“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य करणारे संत संताजी जगनाडे महाराज…
संत श्री संताजी जगनाडे महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी इ.स. ८ डिसेंबर १६२४ रोजी आई माथाबाई आणि वडील विठोबा या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे आजोळ मावळ तालुक्यातील सुदुंबरे हे होते. त्यांचे आई वडील हे दोघेही विठ्ठलभक्त.. त्यामुळे संताजींवर बालपणापासूनच धर्म शास्त्राचे संस्कार झाले. लहानपणापासूनच त्यांना कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय होती. त्यामुळे नंतर ते संत तुकाराम महाराजांचे निकटचे शिष्य व कीर्तनातील टाळकरी झाले.
संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. त्यात संताजी रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात असत. त्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ माणूस त्यांना दिसला. संताजींनी नैवेद्याच ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. परंतु नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजींनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी म्हणाले की, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहान असतानाच त्यांना जनमानसातील ईश्वराची ओळख झाली होती.
गुरु संत तुकाराम महाराज..
एके दिवशी संत तुकाराम महाराजांचे संताजींच्या गावात असणाऱ्या चक्रेश्वर मंदिरात कीर्तन होते. ह्या कीर्तनाला गावातली तसेच बाजूच्या गावाहून बरेच लोक आले होते. संताजीही कीर्तन ऐकण्यास गेले होते. संत तुकाराम महाराजांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या विषयावर कीर्तन केले. त्या किर्तनामुळे संताजींच्या मनावर मोठा प्रभाव पडून त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. संताजींनी लगोलग तुकाराम महाराजांची भेट घेतली. तुकाराम महाराजांनी संसार करत असताना परमार्थ साधता येतो हे संताजींना समजावून सांगितले.
“ज्याने गुरु नाही केला, त्याचा जन्म वाया गेला” आपण अजूनपर्यंत गुरु केला नाही. गुरु शिवाय मार्ग मिळत नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाही म्हणून त्यांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले. तेव्हापासून संत जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवीत असत.
अभंगाच्या गाथांचे पुनर्लेखन..
तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगाची गाथा पाण्यात बुडाली..परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ती अभंगाची गाथा पुनर्लिखित केली.
तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी म्हंटले आहे,
“संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित वसे जवळ |
धन्य त्याचे सबळ | सांग सर्वकाळ तुक्याचा | “
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. तसेच संताजी महाराजांनी ‘तेलसिंधु, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचा नावाचे ग्रंथ देखील लिहिले. त्यांनी “सिंधु” या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती दिलेली आहे. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके, उपमा, अलंकारांचा मिलाप त्यांच्या अभंगात आपल्याला पाहायला मिळतो.
“आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा | नंदी जोडीयेला मन पवनाचा ||
भक्ती हो भावाची लाट टाकीयीली। शांती शिळा ठेविली विवेकावरी।”
