“अवघा रंग एक झाला”.. या १९ भागाच्या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
नाम-रूप भेदापलीकडे जाऊन भक्तिमार्ग दृढ करणारे माउली ज्ञानेश्वर महाराज ..
महाराष्ट्राच्या संत परंपरेने नेहमीच समाजाचा भक्तिमार्ग प्रदत्त केला आहे. त्या सत्त्वसंपन्न संप्रदायाची आराध्य इष्टदेवता “श्रीमद पांडुरंग”..या भक्तिपरंपरेतील श्रीगुरू निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांपासून थेट संत गाडगे महाराजांपर्यंतची संतमालिका, हे महाराष्ट्रचे वैभव-ऐश्वर्य आहे. या सकल संतमालिकेचा महाराष्ट्राच्या जडणघडणीतील वाटा फारच मोठा. ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणूनही या संतांच्या कार्याची नोंद काही अभ्यासकांनी केलेली आहे. प्रबोधन चळवळीतील न्या. म. गो. रानडे यांनी The Rise of Maratha Power या ग्रंथात संत मंडळींच्या कार्याचे योगदान अधोरेखित केले आहे. जिहादी मोगल बादशहा-सुलतानांना शह देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा जो भीमपराक्रम केला, त्यामागे संत-महात्म्यांनी केलेल्या समाजजागृतीचा, स्वधर्म-स्वदेश चेतनेचा मोठा वाटा आहे. हे न्या. रानडे यांनी न्यायाधीशाच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे.

संत ज्ञानदेव हे सकल संत परंपरेचे मेरूमणी आहेत. मराठी साहित्य शारदेच्या गळ्यातील कंठमणी आहेत. अनेक संतांचे सांगाती, परात्पर गुरू, मार्गदर्शक आणि वारकरी भक्ती आंदोलनाचे प्रवर्तक आहेत. म्हणूनच सकल संतांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया|’ अशा श्रद्धाभावाने त्यांना वंदन केलेले आहे. महान योगी, प्रतिभासंपन्न महाकवी, तत्त्वज्ञ,विनय व वात्सल्याची प्रत्यक्ष मूर्ती असलेल्या संत ज्ञानदेवांची विठ्ठलभक्ती भावभक्तीचा अनुपम संगम आहे.विठ्ठलाची एकविध भक्ती हा वारकरी पंथाचा मुख्य आचार शास्त्र आहे. पण त्याचबरोबर नाम-रूप भेदापलीकडे ईश्वरी तत्त्व एकच आहे. त्यांच्या अशा उदात्त समरस दृष्टीला विठ्ठल, राम, कृष्ण, शिव सारे एकच…
संत ज्ञानेश्वरांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे “ज्ञानेश्वरी.” त्या काळात संस्कृत ही पंडितांची,विद्वानांची भाषा होती. सामान्य लोकांसाठी धर्मग्रंथ समजून घेणे अशक्यप्राय होते. अशा वेळी ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरील गहन तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत, ओवी छंदात मांडले. त्यांनी आपल्या ग्रंथाला ‘भावार्थदीपिका’ असे नाव दिले, कारण त्यात त्यांनी भावार्थरूपी दिव्याने गीतेतील प्रत्येक विचार प्रकाशित केला. ती मराठी भाषेला ज्ञान आणि अध्यात्माचा एक अनमोल ठेवा देणारी कलाकृती आहे. त्यांच्या अमृतानुभव या ग्रंथात त्यांनी आत्मा, ब्रह्म आणि जीव यांच्यातील संबंधांवर सखोल चिंतन केले. त्यांनी अत्यंत वेगळ्या शैलीत आणि नवीन दृष्टिकोनातून अद्वैत तत्त्वज्ञान समजावून सांगितले. ‘चांगदेव पासष्टी’सारख्या रचनांमधून त्यांनी अहंकार व ज्ञानाचा योग्य संगम कसा असायला हे विशद केले.
ज्ञानेश्वरांचे कार्य सामाजिक क्रांतीचे प्रतीक होते. त्यांच्या काळात समाजामध्ये जातिभेद आणि कर्मकांडांचे प्राबल्य होते. त्यांच्या कुटुंबालाही संन्याशाच्या संततीमुळे बहिष्कृत करण्यात आले. किंतु ज्ञानेश्वरांनी या सामाजिक विषमतेला प्रखर विरोध करत समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला जो आजही समता आणि भगवतभक्तीवर आधारित आहे.
माउली ज्ञानेश्वरांनी अवघ्या २१ वर्षांच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या मातीला ज्ञान, भक्तीचा सुगंध दिला. त्यांचा जन्म जरी १३व्या शतकात झाला असला तरी त्यांचे विचार, साहित्य व त्यांनी घालून दिलेली जीवनमूल्ये आजही तितकीच प्रासंगिक आहेत. ज्ञानेश्वरांचे पसायदान हे त्यांच्या विश्वकल्याणाच्या भावनेचे प्रतीक आहे. त्यात त्यांनी “दुर्जनांचे दुर्जनत्व नष्ट होवो आणि सज्जनांची भरभराट होवो,” अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली आहे. ही प्रार्थना संपूर्ण मानवजातीसाठी आहे. आजच्या जगात जिथे संघर्ष, द्वेष आणि अशांतता दिवसागणिक वाढत असताना ज्ञानेश्वरांच्या या विश्वव्यापी प्रार्थनेची संबंध मानवतेला अत्यंत गरज आहे.
ज्ञानेश्वरांनी सामाजिक एकता आणि मानवी कल्याणाचा पाया रचला. त्यांचे विचार, भाषा, जीवनमार्ग आजही आपल्याला मार्गदर्शन करतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर हे केवळ एक संत नसून ते एक असे दीपस्तंभ आहेत ज्यांचा एकात्म भक्ती प्रकाश युगानुयुगे मानवी जीवनाला मार्ग दाखवत राहणार आहे.