NewsSpecial Day

श्री गुरु ग्रंथ साहिब प्रकाश पर्व

गुरुवाणीचा प्रकाश आणि भारतीय एकात्मतेची अखंड परंपरा

भारतीय सभ्यता ही अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरांनी समृद्ध झालेली आहे. वैदिक, शीख, जैन, बौद्ध अशा विविध परंपरा याच भारतीय भूमीत विकसित झाल्या. त्यांच्या श्रद्धा, उपासनेच्या पद्धती आणि धार्मिक आचार वेगवेगळे असले, तरी त्यांची सांस्कृतिक मुळे भारताच्या प्राचीन परंपरेतच रुजलेली आहेत. श्री गुरु ग्रंथ साहिब हा या सांस्कृतिक नात्याचा महत्त्वाचा दुवा आहे. शीख पंथासाठी तो सर्वोच्च श्रद्धेचा पवित्र ग्रंथ आणि शाश्वत गुरू आहेच; परंतु त्यातील विविध संत-भगतांच्या वाणीमुळे भारतीय संतपरंपरेतील व्यापक एकात्मतेचेही दर्शन घडते.

‘हिंदू’ हा शब्द केवळ एका विशिष्ट धार्मिक पंथाचा किंवा उपासना पद्धतीचा निर्देश करणारा नाही, तर त्याला व्यापक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय संदर्भही आहे. सिंधू नदीच्या प्रदेशाशी संबंधित या शब्दाचा पुढे भारतभूमीशी आणि तिच्या संस्कृतीशी जोडलेला व्यापक अर्थ रूढ झाला. त्यामुळे भारतात विकसित झालेल्या विविध धार्मिक परंपरांकडे त्यांच्या स्वतंत्र वैशिष्ट्यांसह, भारतीय संस्कृतीच्या व्यापक चौकटीतील परंपरा म्हणूनही पाहिले जाते.

इथे धर्म आणि सभ्यता यांतील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. शीख पंथाची स्वतंत्र धार्मिक ओळख आहे. त्याची स्वतंत्र गुरुपरंपरा, श्रद्धा, उपासना पद्धती आणि धार्मिक आचार आहेत. त्यांचा पूर्ण आदर राखूनही शीख परंपरेचा भारतीय संस्कृतीशी असलेला ऐतिहासिक संबंध नाकारता येत नाही. उलट, गुरु ग्रंथ साहिबात स्थान मिळालेल्या विविध संतांच्या रचना या सांस्कृतिक देवाणघेवाणीची जिवंत साक्ष आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारपरंपरेत भारतातील या सांस्कृतिक एकतेला विशेष महत्त्व आहे. परमपूजनीय श्री माधव सदाशिव गोळवलकर अर्थात श्रीगुरुजी, परमपूजनीय बाळासाहेब देवरस आणि विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या विविध भाषणांतून आणि लेखनातून शीख परंपरेचा भारतीय संस्कृतीशी असलेला घनिष्ठ संबंध अधोरेखित केला आहे.

श्रीगुरुजींच्या विचारांत भारतीय राष्ट्राची संकल्पना ही केवळ राजकीय सीमांपुरती मर्यादित नाही. भारतभूमी, तिचा इतिहास, तिची संस्कृती आणि या भूमीत विकसित झालेल्या विविध परंपरा यांना जोडणारे एक व्यापक सांस्कृतिक अधिष्ठान त्यांनी मांडले. बाळासाहेब देवरस यांच्या काळातही पंजाबमधील हिंदू-शीख समाजातील परस्पर आत्मीयता आणि सांस्कृतिक एकतेवर विशेष भर देण्यात आला.

डॉ. मोहन भागवत यांनीही अनेक प्रसंगी भारतातील विविध समुदायांच्या समान पूर्वजत्वाचा आणि भारतभक्तीच्या समान भावनेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मांडणीत विविधता ही विभाजनाचे कारण नसून भारतीय समाजजीवनाचे वैशिष्ट्य आहे, हा विचार ठळकपणे दिसतो. उपासना वेगवेगळी असली, तरी राष्ट्राविषयीची निष्ठा, मातृभूमीविषयीचा अभिमान आणि समाजाशी असलेली बांधिलकी ही आपल्याला एकत्र आणणारी शक्ती आहे.

शीख गुरूंच्या जीवनाकडे पाहिले तर भारतीय संस्कृती आणि धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेली बलिदाने विशेषत्वाने समोर येतात. गुरू तेग बहादूरांचे बलिदान याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. काश्मिरी पंडितांवर जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव आणला जात असताना त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी गुरू तेग बहादूर उभे राहिले. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि अखेर बलिदान स्वीकारले. हे बलिदान केवळ शीख समाजाच्या इतिहासातील घटना नाही; धर्मस्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या भारतीय परंपरेतील ते एक अत्यंत उज्ज्वल पर्व आहे.

गुरू तेग बहादूरांचे बलिदान हे स्वतःच्या श्रद्धेपुरते मर्यादित नव्हते. दुसऱ्याला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी स्वतःचे प्राण देण्याची तयारी त्यांच्या जीवनातून दिसते. म्हणूनच त्यांचे स्मरण भारतीय समाजाच्या व्यापक इतिहासात आदराने केले जाते. संघाच्या विचारविश्वातही गुरू तेग बहादूरांचे हे बलिदान भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या तेजस्वी परंपरेचे प्रतीक मानले जाते. यानंतर गुरू गोबिंद सिंह आणि खालसा पंथाचा इतिहासही अन्याय आणि अत्याचाराविरुद्धच्या संघर्षाशी जोडलेला आहे. गुरू गोबिंद सिंहांनी खालसा पंथाची स्थापना करून धर्म, स्वाभिमान आणि न्यायाच्या रक्षणासाठी सज्ज होण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या चार साहिबजाद्यांनी दिलेले बलिदान तर भारतीय इतिहासातील त्याग, शौर्य आणि अढळ श्रद्धेचे असामान्य उदाहरण आहे.

गुरूंच्या या संघर्षाचे महत्त्व केवळ एका समाजापुरते मर्यादित नव्हते. परकीय अत्याचार आणि धार्मिक दडपशाहीविरुद्ध उभे राहण्याची ही परंपरा भारतीय समाजाच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाच्या व्यापक संघर्षाचा भाग होती. भारताच्या फाळणीच्या काळातही शीख समाजाने प्रचंड यातना सोसल्या. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, हिंसाचार आणि विस्थापनाचा सामना करावा लागला. आपल्या घरादारापासून दूर जावे लागले, तरी राष्ट्राच्या उभारणीत शीख समाजाने दिलेले योगदान पुढेही कायम राहिले.

म्हणूनच शीख समाजाचा इतिहास हा भारताच्या राष्ट्रीय इतिहासापासून वेगळा करून पाहता येत नाही. गुरूंची परंपरा, त्यांचे बलिदान, संतांची वाणी, सेवा आणि समतेची शिकवण,या सर्वांचा भारतीय समाजजीवनावर खोल ठसा उमटलेला आहे. श्री गुरु ग्रंथ साहिब प्रकाश पर्वाच्या निमित्ताने या महान परंपरेचे स्मरण करणे म्हणजे केवळ एका धार्मिक ग्रंथाला वंदन करणे नव्हे; तर गुरुवाणीने दिलेल्या सेवा, समता, त्याग, शौर्य , परोपकार , मानवता आणि बंधुभावाच्या मूल्यांना नमन करणे आहे..

पंजाब ची भूमी ही गुरूंची, त्याग आणि शौर्याची, धर्मस्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या गुरू तेग बहादूरांची ,चार साहिबजाद्यांच्या अदम्य धैर्याची आणि गुरू ग्रंथ साहिबाच्या वाणीने संपूर्ण मानवतेला सेवा, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारी भूमी आहे. श्री गुरु ग्रंथ साहिब प्रकाश पर्व हा त्यामुळे केवळ शीख समाजाचा धार्मिक उत्सव म्हणून पाहण्यापेक्षा, भारतीय इतिहासातील या महान परंपरेचे स्मरण करण्याचा प्रसंग म्हणूनही महत्त्वाचा आहे.

श्री गुरु ग्रंथ साहिब प्रकाश पर्व

श्री गुरु ग्रंथ साहिब प्रकाश पर्व हा शीख पंथाच्या इतिहासातील आणि धार्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या पर्वामागे असलेली ऐतिहासिक घटना, त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि शीख समाजाच्या जीवनातील त्याचे स्थान समजून घेणे आवश्यक आहे. शीख पंथासाठी श्री गुरु ग्रंथ साहिब हा पवित्र ग्रंथ तर आहेच, पण त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे तो शाश्वत आणि अंतिम गुरू आहे. गुरू अर्जन देव जी यांनी १६०४ मध्ये आदिग्रंथाचे संकलन करून त्याची प्रतिष्ठापना केली. पुढे गुरू गोबिंद सिंह जी यांनी गुरू तेग बहादूर जींच्या वाणीचा समावेश करून त्याला अंतिम स्वरूप दिले.दहावे गुरू, श्री गुरु गोबिंद सिंह यांनी १७०८ मध्ये देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करून श्री गुरु ग्रंथ साहिबाला गुरू-गादी प्रदान केली. त्यानंतर शीख समाजासाठी गुरूचे स्थान कोणत्याही व्यक्तीकडे नसून गुरुवाणीमध्येच आहे.

या परंपरेशी महाराष्ट्राचेही अतूट नाते आहे. नांदेडच्या भूमीतच श्री गुरु गोबिंद सिंह यांनी श्री गुरु ग्रंथ साहिबाला गुरू-गादी बहाल केली. त्यामुळे महाराष्ट्र आणि शीख पंथाच्या इतिहासातील हे नाते केवळ ऐतिहासिक नाही, तर अत्यंत भावनिक आणि श्रद्धेचे आहे.

श्री गुरु ग्रंथ साहिब चे महत्त्व

श्री गुरु ग्रंथ साहिब हा शीख समाजाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. ‘एक ओंकार’ या विचारातून एकाच परमेश्वराची संकल्पना मांडताना हा ग्रंथ भक्ती, सत्य, समता, सेवा आणि मानवतेचा मार्ग दाखवतो. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ शीख गुरूंचीच वाणी नाही. विविध संत, भगत आणि भक्तांच्या रचनांनाही त्यात स्थान देण्यात आले आहे. संत कबीर, संत रविदास, संत नामदेव, शेख फरीद यांसारख्या संतांच्या वाणीचा समावेश त्यात आहे. त्यामुळे भारतीय संतपरंपरेतील विविध प्रवाहांचा सुंदर संगम या ग्रंथात पाहायला मिळतो. शबद, श्लोक, वार आणि अन्य प्रकारच्या रचनांनी समृद्ध असलेल्या श्री गुरु ग्रंथ साहिबातून माणसाने सत्याचा मार्ग स्वीकारावा, अहंकार आणि भेदभाव दूर करावा, ईश्वराचे स्मरण करावे आणि समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करावे, असा संदेश मिळतो.

गुरबानी : गुरूंची अमूल्य वाणी

श्री गुरु ग्रंथ साहिबातील गुरूंच्या वाणीला ‘गुरबानी’ म्हटले जाते. शीख श्रद्धेनुसार गुरबानी ही गुरूंच्या माध्यमातून प्रकट झालेली पवित्र वाणी आहे. त्यामुळे तिच्याकडे केवळ साहित्य किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही; ती शीख अनुयायांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाचा आणि जीवनाला दिशा देणारा गुरूचा शब्द आहे.गुरबानी मनाला अंतर्मुख करते, ईश्वराशी नाते जोडते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देते. तिच्यात भक्ती आहे, पण त्याचबरोबर सत्य आचरणाचा आग्रहही आहे; ईश्वराचे स्मरण आहे, पण त्याचबरोबर सेवा आणि परोपकाराची प्रेरणाही आहे. गुरबानीचा प्रकाश केवळ गुरुद्वारापुरता मर्यादित नसून, तो माणसाच्या आचरणात उतरावा, हीच तिच्या शिकवणीची खरी दिशा आहे..

एका ग्रंथात अनेक संतांची वाणी

श्री गुरु ग्रंथ साहिबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील व्यापक समावेशकता. शीख गुरूंच्या वाणीबरोबरच संत कबीर, संत रविदास, संत फरीद, संत नामदेव आणि अन्य रचनांनाही त्यात स्थान देण्यात आले आहे. यातून भारतीय आध्यात्मिक परंपरेचे एक महत्त्व अधोरेखित होते. याच कारणामुळे श्री गुरु ग्रंथ साहिबाचा अभ्यास करताना भारतीय संतपरंपरेतील परस्पर संबंधही स्पष्टपणे जाणवतात.

संत नामदेव : महाराष्ट्र आणि पंजाबला जोडणारा दुवा

संत नामदेव महाराज हे महाराष्ट्राच्या वारकरी भक्तिपरंपरेतील एक श्रेष्ठ संत. विठ्ठलभक्ती, नामस्मरण, ईश्वराची सर्वव्यापकता आणि सामाजिक समतेचा संदेश देत त्यांनी आपल्या कार्याची व्याप्ती महाराष्ट्राच्या पलीकडे नेली. त्यांच्या वाणीचा प्रभाव उत्तर भारतात, विशेषतः पंजाबमध्येही पोहोचला. या प्रभावाचे सर्वांत मोठे ऐतिहासिक प्रमाण म्हणजे श्री गुरु ग्रंथ साहिबात संत नामदेव महाराजांच्या ६१ रचनांना मिळालेले स्थान. गुरू अर्जन देव यांनी १६०४ मध्ये आदिग्रंथाचे संकलन करताना विविध संतांच्या वाणीबरोबर नामदेव महाराजांची पदेही समाविष्ट केली. त्यांच्या रचना विविध रागांमध्ये असून त्या आजही गुरुवाणीसोबत श्रद्धेने गायल्या जातात.

नामदेवांच्या वाणीत ईश्वर एकच आहे, तो सर्वत्र आणि प्रत्येक जीवात आहे, हा विचार ठळकपणे दिसतो. जात-पात, उच्च-नीच भेद नाकारून नामस्मरण आणि भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला. “कहा करउ जाती कहा करउ पाति, राम को नाम जपउ दिन राति” या त्यांच्या वचनातून समतेची हीच भावना व्यक्त होते. त्यांच्या रचनांमध्ये भक्तीबरोबरच समता, सामाजिक न्याय, नामस्मरण, सेवा आणि नि:स्वार्थ आचरण यांचा आग्रह आहे. साधी, सहज आणि हृदयाला भिडणारी भाषा हे त्यांच्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे त्यांची वाणी सामान्य जनांपर्यंत सहज पोहोचली.

महाराष्ट्रातील अभंगपरंपरा आणि पंजाबातील शबद-कीर्तन यांच्यातील सांस्कृतिक नातेही संत नामदेवांच्या वाणीतून प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तीची ही वाणी पंजाबच्या गुरुवाणीमध्ये जपली गेली, ही दोन्ही प्रदेशांना जोडणारी अत्यंत सुंदर परंपरा आहे. पंजाबमधील घुमान येथे संत नामदेव महाराजांच्या स्मृती आजही जपल्या जातात. त्यामुळे नामदेव महाराज हे केवळ महाराष्ट्राचे संत न राहता भारतीय भक्तीपरंपरेला महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत जोडणारे संत ठरतात. एकीकडे पंढरीचा विठ्ठल आणि दुसरीकडे श्री गुरु ग्रंथ साहिबातील गुरुवाणी, या दोन्हींना जोडणारी नामदेव महाराजांची वाणी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे विलक्षण उदाहरण आहे.

धर्मस्वातंत्र्यासाठी गुरू तेग बहादूरांचे बलिदान

भारतीय इतिहासात गुरू तेग बहादूर जींचे बलिदान अत्यंत वेगळे स्थान राखते. स्वतःच्या श्रद्धेच्या संरक्षणापुरते मर्यादित न राहता, दुसऱ्याला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी प्राण दिले. काश्मिरी पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर झालेले त्यांचे बलिदान ही भारतीय इतिहासातील धर्मस्वातंत्र्याची अत्यंत प्रेरणादायी घटना आहे.म्हणूनच गुरू तेग बहादूरांना ‘हिंद की चादर’ म्हणून स्मरण केले जाते.

चार साहिबजाद्यांचा त्याग

गुरू गोबिंद सिंह जींच्या चार साहिबजाद्यांच्या बलिदानाने भारतीय इतिहासात शौर्य आणि श्रद्धेचा एक अढळ आदर्श निर्माण केला.लहान वयातही त्यांनी आपल्या श्रद्धेशी तडजोड केली नाही. मृत्यू समोर उभा असतानाही आपल्या मूल्यांपासून विचलित न होण्याची त्यांची तयारी आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे.
आजच्या तरुणांसमोर असंख्य आकर्षणे आणि दबाव आहेत. अशा वेळी आपल्या मूल्यांसाठी आपण किती ठाम उभे राहू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा .

गुरूंच्या शिकवणीतून समाजशक्ती

शीख परंपरेतील संगत आणि पंगत, गुरुद्वारातील लंगर आणि सेवाभाव ही सामाजिक समतेची जिवंत उदाहरणे आहेत.एकाच पंगतीत सर्वांनी बसून भोजन करणे ही केवळ धार्मिक प्रथा नाही, त्यामागे समाजातील भेद दूर करण्याचा विचार आहे.हीच भावना भारतीय समाजजीवन अधिक सुदृढ करण्यासाठी आजही आवश्यक आहे.

शीख परंपरेचे स्थान

भारताची एकात्मता ही केवळ राजकीय कल्पना नाही तर ती या भूमीशी, तिच्या इतिहासाशी, पूर्वजांशी आणि सांस्कृतिक परंपरांशी जोडलेली आहे.शीख पंथाची स्वतंत्र धार्मिक ओळख आणि त्याच्या विशिष्ट परंपरांचा पूर्ण आदर राखत, हिंदू आणि शीख समाजामधील ऐतिहासिक आत्मीयता, हिंदू शीख एकच ही संघाची भूमिका आहे. गुरूंच्या बलिदानाचा इतिहास, संत नामदेवांची वाणी, नांदेडचे गुरू,गादीशी असलेले नाते आणि लंगर,सेवेची परंपरा, हे सर्व भारतीय समाजाच्या सांस्कृतिक प्रवाहातील परस्पर संबंध दाखवतात.भिन्न उपासना असू शकतात, परंतु परस्पर आदर, मातृभूमीविषयीची निष्ठा आणि समाजहिताची भावना आपल्याला जोडू शकते हे यावरून सिद्ध होते.

आधुनिक काळातील प्रासंगिकता

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात श्री गुरु ग्रंथ साहिबचे वाचन आणि अध्ययन जगभरात डिजिटल माध्यमातूनही सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्यातील शिकवण अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचत आहे. प्रकाश पर्वानिमित्त जगभरातील गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रम, कीर्तन, पाठ आणि नगर कीर्तन आयोजित केले जातात. या मिरवणुकांमधून गुरूंच्या शिकवणीचा प्रसार करताना सेवा, समता, बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला जातो. शीख परंपरेतील शौर्य आणि शिस्तीचे दर्शन घडविणारे विविध पारंपरिक कार्यक्रमही यावेळी आयोजित केले जातात.

प्रकाश पर्वाचा संदेश

गुरूंच्या वाणीतील सेवा, समता, सत्य, संयम आणि बंधुभाव ही मूल्ये आजच्या समाजाला अधिक आवश्यक आहेत.गुरू तेग बहादूरांचे बलिदान धर्मस्वातंत्र्याची आठवण करून देते. आजच्या जगात जातीयवाद, जिहाद, धर्मांधता, असहिष्णुता यांच्यावर गुरू ग्रंथ साहिब हा उपाय आहे. तो शांती, एकता, मानवाधिकार, पर्यावरण संरक्षण (सृष्टीचे रक्षण) इत्यादी आधुनिक मूल्यांना प्रोत्साहन देतो.

संदर्भ-

https://organiser.org/2022/08/28/92468/culture/prakash-utsav-of-sri-guru-granth-sahib-ji-history-and-significance/
https://panchjanya.com/2023/09/16/298130/bharat/authentic-source-of-saint-speech/
https://sikhism.net.in/sikh-gurus/
https://utkarsh.com/current-affairs/punjab-celebrates-pehla-prakash-guruparv-of-sri-guru-granth-sahib-ji#:~:text=Guru%20Granth%20Sahib%20Parkash%20Utsav%20commemorates%20the%20very%20first%20parkash,Gurus%20and%20many%20other%20saints.
https://vishwakosh.marathi.gov.in/22591/
https://www.bbc.com/hindi/india-59731609
https://www.bbc.com/marathi/india-59737808
https://www.loksatta.com/vruthanta/sant-namdev-abhang-from-guru-granth-sahib-1039512/
https://www.searchgurbani.com/guru-granth-sahib/introduction
https://www.sikhdharma.org/8-facts-about-the-siri-guru-granth-sahib/
https://www.sikhism.net.in/history/history-of-sikhism.php
https://www.treebo.com/blog/prakash-purab/

Back to top button