सेवाज्ञ संस्थानम् यांच्या राष्ट्रीय उपक्रम ‘युवा धर्म संसद-२०२६’चा शुभारंभ
उज्जैन : ‘सेवाज्ञ संस्थानम्’ यांच्या राष्ट्रीय उपक्रम ‘युवा धर्म संसद-२०२६ अवंतिका’चा शुभारंभ उज्जैन येथील गीता भवनात झाला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते ‘युवा धर्म संसद अवंतिके’चे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘सेवाज्ञ संस्थानम्’चे संरक्षक पूज्य आचार्य मिथिलेशनंदिनीशरणजी महाराज, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, तसेच ‘सेवाज्ञ संस्थानम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष आशीष कुमार आशू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या युवा धर्म संसदेत देशभरातील जवळपास २५ राज्यांमधून सुमारे १,६०० युवक-युवती सहभागी झाले आहेत. याव्यतिरिक्त ३०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, संशोधक, विद्वान आणि धर्माचार्य सहभागी झाले असून, ते धर्म, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्माणाशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणातील मुद्दे-
- सेवाज्ञ संस्थानम् यांच्या राष्ट्रीय उपक्रम ‘युवा धर्म संसद-२०२६’च्या उद्घाटन सत्रात बोलत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी धर्म म्हणजे केवळ वृद्धावस्थेतील आचरण किंवा धार्मिक विधी, ही धारणा नाकारली.
- “धर्माचा विचार तारुण वयापासूनच सुरू झाला पाहिजे. धर्म हा जीवनाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत मनुष्याच्या आचरणाला आणि निर्णयांना दिशा देणारा घटक आहे. सुख-दुःख येत-जात असतात; मात्र धर्म शाश्वत राहतो. तो मनुष्याच्या जीवनातील कर्तव्य, आचरण आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याचे कार्य करतो.” असे ते म्हणाले.
- डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून धर्म आणि ‘रिलिजन’ यांतील फरक स्पष्ट केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “धर्माचा अर्थ केवळ ‘रिलिजन’ या संकल्पनेपुरता मर्यादित ठेवणे योग्य नाही. धर्म हा शब्द मूळतः ‘धृ’ या संस्कृत धातूपासून घेण्यात आलेला आहे, ज्याचा अर्थ ‘धारण करणे’ असा होतो.

- धर्म हा व्यक्ती आणि समाजाला जोडणारा, त्यांना विखुरण्यापासून रोखणारा आणि सातत्याने प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा शिस्तबद्ध आधार आहे. धर्म म्हणजे जीवनापासून दूर जाणे किंवा सर्व काही त्यागणे नव्हे; तर भौतिक जीवनासोबत आध्यात्मिक उन्नती आणि सामाजिक बांधिलकी यांच्यात संतुलन साधण्याची जीवनदृष्टी होय.”
- “निसर्गाच्या दृष्टीने मनुष्याच्या क्षमता मर्यादित असल्या, तरी बुद्धीच्या सामर्थ्यामुळे तो सृष्टीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकला आहे. त्यामुळे सृष्टीप्रतीचे उत्तरदायित्वही त्याच्याशी जोडलेले आहे. त्यामुळे युवकांनी जीवनात परिश्रम आणि आर्थिक प्रगती साधतानाच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, मनुष्याने आपल्या गरजा पूर्ण करण्यासोबतच इतरांच्या हिताचा आणि कल्याणाचाही विचार केला पाहिजे.” यासोबतच त्यांनी सत्य, करुणा, शुचिता आणि तप हे मानवी धर्माचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहेत हेही अधोरेखित केले.
- धर्म म्हणजे केवळ मोठमोठे सिद्धांत किंवा व्याख्याने नाही. तर, जेवण केल्यानंतर कचरा न टाकणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, इतरांना त्रास न देणे, आपल्या कर्तव्यांचे पालन करणे आणि समाजाप्रती जबाबदारी निभावणे, हे देखील धर्माचरणाचाच भाग आहे. धर्माचे खरे स्वरूप केवळ पुस्तके वाचण्यात किंवा त्याविषयी बोलण्यात नसून, तो आपल्या आचरणात किती उतरला आहे यातून दिसून येते. असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
- युवकांनी वैयक्तिक यशाचा संबंध व्यापक सामाजिक यशाशी जोडून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. “एखाद्या व्यक्तीचा विजय तेव्हाच सार्थक ठरतो, जेव्हा त्या विजयामध्ये इतरांचाही समावेश असतो. ज्ञान, दान आणि दुर्बलांच्या संरक्षणाची भावना मनात ठेवून युवकांनी पुढे जावे.” असा संदेश त्यांनी दिला.
- तसेच, आपल्या उपासना पद्धती आणि परंपरांप्रती दृढ श्रद्धा असणे तर गरजेचे आहेत पण त्यासोबतच इतरांच्या उपासना पद्धतींचा आदर करणे, हा भारतीय जीवनदृष्टीचा महत्त्वपूर्ण पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले.
