्ट्रीय जीवनाची आणि हिंदू संघटनेची मूर्ती

लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या तिमिरात सार्वजनिक गणेशोत्सवाला आरंभ केला ते वर्ष होते १८९३. पुण्यात आणि मुंबईत गिरगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सव प्रथम साजरा करण्यात आला. हिंदू समाजाला संघटित करणे हा या उत्सवामागचा प्रमुख हेतू होता. या उत्सवाद्वारे राजकीय आणि सामाजिक प्रबोधन करणे साध्य होणार होते. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या बांधवांच्या मनाची, विचारांची जडणघडण करणे नितांत आवश्यक होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे ध्येय साध्य करता येणार होते.

सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदुत्वाच्या राष्ट्रीय एकतेच्या जाणिवेने हिंदूंना एकजूट करण्यासाठी आणि हिंदू समाज म्हणजे एक राष्ट्र आहे हा विचार हिंदूंच्या मनावर ठसवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. हिंदू राष्ट्राची शक्ती वाढवण्यासाठी, राष्ट्रीय संघटना प्रबळ करण्यासाठी या उत्सवाचा हातभार लागतो. ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थानातून नष्ट करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक रूपात साजरा करण्याचा संकल्प केला, हे सत्य आहे. यामागचे दुसरे कारण म्हणजे वर्ष १८९३ मध्ये प्रथमच मुंबईत हिंदू आणि मुसलमान यांच्यात दंगा झाला होता. या दंग्यासंदर्भात लोकमान्य टिळकांनी एक लेख लिहिला होता. सरकारी अधिकारी मुसलमानांची गय करतात. त्यांना अप्रत्यक्षपणे फूस देतात. गोरक्षणाच्या चळवळीने मुसलमान चिडून दंग्याला प्रवृत्त होतात, असे ब्रिटिश अंमलदार गंभीरपणे पुकारत होते. त्याचा लोकमान्य टिळकांनी खरमरीत समाचार घेतला.

प्रभासपट्टण तीर्थाच्या गावी प्रथम हिंदू-मुसलमानांचा दंगा झाला. तेथील हिंदूंना मदत करण्याच्या हेतूने मुंबईत एक सभा आयोजित करण्यात आली. हिंदूंच्या या सभेआधी मुसलमानांनी अशा प्रकारची सभा भरवली होती. त्या सभेच्या विरोधात हिंदूंनी एक शब्दही उच्चारला नव्हता. तथापि, हिंदूंनी घेतलेल्या सभेचा मुसलमानांना संताप आला. ११ ऑगस्ट १८९३ या दिवशी हातात काठ्या नसलेले मुसलमान दुपारच्या प्रार्थनेसाठी जुम्मा मशीदीत गेले. प्रार्थना आटोपून बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि त्या काठ्यांनी त्यांनी हिंदूंना झोडपून काढले.

११ ऑगस्टच्या आधी पंधरा दिवस वातावरण दंग्यामुळे तंग झाले होते. मुसलमान पुन्हा अमुक दिवशी दंगा करतील, याची पुसटशी कल्पना हिंदूंना नव्हती. त्यामुळे हिंदू बेसावध होते. त्यामुळे हिंदूंना मार खावा लागला. पोलिसांनाही मुसलमानांकडून अशा प्रकारची कृती घडेल असे वाटले नव्हते. त्यामुळे पोलीससुद्धा सावध नव्हते. परिणामी, पोलिसांना मुसलमानांना आवरता आले नाही. दंगल माजवणाऱ्या मुसलमानांच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई केली नाही.

दुसरा दिवस उजाडला तेव्हा पोलिसांवर अवलंबून न राहता हिंदूंनी हातात कायदा घेतला आणि मुसलमानांच्या दंड्याला दंडा भिडला. हिंदूंनी त्यावेळी स्पष्टपणे मुसलमानांना बजावले, “सरकार आडवे आले नाही तर आम्ही मुसलमानांना चौपाटीचा समुद्र दाखवतो.”

ब्रिटिश सरकारने शहरातील पोलीस आणि लष्कराच्या साह्याने गोंधळ नियंत्रणात आणला; पण दंगा संपूर्णपणे मिटवण्यापूर्वीच सरकारी अंमलदारांनी दंग्याविषयी हिंदूंना दोषी ठरवताना, “हिंदू मुसलमानांशी सहानुभूतीने वागत नाहीत. त्यांच्याबद्दल वेडेवाकडे, खोटे-नाटे लिहितात आणि बोलतात म्हणून मुसलमान बिथरतात,” असे म्हटले.

हिंदूंना सर्व प्रकारचे दोष देऊन सरकार मोकळे होत होते. हा प्रकार खोटाच नव्हे, तर अत्यंत घातक आणि खोडसाळपणाचा आहे, हे दाखवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारवर आणि पोलीस खात्यावर जोरदार टीका केली. लोकमान्य टिळकांना हिंदू धर्म आणि हिंदू समाजाविषयीचा विलक्षण अभिमान होता. तो अभिमान त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे अनुभवास येत होता.

“शांती, क्षमा, दया आणि बंधुप्रीती ही तत्त्वे विशेषतः हिंदू धर्माचीच आहेत. असे म्हणण्यास कोणतीही हरकत नाही. धर्मवेडाने मुसलमान बेफाम झाल्याची जशी शेकडो उदाहरणे आहेत, तशी हिंदूंची क्वचितच सापडतील. आपला धर्म आपण पाळावा, लोकांचा धर्म लोकांनी पाळावा. परक्याला मदत करावी. हिंसा करू नये. भूतदया ठेवावी. या गोष्टी हिंदूंच्या हाडी-माशी जितक्या खिळल्या आहेत, तितक्या मुसलमानांच्या अंगी खिळण्यास आणखी काही दिवस गेले पाहिजेत. शांती आणि भूतदया हे गुण हिंदू धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आमच्या मुसलमान बंधूंच्या धर्मात जर त्या तत्त्वांचा पूर्ण रीघाव होईल तर… हिंदू-मुसलमानांचे दंगे नामशेष होण्यास फारसा अवकाश लागणार नाही.”

मुंबईच्या दंग्याची चौकशी पूर्ण झाली. त्यावर सरकारी निर्णय बाहेर येण्याआधीच लोकमान्य टिळकांनी पुण्याला हिंदूंची एक जंगी सभा शनिवार वाड्यासमोरील मैदानात आयोजित केली. हिंदू-मुसलमानांच्या संयुक्त सभेत हिंदूंच्या रास्त मागण्या मुसलमानांच्या विरोधामुळे मान्य केल्या जाणार नाहीत आणि मुसलमानांच्या सर्व मागण्या हिंदूंना पसंत पडायच्या नाहीत. अशा दुफळीत सभा भरविण्याचा मुख्य हेतू चिरडला जाणार. म्हणून हिंदूंची वेगळी सभा हाच त्यावर गुणकारी उपाय आहे, असे समजून लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन ही सभा आयोजित केली. मुसलमानांची मानसिकता आणि ब्रिटिश सरकारचा मुसलमानांकडे असलेला कल लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आरंभला.

स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत म्हणतात, “गणेशोत्सव हा प्रथमपासूनच प्रवृत्तीपर आहे. त्याचे स्वरूप सार्वजनिक आहे. त्याची अधिष्ठात्री देवता मुळी राष्ट्रीय आहे. गणांचा जो पति तोच गणपती! ती देवता वैयक्तिक मूर्ती नसून गणशक्तीची, राष्ट्रीय जीवनाची आणि हिंदूसंघटनेची मूर्ती आहे. या महोत्सवातील सारे विधीविधान, परंपरा आणि प्रक्रिया सार्वजनिक आहेत. प्रवृत्तीपर आहे, राष्ट्रीय आहे. गणपती महोत्सव म्हणजे हिंदूसंघटनेच्या हातचे एक प्रबळ हत्यार आहे. आमच्या हिंदूराष्ट्राचा, राष्ट्रीय आकांक्षेचा तो एक प्रचंड ध्वनिक्षेप आणि ध्वनीवर्धक आहे.”

लेखक – श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

Back to top button