संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचे हे ३४१ वे वर्ष. पावसाने जोर धरल्यामुळे इंद्रायणीने उच्च पातळी गाठली आहे. राज्य शासनाने श्रीक्षेत्र देहू येथील वारकऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे तसेच अन्य वारकऱ्यांनी पुण्याहून पालखीत सामील होण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांचा सन्मान ठेवत श्री क्षेत्र देहूगाव हुन पालखी निघाली. वारकऱ्यांची संख्या रोडावली असली तरी देहू गावात भक्तीचा नाद तेवढाच घुमला जेवढा इतर वर्षांत होता.
देहूपासून दूर असलेल्या वारकऱ्यांच्या मनात वारीत सामील होण्याची तीव्र इच्छा आहे…पुण्यात तरी पालखी गाठता यावी या आशेने हजारो वारकरी लगबगीने चालत निघाले आहेत.
https://www.facebook.com/VSKKokan/?ref=embed_page#
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥” या संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा वारीत पदोपदी प्रत्यय येतो. जात, पंथ, भाषा, स्त्री-पुरुष , श्रीमंत-गरीब असे सर्व भेद विसरून लाखो वारकरी एका भक्तिरंगात रंगून जातात. पंढरीची वारी म्हणजे एकता, एकात्मता, समरसता, सेवा या हिंदूंच्या सांस्कृतिक वैभवाचे खुले प्रदर्शन. आषाढी एकादशीपर्यंत विठुरायाच्या भेटीसाठी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची स्थिती “आनंदाचे डोही आनंद तरंग” ….अशी होते.
टाळ-मृदंगाचा गजर, अभंगांचा निनाद, फुगड्या, रिंगण आणि संत-वारकऱ्यांची ही मांदियाळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे, लोकशक्तीचे आणि भक्तीपरंपरेचे अद्वितीय दर्शन घडवणारी वारी पुढे १९ दिवस चालणार आहे.