भक्ती, सेवा, समता आणि समाजजागृतीचा आदर्श.. “संत सेना महाराज”..
संत सेना महाराज कोण होते?
संत सेना महाराज हे वारकरी भक्तिपरंपरेतील महत्त्वाचे संत मानले जातात. त्यांचे जीवन भक्ती, सेवा, कर्तव्यनिष्ठा, संतसंग आणि समाजजागृती यांचे सुंदर उदाहरण आहे. परंपरेनुसार त्यांचा संबंध बांधवगड, मध्य प्रदेश येथील राजदरबाराशी होता. त्यांचा व्यवसाय नाभिकाचा होता आणि राजाची केशकर्तन व अंगमर्दनाची सेवा ते करीत. मात्र व्यवसाय करत असतानाही त्यांचे मन विठ्ठलभक्तीत आणि संतसेवेत रमलेले होते. त्यांच्या अभंगांमधून नामस्मरण, विठ्ठलभक्ती, संतसंग, सदाचार, आत्मशुद्धी आणि दांभिकतेचा विरोध हे विषय प्रकर्षाने दिसतात. संत सेना महाराजांच्या विचारांचा पाया..
“आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।”
“विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।”
“भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।”
“चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।”
या अभंगात सेना महाराजांनी आपल्या नाभिक व्यवसायाचे आध्यात्मिक रूपक केले आहे. अर्थात – हजामत करण्यासाठी जसा आरसा, चिमटा, वस्तरा लागतो, त्याचप्रमाणे आत्मशुद्धीसाठी विवेक आणि वैराग्य आवश्यक आहे. शरीरावरील केस काढण्याऐवजी मनातील काम, क्रोध, मोह, अहंकार दूर करणे महत्त्वाचे आहे. बाह्य रूपापेक्षा अंतःकरणाची शुद्धता श्रेष्ठ आहे. सेवा करताना कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान भावाने सेवा देणे हीच खरी साधना आहे.
वारकरी परंपरा आणि सामाजिक समरसता..

संत सेना महाराजांचे महत्त्व केवळ एका संताचे चरित्र म्हणून पाहता येत नाही. ते भारतीय समाजजीवनातील समरसतेच्या अखंड परंपरेचे प्रतिनिधी आहेत.वारकरी परंपरेने जात-पात, उच्च-नीच, प्रांत, भाषा, शिक्षित-अशिक्षित, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब यांच्या भिंती ओलांडून ‘भक्त’ हीच एक समान ओळख निर्माण केली.पंढरीची वारी हे त्याचे सर्वात प्रभावी उदाहरण.सामाजिक समरसता ही समाजाच्या संघटनाची मूलभूत आवश्यकता मानली जाते. संतपरंपरेने ही समरसता केवळ भाषणातून नव्हे, तर आचरणातून जगली.संत सेना महाराजांचे जीवन याचाच प्रत्यय देते. “सर्व समाज हा एकच समाज; भेदभावापेक्षा बंधुभाव श्रेष्ठ” हा संदेश त्यांच्या जीवनातून दिसतो.
व्यवसाय आणि भक्ती – कर्मयोगाचा आदर्श
सेना महाराजांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून भक्ती केली नाही.व्यवसाय म्हणजे सेवा, सेवा म्हणजे साधना
, साधना म्हणजे भगवंताची उपासना अशी त्यांची दृष्टी होती.राजाची सेवा करताना ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत. सामान्य लोकांची हजामतही ते सेवेच्या भावनेने करीत. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणे हीदेखील भक्तीच आहे हा संदेश यातून मिळतो . हा दृष्टिकोन भारतीय जीवनपद्धतीतील कर्मयोगाशी जोडलेला आहे.
बालपणातील संस्कार
परंपरागत चरित्रांनुसार सेना महाराजांचे बालपण धार्मिक वातावरणात गेले.त्यांच्या कुटुंबात मंदिरात जाणे, कथा-कीर्तन ऐकणे, भजन, साधुसंतांची सेवा, धार्मिक चर्चा, गरजूंची मदत यांना महत्त्व होते.लहानपणापासूनच त्यांना संतसंग आणि भगवद्भक्तीची आवड निर्माण झाली.त्यांच्या बालपणाबद्दल उद्धृत केलेली संस्कृत ओळ…
“स तु बाल्यं समारभ्य साधुसेवापरायणः।” अर्थात बालपणापासूनच ते साधू-संतांच्या सेवेत रमलेले होते.
स्वामी रामानंदांचा प्रभाव
संत सेना महाराजांचा संबंध स्वामी रामानंदांच्या शिष्यपरंपरेशी जोडला जातो.रामानंदांच्या शिष्यपरंपरेत विविध सामाजिक स्तरांतील भक्तांचा समावेश असल्याचे भक्तमाल परंपरेत आढळते.या परंपरेशी संबंधित संतांमध्ये—कबीर ,रविदास, धन्ना ,पीपा ,सेनाजी यांचा उल्लेख आढळतो.भक्तीचा अधिकार हा कोणत्याही एका सामाजिक घटकापुरता मर्यादित नसून प्रत्येक व्यक्तीला भगवंतप्राप्तीचा समान अधिकार आहे, ही भारतीय भक्तिपरंपरेची भूमिका येथे दिसते.
जीवनाचा केंद्रबिंदू “संतसेवा”..
सेना महाराजांच्या जीवनात संतसेवेला विशेष स्थान होते.“साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।” अशी त्यांची भावना होती.संतसेवेत ते इतके तल्लीन होत की कधी कधी राजदरबारातील सेवेलाही विलंब होत असे.मात्र त्यांच्या दृष्टीने संतसेवा ही केवळ वैयक्तिक धार्मिक कृती नव्हती.ती समाजसेवा , संतसंग ,संस्कार आणि भक्तीचा मिलाफ होती.
विठ्ठलभक्तीचा ध्यास

सेना महाराजांच्या मनात पंढरपूर आणि विठ्ठलदर्शनाची तीव्र ओढ होती.पंढरी ही त्यांच्यासाठी केवळ तीर्थक्षेत्र नव्हती. ती भक्तीची भूमी, संतसंगाची भूमी आणि सामाजिक एकात्मतेची भूमी होती.
“पांडुरंग ध्यानी । पांडुरंग मनी ।
जागृती स्वप्नी पांडुरंग ॥”
“सेना म्हणे चला जाऊ पंढरीसी ।
जिवलग विठ्ठलाशी भेटावया ॥”
अलौकिक प्रसंग
तरुण वयात सेनामहाराजांचा विवाह सुंदरबाईंशी झाला. वडील देविदास वृद्ध झाल्यानंतर त्यांनी राजदरबारातील आपली सेवा आणि व्यवसाय सेनामहाराजांकडे सोपविला. वडिलांच्या निधनानंतर सेनामहाराजांनी राजसेवा अत्यंत निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने स्वीकारली. मात्र, त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता, नामस्मरण, भजन, पूजन आणि संतसेवा. सेनामहाराजांच्या घरी वारकरी, संत आणि यात्रेकरूंचे नेहमी आगमन होत असे. संतांचे आदरातिथ्य करण्यात त्यांना विशेष आनंद मिळे. ‘साधुसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।’ या भावनेने ते संतसेवेत तल्लीन होत. त्यामुळे कधी कधी राजदरबारात जाण्यास उशीर होई आणि राजा वीरसिंह त्यांच्यावर नाराज होत असे.
राजसेवेचे बंधन असतानाही सेनामहाराजांच्या मनात पंढरीच्या वारीची आणि विठ्ठलदर्शनाची तीव्र आस होती. पंढरीतील विठ्ठल हा केवळ देव नसून आपल्या जीवनाचा आधार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात सतत ‘पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी। जागृती स्वप्नी पांडुरंग॥’ हा भाव जागृत असे.कर्तव्यनिष्ठ राजसेवा, निःस्वार्थ संतसेवा आणि अखंड विठ्ठलभक्ती या त्रिसूत्रीने सेनामहाराजांचे जीवन घडले.
पांडुरंगाची कृपा
संतसेवेत तल्लीन झाल्यामुळे सेनामहाराजांना राजदरबारात जाण्यास उशीर झाला. संतापलेल्या राजा वीरसिंहाने त्यांना शिक्षा करण्याचा आदेश दिला. मात्र, भक्ताच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने सेनामहाराजांचे रूप धारण करून राजाची हजामत केली, अशी संतपरंपरेतील कथा आहे.राजाला त्या दिव्य स्पर्शातून विलक्षण अनुभूती आली. त्याचा रोग नाहीसा झाला आणि आरशात त्याला सेनामहाराजांच्या रूपातील चतुर्भुज पांडुरंगाचे दर्शन झाले. देवाने दिलेल्या सुवर्णमुद्रा सेनामहाराजांच्या धोकटीत ठेवल्या आणि तो अंतर्धान पावला. नंतर सेनामहाराज प्रत्यक्ष राजदरबारात पोहोचले तेव्हा राजाला या चमत्काराची अनुभूती झाली. धोकटीतील सुवर्णमुद्रा पाहून सेनामहाराजांना ‘भक्ताच्या संकटसमयी विठ्ठल धावून येतो’ याची प्रचिती आली. राजाने सेनामहाराजांना साष्टांग नमस्कार करून गुरुकृपेची याचना केली आणि त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली. या प्रसंगातून भक्ती, नम्रता, संतसेवा आणि ईश्वरावरील अखंड श्रद्धा यांचे महत्त्व अधोरेखित होते. पुढे सेनामहाराजांचे मन प्रपंचातून विरक्त झाले आणि त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला.
पंढरीचा अनुभव
पंढरपुरात आल्यावर सेना महाराजांनी अनुभवलेली गोष्ट विशेष महत्त्वाची आहे.चंद्रभागेत स्नान, पुंडलिकदर्शन आणि विठ्ठलदर्शन यानंतर
“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा”
“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशव भेटताची ॥”
पंढरीत येणारे विविध समाजघटक, विविध प्रांतांतील वारकरी आणि संत यांचा सहवास सेना महाराजांना अत्यंत प्रिय होता.वारकरी परंपरेत आणि पंढरीच्या वारीत “मी कोण?” यापेक्षा “मी विठ्ठलाचा वारकरी.” ही ओळख महत्त्वाची ठरते.हीच भावना सामाजिक समरसतेला बळ देते.
संतपरिवाराशी नाते
सेना महाराजांच्या काळातील संतपरंपरेत संत ज्ञानेश्वर ,संत नामदेव ,संत जनाबाई ,संत चोखामेळा ,संत गोरा कुंभार , संत सावता माळी , संत नरहरी सोनार , संत परिसा भागवत अशा संतांचा समावेश होता. सेना महाराजांनी या संतपरंपरेचा गौरव आपल्या अभंगातून केला..
“ज्ञानदेव गुरू ज्ञानदेव तारू।
उतरील पैल पारू ज्ञानदेव ॥”
“ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता।
तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥”
ज्ञानेश्वरांविषयीचा हा भाव गुरुभक्ती आणि संतपरंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. संत जनाबाईंच्या अभंगात सेना महाराजांचा उल्लेख येतो
“सेना न्हावी भक्त भला। तेणे देव भुलविला ॥”
हा उल्लेख सेना महाराजांच्या निःसीम भक्तीची समकालीन संतांनी केलेली पावती म्हणून पाहिला जातो.
सेवा आणि सामाजिक समरसता
सेना महाराजांच्या जीवनात सेवा हीच साधना होती. ते सामान्यांची सेवा करीत, संतांची सेवा करीत, गरजूंची मदत करीत, भेदभाव न करता लोकांशी वागत, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत.
स्वधर्म आणि कर्तव्य
सेना महाराजांनी व्यवसायाकडे कमीपणाने पाहिले नाही. “एका स्वधर्म विचार। धंदा करी दोन प्रहर।” आपले काम कोणतेही असो, ते प्रामाणिकपणे, कौशल्याने आणि समाजोपयोगी भावनेने करणे महत्त्वाचे हा संदेश मिळतो.
नाम महिमा
सेना महाराजांच्या अभंगांत नामस्मरणाला अत्यंत महत्त्व आहे.
“नाम घेता विठोबाचे।
भय नाही कळिकाळाचे ॥”
“नाम साधनाचे सार।
भवसिंधू उतारी पार ॥”
त्यांच्या मते नामस्मरण हे सहज, सर्वांसाठी खुले आणि मनशुद्धीचे प्रभावी साधन आहे.
अंतःकरणाची शुद्धता
“हित व्हावे मनासी।
दवडा दंभ मनासी ॥”
“चित्तशुद्धी करा।
न देई दुजियासी थारा ॥”
सेना महाराजांच्या भक्तीमध्ये बाह्य कर्मकांडापेक्षा चित्तशुद्धीला महत्त्व आहे.
त्यांच्या मते दंभ ,अहंकार ,द्वेष , दुजाभाव नको , केवळ चित्त शुद्ध हवे.
प्रपंचाविषयी त्यांची भूमिका
सेना महाराजांनी प्रपंचाचा निषेध केला नाही, परंतु प्रपंचातील आसक्ती आणि मोहापासून सावध केले.
“सेना म्हणे प्रपंच भ्रमाचा भोपळा।
आत कडू पोकळा, वरी चमके ॥”
यातून बाह्य आकर्षणाच्या मागे न धावता आध्यात्मिक जीवनाचा विचार करण्याचा संदेश मिळतो.
संतसंग
“संताचे पाय मस्तकी।
सरतो झालो तिही लोकी ॥”
सेना महाराजांच्या दृष्टीने संतसंग म्हणजे संस्कार , ज्ञान , भक्ती , विवेक , आत्मशुद्धी , समाजबंधुभाव यांचा स्रोत.
महाराष्ट्राबाहेरील कार्य
सेना महाराजांचे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही, अशी संतपरंपरेतील माहिती आहे. त्यांनी मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश ,पंजाब ,राजस्थान ,गुजरात ,बिहार ,उत्तर भारतातील इतर प्रदेश येथे भक्तीचा संदेश पोहोचविला.त्यांच्या नावाशी संबंधित ‘सैन पंथ’ उत्तर भारतात विकसित झाल्याचेही उल्लेख आढळतात.
गुरुग्रंथसाहिबमधील सेना महाराज
संत सेना महाराजांच्या नावाने प्रचलित असलेल्या पदाचा समावेश शिखांच्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आढळतो.यामुळे त्यांच्या भक्तिपरंपरेचा प्रभाव उत्तर भारतातील व्यापक भक्तीचळवळीशी जोडला जातो.
संत सेना महाराजांच्या रचना
परंपरेनुसार त्यांच्या नावावर विविध प्रकारच्या रचना आढळतात अभंग ,ओवी ,गवळणी ,विराणी ,पाळणा ,आरती ,भारूड ,हिंदी पदे .त्यांच्या रचनांची भाषा साधी, सहज आणि लोकजीवनाशी जोडलेली आहे.
काही निवडक अभंग
नाममहिमा :- “घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे।”
विठ्ठलभक्ती :- “आम्हा हेचि अलंकार। कंठी हार तुळशीचे।” “नाम घेऊ विठोबाचे। म्हणवू डिग तयाचे।”
आत्मसमर्पण :- “बुडतो भवसागरी। मज काढी बा मुरारी।”
संतविषयक :- “विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर।”
पंढरीविषयी :- “गेलो गेलो पंढरपुरा। ऐकिला नामाचा गजर। स्नान केले चंद्रभागा। दर्शन केले पांडुरंगा॥”
संत सेना महाराजांच्या जीवनातून मिळणारे प्रमुख संदेश
भक्ती ;- ईश्वरभक्ती ही जीवनाचा केंद्रबिंदू असावी.
सेवा;- समाजाची सेवा हीच ईश्वरसेवा.
समरसता :-जन्माधारित भेदांपेक्षा बंधुभाव श्रेष्ठ.
कर्तव्य :- आपले काम प्रामाणिकपणे करणे हीदेखील साधना.
आत्मशुद्धी:- दंभ, अहंकार, काम, क्रोध आणि विकारांवर विजय मिळवणे.
संत सेना महाराज आणि ‘सामाजिक समरसता’
“आपण सर्व एकाच समाजाचे घटक आहोत, परस्परांमध्ये आत्मीयता आहे आणि सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.” संत सेना महाराजांचे जीवन हीच भावना प्रत्यक्ष जगताना दिसते. त्यांच्या सेवेत समोरची व्यक्ती कोणत्या जातीतली आहे यापेक्षा ती माणूस आणि भगवंताचीच अंशरूप व्यक्ती आहे, हा भाव महत्त्वाचा होता.
आजच्या समाजासाठी संत सेना महाराजांचा संदेश
जातीय तणावाऐवजी समरसता , अहंकाराऐवजी विनय , दिखाव्याऐवजी आचरण , स्वार्थाऐवजी सेवा , विभाजनाऐवजी एकात्मता , विकारांऐवजी आत्मशुद्धी , निराशेऐवजी नामस्मरण आणि श्रद्धा या सर्व मूल्यांचा जीवंत आदर्श संत सेना महाराजांच्या जीवनातून दिसतो.
संदर्भ –
https://www.youtube.com/watch?v=2ORHdjabEl0
https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-sena-maharaj/
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C
https://santmahant.in/sant-sena-maharaj-information-in-marathi/
https://www.youtube.com/watch?v=BDy761ZOpXo
https://www.mmarathi.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-2/
https://nabhikparivar.com/sant-sena-maharaj-was-a-great-and-popular-sant/
https://iplmemes.com/sant-sena-maharaj-information-in-marathi/
https://www.youtube.com/watch?v=LG7uCZLnVGE
https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-jalgaon-shri-sant-sena-maharaj-punyatithi-article-bms86
https://www.facebook.com/608967619188554/photos/a.609274015824581/682034625215186/?type=3
https://sahyadribooks.com/sant-sena-maharaj/
https://maharashtratimes.com/editorial/article/santa-sena-maharaj/articleshow/40671203.cms
https://www.lokmat.com/bhakti/see-how-panduranga-shaved-emperor-save-sant-sena-maharaj-a679/
https://www.youtube.com/watch?v=Js9Wl26taro
https://warkarirojnishi.in/2017/09/sant-sena-nhavi-maharaj-samadhi-abhang/
https://gathacognition.com/site/bookstore_details/329
https://marathisahitya.com/3460/
https://www.postboxindia.com/sant-sena-maharaj/?amp=1
https://vishwakosh.marathi.gov.in/25074/
https://www.youtube.com/watch?v=zTYg4Kom_RU
https://www.youtube.com/watch?v=2_pMfq-4bb8
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/kolhapur/lord-vitthal-take-avatar-of-barber-beacuse-of-devotion-of-sant-sena-maharaj/mh20220820163222906906745
https://www.transliteral.org/pages/z70626143245/view
https://warkari.wordpress.com/sena-1/
https://www.youtube.com/watch?v=3iLb1OL6ZeA
https://vidarbha24news.blogspot.com/2017/04/blog-post_753.html
https://www.evivek.com/Encyc/2020/6/27/Shri-Sant-Sena-Maharaj-Charitra-.html
https://mismoroxicist.com/click.php?key=y766er8t5i7rertrrpbb&SUB_ID_SHORT=27804ae57b154368464c5fe9ed63c7b2&PLACEMENT_ID=17697640&CAMPAIGN_ID=803061&PUBLISHER_ID=86473&ZONE_ID=1991080
https://www.evivek.com/Encyc/2020/6/27/Shri-Sant-Sena-Maharaj-Charitra-.html
https://www.youtube.com/watch?v=zTYg4Kom_RU
https://www.youtube.com/watch?v=2_pMfq-4bb8
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/kolhapur/lord-vitthal-take-avatar-of-barber-beacuse-of-devotion-of-sant-sena-maharaj/mh20220820163222906906745
https://www.transliteral.org/pages/z70626143245/view
https://warkari.wordpress.com/sena-1/
