News

हिंदू धर्माच्या रक्षणकर्त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

अठराव्या शतकात भारतातील एका मोठ्या भूभागावर राज्य करताना प्रजाहित, न्याय, धर्म, अर्थव्यवस्था, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक पुनरुत्थान यांचा अद्वितीय समन्वय साधणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्यांपैकी एक आहेत. अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वात, प्रशासनकौशल्य होते.धर्म होता, मानवतावादी दृष्टी होती.सत्ता होती, पण त्यासोबत त्याग होता.दूरदृष्टी होती, पण त्यासोबत व्यवहारज्ञान होते.धैर्य होते, पण त्यासोबत करुणाही होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याची व्याप्ती खूप होती – प्रजेसाठी न्याय, शेतकऱ्यासाठी आधार, महिलांसाठी सन्मान, कारागिरांसाठी रोजगार, व्यापाऱ्यांसाठी सुरक्षितता, प्रवाशांसाठी रस्ते व धर्मशाळा, यात्रेकरूंसाठी अन्न-पाणी, समाजासाठी शिक्षण व संस्कृती, हिंदू समाजासाठी मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि राज्यकारभारासाठी धर्माधिष्ठित नैतिकता असे वेविध्य त्यांच्या कार्यात होते. यामुळेच राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ माळव्याच्या शासक नव्हत्या, त्या भारतीय लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या, स्त्रीशक्तीच्या आणि हिंदू सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय ठरल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून हिंदू समाजाला स्वाभिमानाचा संदेश दिला, तर त्याच परंपरेतील अहिल्यादेवींनी राज्यकर्त्याचे कर्तव्य हे समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक पुनरुत्थानाशीही जोडलेले असते, हे आपल्या कृतीतून सिद्ध केले. तसेच न्यायप्रिय शासनव्यवस्थेतून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. त्यांनी राज्यात हुंडाबंदी, मद्यबंदी जागृतीचे काम केले.

शासन म्हणजे सेवा – अहिल्यादेवींचा आदर्श

अहिल्यादेवींच्या राज्यकारभारात धर्म, अर्थव्यवस्था आणि समाजकल्याण यांच्यात संघर्ष नव्हता; उलट त्यांचा समन्वय होता.न्यायप्रिय प्रशासन, प्रजेशी थेट संवाद, शेतकरीहित, व्यापाराला चालना, स्थानिक उद्योगांचे संवर्धन, महिला सन्मान, सामाजिक पुनर्वसन, जलव्यवस्थापन, पायाभूत सुविधांची निर्मिती, विद्वान व कलाकारांचा सन्मान, धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण, तीर्थक्षेत्रांचा विकास, सर्व जीवमात्रांविषयी करुणा ही त्यांच्या शासनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती .

चौंडीच्या कन्येपासून होळकर घराण्याच्या स्नुषेपर्यंत

१७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे माणकोजी शिंदे यांच्या घरी अहिल्यादेवींचा जन्म झाला.वडील गावचे पाटील होते. त्यांनी अहिल्यादेवींना वाचन व लेखनाचे शिक्षण दिले .बालपणापासूनच त्या शिवभक्त होत्या.त्यांच्या भक्ती, धैर्य आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन मल्हारराव होळकर यांनी त्यांचा विवाह आपल्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी केला.२० मे १७३७ रोजी विवाह होऊन त्या होळकर घराण्यात आल्या.

शिवभक्ती आणि धैर्य

अहिल्यादेवी लहान असताना नदीकाठी शिवलिंगाची पूजा करत होत्या. घोडदळ तेथून येत असताना शिवलिंगाची विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी त्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे शरीर त्यावर आडवे केले, अशी प्रसिद्ध परंपरा त्यांच्या बालपणीच्या भक्ती आणि धैर्याचे प्रतीक म्हणून सांगितली जाते.

वैयक्तिक दुःखावर मात करून राज्यकारभाराची धुरा

१७ मार्च १७५४ रोजी कुंभेरच्या युद्धात पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आले.पतीच्या निधनानंतर सती जाण्याचा त्यांचा निर्णय मल्हारराव होळकर यांनी रोखला.त्यानंतर मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवींनी राज्यकारभार, प्रशासन आणि लष्करी कौशल्य आत्मसात केले.मल्हारराव लष्करी मोहिमांवर असताना इंदूर आणि माळव्याच्या प्रशासनाची जबाबदारी त्या सांभाळत.१७६६ मध्ये मल्हाररावांचे निधन झाले.त्यानंतर पुत्र मालेराव गादीवर आले; परंतु अल्पावधीत त्यांचेही निधन झाले.अखेर १७६७ मध्ये अहिल्यादेवींनी स्वतः राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

ईश्वरार्पित सत्ता

अहिल्यादेवींनी सत्ता ही वैयक्तिक संपत्ती किंवा प्रतिष्ठेचे साधन मानली नाही.त्यांचे राज्य भगवान शंकराला समर्पित होते. त्यांच्या राजमुद्रेवर- “श्री शंकर आज्ञेवरून” असा उल्लेख होता.राज्य हे ईश्वराची ठेव आणि आपण त्याचे विश्वस्त, या भावनेतून त्यांनी राज्यकारभार केला. सत्तेऐवजी कर्तव्य आणि अधिकाराऐवजी उत्तरदायित्व ही त्यांच्या शासनाची मूलभूत भूमिका होती.

महेश्वर : प्रशासनासोबत कला-संस्कृतीचे केंद्र

राजधानी इंदूरहून नर्मदातीरावरील महेश्वर येथे हलवून अहिल्यादेवींनी ते प्रशासन, कला, साहित्य, संगीत आणि उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनवले. त्यांच्या आश्रयामुळे कवी, पंडित, शास्त्री, कीर्तनकार आणि कलाकारांना राजाश्रय मिळाला.मोरोपंत आणि शाहीर अनंतफंदी यांसारख्या प्रतिभावंतांचा सन्मान झाला.संस्कृत विद्वानांना प्रोत्साहन मिळाले.धार्मिक आणि साहित्यिक ग्रंथांच्या हस्तलिखित प्रतींचा संग्रह त्यांनी केला.धार्मिक विषयांचे विवेचन करणारा ‘अहिल्याकामधेनू’ ग्रंथ त्यांच्या दरबारातील विद्वानांकडून तयार करून घेतला. महेश्वर म्हणजे केवळ राजधानी नव्हे, तर भारतीय ज्ञान, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनाचे केंद्र बनले.

प्रजाहितदक्ष आणि लोकाभिमुख शासन

अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू होता “प्रजेचे सुख हेच राज्यकर्त्याचे खरे यश.” जनतेशी थेट संवाद त्या जनता दरबार भरवत.सामान्य नागरिकांना थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळत असे.न्यायदानात पक्षपाताला स्थान नव्हते.प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला महत्त्व दिले.जाचक पद्धती कमी करून लोकहिताच्या उपायांना प्राधान्य दिले. ब्रिटिश इतिहासकार सर जॉन माल्कम यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शासनाची प्रशंसा करताना त्यांच्या प्रशासनातील समानता, न्यायप्रियता आणि जनसेवेच्या भावनेचा उल्लेख केला.

महिला सन्मान आणि सक्षमीकरण

अठराव्या शतकातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेता महिलांच्या हक्कांसाठी अहिल्यादेवींनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.विधवांना पतीच्या संपत्तीवरील हक्क मिळवून देण्याच्या दिशेने त्यांनी सुधारणा केल्या.विधवांना दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार मान्य केला.वारस नसल्यास संपत्ती राजकोषात जमा करण्याच्या प्रथेला मर्यादा आणली.महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.नदीघाटांवर महिलांच्या सुरक्षित स्नानासाठी आणि वस्त्रपरिवर्तनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली.समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृतीला प्रोत्साहन दिले.

शेतकरी आणि शेतीला प्राधान्य

अहिल्यादेवींना शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ वाटत असे.त्यांच्या काळात जमीन महसूल व्यवस्था अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न झाला.तसेच शेतकऱ्यांवरील करभारात व्यवहार्य दृष्टिकोन ठेवला, भूमिहीनांना जमीन कसण्यासाठी संधी दिली,शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवली, जमिनीचा योग्य वापर आणि लागवडीला प्रोत्साहन दिले, महसूल वसुलीमध्ये मानवी दृष्टिकोन ठेवला. आज जलव्यवस्थापन ही स्वतंत्र विकासनीती मानली जाते, मात्र अहिल्यादेवींनी आपल्या काळातच पाण्याचा बहुआयामी विचार केला.त्यांनी विहिरी, बारवा, तलाव, कुंड, पाणपोया, घाट यांची निर्मिती केली.पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, यात्रेकरू आणि पांथस्थांसाठी पाणी, तसेच पशुधनासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यावर त्यांनी भर दिला.

उद्योग, व्यापार आणि रोजगारनिर्मिती

अहिल्यादेवींनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता स्थानिक उद्योग आणि व्यापाराला चालना दिली. महेश्वर येथे विणकर आणि कारागिरांना प्रोत्साहन दिले.वस्त्रोद्योगासाठी कारागिरांना आश्रय व सुविधा दिल्या.याच परंपरेतून विकसित झालेली महेश्वरी साडी आजही प्रसिद्ध आहे. स्थानिक कौशल्याला बाजारपेठ आणि रोजगाराशी जोडण्याचे काम त्यांच्या काळात झाले. व्यापाऱ्यांना अनावश्यक करभारापासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.व्यापारमार्ग सुरक्षित केले.पायाभूत सुविधा उभारल्यामुळे व्यापार आणि प्रवास सुलभ झाला.

भिल्लांचे पुनर्वसन : केवळ दंड नव्हे, संधी

भिल्ल समाजातील काही घटकांकडून होणारी लूटमार आणि दरोडे ही समस्या अहिल्यादेवींनी केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पाहिली नाही.त्यांनी दोन मार्गांचा अवलंब केला ते दोन मार्ग म्हणजे सुधारणेस तयार असणाऱ्यांना संधी आणि कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई.भिल्लांना शेतीसाठी जमीन देण्यात आली.त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.व्यापारी मार्गांच्या सुरक्षेत त्यांचा सहभाग वाढवला.‘भिलकावडी’सारख्या व्यवस्थेद्वारे सुरक्षा आणि उपजीविकेची सांगड घातली.शरण आलेल्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली.गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयीन प्रक्रियेनंतर कारवाई करण्यात आली.

धर्मरक्षण आणि सांस्कृतिक पुनरुत्थान

अहिल्यादेवींच्या कार्याचा सर्वांत व्यापक प्रभाव त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्यातून दिसतो.त्यांनी भारतभर मंदिरांचे पुनर्निर्माण व जीर्णोद्धार, नदीघाटांची उभारणी, धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया, विहिरी, बारवा, कुंडे, यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था अशा असंख्य लोककल्याणकारी सुविधा उभारल्या.

त्यांचे कार्य एका प्रांतापुरते मर्यादित नव्हते.काशी, गया, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, प्रयाग, नाशिक, त्र्यंबकेश्वर, उज्जैन, सोमनाथ, ओंकारेश्वर, महेश्वर, द्वारका, पुरी, रामेश्वरम, श्रीशैलम, गोकर्ण, पंढरपूर, जेजुरी आणि इतर अनेक तीर्थक्षेत्रांशी निगडित त्यांचे कार्य होते . अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंडीसारख्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरे बांधली. सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वरसारख्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंडी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वरला नद्यांवर घाट बांधले. गोकर्ण महाबळेश्वर, उज्जैयनी, रामेश्वर, भीमाशंकरसारख्या ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामांच्या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रेकरूंची सोय केली. जेजुरीत श्रीमल्हारी, गौतमेश्वराची छत्री, कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ त्यांनी छत्री उभारली आहे. इंदूरला मालेराव, गौतमीबाईंच्या छत्र्या, महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ कलाकुसरयुक्त मंदिर त्यांनी बांधले.

काशी विश्वनाथ मंदिर पुनर्निर्माण

काशी विश्वनाथ हे हिंदू समाजाच्या श्रद्धेचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र.अहिल्यादेवींनी इ.स. १७७७–१७८० च्या कालखंडात काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला हातभार लावला. त्याचबरोबर काशीतील घाटांच्या निर्मिती आणि विकासातही त्यांचे मोठे योगदान होते. मंदिरांचे पुनर्निर्माण हा त्यांच्या दृष्टीने केवळ वास्तू उभारण्याचा विषय नव्हता. उद्ध्वस्त मंदिर पुन्हा उभे करणे म्हणजे उद्ध्वस्त झालेल्या समाजाच्या मनात श्रद्धा, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक स्वाभिमान पुन्हा जागवणे हे महत्वाचे होते .

पंढरपूर आणि वारकरी परंपरेशी नाते

पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाविषयी अहिल्यादेवींना विशेष श्रद्धा होती.विठ्ठलाच्या नैवेद्याची व्यवस्था होळकर घराण्याशी संबंधित होती.रखुमाईच्या अलंकारासाठी त्यांनी दागिना पाठविल्याच्या नोंदी आढळतात.यात्रेकरूंच्या निवासासाठी होळकरवाडा उभारण्यात आला.पंढरपूरसह अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये यात्रेकरूंच्या सुविधांसाठी बांधकामे करण्यात आली. त्यांच्या कार्यातून तीर्थक्षेत्रे ही केवळ धार्मिक केंद्रे नसून सामाजिक-सांस्कृतिक संपर्काची केंद्रे आहेत, हा व्यापक दृष्टिकोन नेहमी दिसला .

रस्ते, घाट, धर्मशाळा आणि यात्रेकरूंची सेवा

त्या काळात हजारो भाविक आणि प्रवासी पायी प्रवास करत.त्यामुळे अहिल्यादेवींनी प्रवासी मार्ग, रस्ते, पूल, नदीघाट, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा, अन्नछत्रे,पाणपोया, विहिरी यांची उभारणी केली.रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करून प्रवाशांना सावली मिळावी, याचीही काळजी घेतली.धर्मरक्षण म्हणजे केवळ मंदिर उभारणे नव्हे; धर्माचरण करणाऱ्या सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणे हाही त्यांच्या धर्मविचाराचा भाग होता.

सर्व जीवमात्रांविषयी करुणा

अहिल्यादेवींची लोककल्याणाची दृष्टी मानवापुरती मर्यादित नव्हती.पशुधनासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली.पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्नाची सोय केली.जलचरांसाठीही अन्नाची व्यवस्था केली.जनावरांना पाणी मिळावे म्हणून तलाव व कुंडे निर्माण केली.माणसांना तसेच प्राण्यांना सर्पदंश झाल्यास उपचारासाठी वैद्य-हकीम उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. “जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत.” यानुसार प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचे दर्शन घेऊन त्याच्या कल्याणाचा विचार त्यांनी केला .

कला, साहित्य आणि विद्वत्तेचा सन्मान

अहिल्यादेवी स्वतः विद्वत्तेचा आदर करणाऱ्या आणि ग्रंथप्रेमी राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या आश्रयात पंडित,कवी, शास्त्री, कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, कारागीर यांना प्रोत्साहन मिळाले.मोरोपंत आणि अनंतफंदी यांसारख्या प्रतिभावंतांना त्यांनी राजाश्रय दिला.त्यांच्या ग्रंथसंग्रहात ज्ञानेश्वरी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, निर्णयसिंधू, मुहूर्तचिंतामणी यांसारख्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती असल्याच्या नोंदी आढळतात.

अहिल्यादेवींना प्राप्त झालेल्या खासगी उत्पन्नाचा मोठा भाग त्यांनी वैयक्तिक ऐषआरामासाठी न वापरता लोककल्याण आणि धर्मकार्यासाठी खर्च केला. या निधीतून त्यांनी मंदिरे, मंदिरांचे जीर्णोद्धार, घाट, विहिरी, बारवा, तलाव, धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया, रस्ते, यात्रेकरूंसाठी सुविधा अशी असंख्य कामे झाली.

हिंदू समाजाच्या आत्मविश्वासाचे पुनरुज्जीवन

अहिल्यादेवींनी मंदिरांचे पुनर्निर्माण केले, त्यामागे केवळ धार्मिक भावना नव्हती; त्यामागे सांस्कृतिक आत्मविश्वासाचा विचार होता. आक्रमणांमध्ये मंदिर उद्ध्वस्त झाले, मूर्तींची विटंबना झाली किंवा धार्मिक केंद्रांचे वैभव नष्ट झाले, तरी श्रद्धा नष्ट होऊ नये, हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो.
मंदिर पुन्हा उभे करणे म्हणजे श्रद्धा पुन्हा उभी करणे.घाट बांधणे म्हणजे तीर्थपरंपरा पुन्हा प्रवाही करणे.धर्मशाळा उभारणे म्हणजे यात्रेकरूंच्या धर्माचरणाला आधार देणे.आणि प्रजेला न्याय देणे म्हणजे धर्माधिष्ठित शासनाचे प्रत्यक्ष रूप साकार करणे.

संदर्भ :-
https://www.britannica.com/biography/Ahilaybai-Holkar
https://www.rss.org/Encyc/2024/3/16/Statement-of-Maananiya-Sarkaryavah.html
https://organiser.org/2024/11/17/265723/bharat/lokmata-ahilyabai-holkar-a-role-model-for-indian-women/
https://kamalsandesh.org/the-governance-of-devi-ahilyabai-holkar/?utm_source=chatgpt.com
https://www.hindustantimes.com/art-and-culture/ahilyabai-holkar-295th-birth-anniversary-the-untold-story-of-the-brave-queen-of-malwa/story-JaYHIKSlSW8JV4SG5mzPKO_amp.html?utm_source=chatgpt.com
https://kamalsandesh.org/the-governance-of-devi-ahilyabai-holkar/
https://www.vayuveg.com//Encyc/2024/3/30/Ahilyabai-Holkar-and-her-restoration-of-temples.php
https://dgipr.maharashtra.gov.in/sites/default/files/2024-06/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%AE%E0%A5%87%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%AA.pdf

Back to top button