HinduismNews

गणेशोत्सव – कुटुंबवत्सल उत्सव

घरी गणपती येणार म्हटले की डोळ्यासमोर सहज उभे राहते ते आनंदाचे वातावरण. बालगोपालांपासून ते वयोवृद्ध मंडळींपर्यंत केवळ आणि केवळ उत्साह!! गणेशोत्सव म्हणजे कुटुंबाला बांधून ठेवणारा, नाती दृढ करणारा असा उत्सव!!

गणपती ही देवताच कुटुंबवत्सल आहे. जेव्हा कार्तिकेय आणि गणपती मध्ये पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लागली, तेव्हा कार्तिकेय मोरावर बसून जग फिरायला गेला. पण बाप्पांनी आपल्या आई-वडिलांना म्हणजे शिव-पार्वतीला – मध्यभागी बसवून त्यांचीच प्रदक्षिणा केली आणि म्हणाले “माझ्यासाठी माझे आई-वडील हेच माझे विश्व आहे.” या कृतीमुळेच त्यांना प्रथम पूजेचा मान मिळाला. हा कुटुंबाला प्राधान्य देण्याचा सर्वात मोठा संदेश आहे.

बाप्पा फक्त पुत्र नाहीत, तर ते स्वतः उत्तम पती आणि पिता सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत नेहमी त्यांच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी म्हणजेच यश आणि ज्ञान आणि पुत्र शुभ (शुभत्व) आणि लाभ (समृद्धी) हे सुद्धा असतात!! म्हणजेच जिथे ज्ञान आणि यश येतं, तिथे आपोआप शुभ आणि लाभ येतात – हा कुटुंबाचा खरा अर्थ बाप्पा शिकवतात. बाप्पा आपल्या आई वडिलांसोबतच राहतात ही त्यांचे वैशिष्ट्य!! आणि म्हणूनच असा हा बाप्पा आपल्या घरी आणण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे.

आपल्या कोकणात तर या उत्सवाचे महत्व अधिकच आहे. कोकणातून व्यवसायासाठी बाहेर असलेली मंडळीसुद्धा वर्षभरात किमान या दिवसात कोकणातच आपल्या घरी आलेली पहायला मिळतील. माझ्या माहितीत अशी बरीच कुटुंब आहेत की तीन चार पिढ्यातली मंडळी या निमित्त गावातल्या घरी जमतात. त्यानिमित्त एकमेकांची विचारपूस, सुख दुःखांची देवाणघेवाण होते. सर्वजण गणपतीची आरास, पूजेची व्यवस्था, बाप्पासमोर आणि घराबाहेर काढली जाणारी सुंदर रांगोळी, मोदकासह निरनिराळे पदार्थ बनवायला हातभार लावतात. जोरदार आरती, भजन, गप्पगोष्टी, हसणे खिदळणे असे भरलेले आणि भारून टाकणारे वातावरण!! गावांमध्ये घराघरात गणपती येतो. त्यामुळे स्वतःच्याच घरी नव्हे तर गावातील शेजारीपाजारी यांच्या घरी जाणे, जुन्या आठवणी जाग्या करणे, बालपणीच्या आठवणीत रमणे…. हे आणि असे कितीतरी!! गणपती सोबतच येणाऱ्या गौरी, त्यांचे जेवण, त्यानिमित्त घरातील आणि गावातील सुवासिनी यांची लगबग….. आणि हे सर्व प्रसन्न आणि हवे हवेसे वाटणारे वातावरण त्या बाप्पांच्या साक्षीने!!

मंडळी, आत्ताच्या काळात आपण कुटुंबव्यवस्था, नाते संबंध हरवत चाललो आहोत, संवाद कमी होतोय वगैरे ऐकत असतो…. नव्हे तसा सर्वसाधारण अनुभवही आहे. त्यामुळेच या उत्सवाचे महत्व अधोरेखित होते!!

१. हा उत्सव म्हणजे पिढ्यांना जोडणारा धागा आहे. अनेक पिढ्या एका छताखाली काही दिवस का होईना एकत्र येतात. निरनिराळी नाती एकत्र येतात. त्यातून होणारा संवाद, जुळून येणारे प्रेमाचे धागे याच महत्व शब्दातीत आहे.

२. एकत्र सर्वांनी मिळून काम करण्याची सवय यानिमित्त लागते. अनेक कामे वाटून घेउन सहजपणे केली जातात. रुसवे फुगवे विरून जातात. हसणे खिदळणे, गप्पा गोष्टी यात दिवस कसे जातात कळतही नाही!!

३. या निमित्त आपले मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारीपाजारी घरी दर्शनाला येतात. आपण त्यांच्या घरी जातो. यातून सुद्धा गाठीभेटी आणि जुन्या आठवणी जागवल्या जातात. जुनी नाती पुन्हा एकदा जागी केली जातात!!

४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराला घरपण देणारा हा उत्सव आहे. घरातील आणि घराबाहेरील सर्व सदस्य एका छताखाली काही दिवस एकत्र येतात आणि “आमच्या घरी बाप्पा आला आहे” असे आनंदाने सांगतात!! रुसवे फुगवे विरून जातात. मोठ्यांचा आदर आणि सन्मान, बरोबरीच्यांशी थट्टा मस्करी आणि लहान मुलांचे कौतुक यानेच घरात चैतन्य पसरलेले असते….

आणि या वातावरणाचा परिणाम म्हणजे जेव्हा गणपती बाप्पांचे विसर्जन करायची वेळ येते तेव्हा सर्वांचे डोळे आपसूकपणे पाणावलेले असतात. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असे म्हणत असताना स्वर कातरलेले असतात…. बाप्पा आता वर्षभरासाठी भेटणार नाहीत आणि त्याच बरोबर घरी आलेले आप्त स्वकीय आता पुन्हा आपापल्या स्थानी परत जाणार आणि घर रिकामे होणार यामुळेसुद्धा. सर्वांनी मिळून बाप्पांचा प्रसाद, आरत्या, स्वादिष्ट भोजन आणि त्याचसोबत घरभर पसरलेले आनंदाचे वातावरण याच्या आठवणीने डोळे भरून येतात.

मंडळी, आपल्या सनातन संस्कृतीत सणांना फार महत्व आहे कारण प्रत्येकात समाजाला जोडणारे काही ना काही बलस्थान आहे. गणेशोत्सवात आपल्याला कुटुंब वत्सलता जपण्याचा संदेश आहे. सध्याच्या सामाजिक वातावरणात तर याची फारच आवश्यकता आहे. कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण झाले की त्याचे सकारात्मक परिणाम समाजात सहजपणे दिसू लागतील. त्यामुळेच गणपती बाप्पांचा हा उत्सव, त्याचे महत्व आपण पुढील पिढीपर्यंत संक्रमित करणे अत्यंत आवश्यक आहे.

गणपती बाप्पा मोरया..

लेखक :- अरविंद श्रीधर जोशी

Back to top button