आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जाणिवेची वारी
“अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर”.. “विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला”… “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”.. “विठू माऊली तू माऊली जगाची”
मंडळी. हे शब्द, अभंग आपल्या परिचयाचे आहेतच!! विठू माऊली च्या प्रेमाने ओथंबलेले एकूण एक वारकरी पंढरपूर ची वाट चालत चालत तहान भूक विसरून या विशाल भक्ती संगमात सहभागी होत असतात. खरच या पृथ्वीतलावरचा एक अद्भुत आणि विशाल सोहळा!!
ही विठुरायाची वारी गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरू आहे.अपवाद फक्त कोरोना महामारीची दोन वर्षे!!. विठू माऊलीच्या दर्शनासाठी शेकडो मैल पायी चालत जाणारी लाखो भाविक मंडळी.वारकरी मंडळी. खरच काय शक्ती असेल की जी या सर्वांना हे बळ देत असेल. याचे सोप्पे उत्तर म्हणजे भक्ती भाव!! स्वतःच्या सर्व चिंता, दुःख मागे सोडून देऊन जवळपास १९-२० दिवस ही मंडळी विठूच्या दर्शनाच्या ओढीने ही बिकट वाट त्याच्या भक्ती साधनेच्या जोरावर चालत असतात!! ज्ञानोबा माऊलींनी ही भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ही भक्तीची वारी सुरू केली असे म्हटले जातं. ज्ञानेश्वर माऊली हे त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांचे शिष्य. नाथ पंथाचे उपासक. आणि त्यांनीच या वारीपद्धतीची पायाभरणी केली. ज्ञानोबांच्या पूर्वीपासून अगदी त्यांच्या घराण्यातही पंढरपूरच्या वारीची प्रथा होतीच, पण ती व्यक्तिशः ,मात्र संघटितपणे, एकजुटीने वारीची परंपरा ज्ञानोबांनी सुरू केली!! या वारीला पालखीचे स्वरूप तुकाराम महाराजांच्या धाकट्या सुपुत्राने, नारायण महाराजांनी, घालून दिले!
विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत! अध्यात्माच्या साधकांचे, संत महंतांचे विठू माऊली हे जणू आराध्यच. या विठुमाऊलींच्या आसऱ्याला अनेक संतमहंतांची मांदियाळी आपण पाहतो. हजारो भक्त वारकरी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन, डोक्यावर तुळस घेऊन मोठ्या श्रद्धेने सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात. कदाचित खिशात एकही पैसा नसतो, खायला बरोबर काही नसतं, झोपायला आडोसा नसतो, अंगावर पांघरायला काही नसतं. पण मंडळी, या भक्तीचा चमत्कार असा की यातील एकाही वारकऱ्याला विठुमाऊली काहीही कमी पडू देत नाही!!
मध्यंतरी माझ्या एका परिचितांनी सांगितलेला अनुभव. ते त्यांच्या मित्रमंडळींसोबत काही कामासाठी बाहेर गेले होते. वाटेत गाडी थांबवून चहापान सूरु होते. त्यावेळी त्यांना एक वारकरी जोडपे दिसले. माऊलीच्या डोक्यावर विठ्ठलरखुमाईची मूर्ती आणि बाबांकडे एक धोपटी. वारीवरून येत होते. या मित्रांनी त्यांना थांबविले, भक्तिभावाने नमस्कार केला आणि चहा पिण्याची विनंती केली. त्यांनीही आनंदाने चहा प्यायला गप्पा मारल्या, वारीचे अनुभव सांगितले. निघताना ती दोघेही आशीर्वाद देत निघाली. तेव्हा या मंडळींनी त्यांना काही पैसे देऊ केले, बराच लांबचा पल्ला होता म्हणून. पण त्या दोघांनीही नम्रपणे पैसे घेणे नाकारले!!. म्हणाले मुलांनो, आमचा विठू सोबत आहे, काळजी करू नका. घरून निघताना एकही पैका सोबत घेतला नव्हता आणि आत्ताही नको!!. ही मंडळी डोळ्यातून अश्रूधारांना वाट मोकळी करून देत नी:शब्द होऊन पाहतच राहिली. ही वारी हा एक भक्तीचा सोहळा असतोच.. पण या वारीमुळे काय साध्य झाले आहे याचा विचार आपण कधी केला आहे का??
ज्ञानेश्वर माऊलींचा काळ आठवून पाहुयात. त्या काळात इथला समाज हा जातीपातींमध्ये विखुरला गेला होता. धर्माच्या नावाखाली अधर्म आणि अन्याय बोकाळला होता.. आणि मुख्य म्हणजे भारतावर इस्लाम चे आक्रमणही झालेले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून समाज जणूकाही मोडकळीला आला होता!!.. त्याच काळात ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संतांवर झालेले अन्याय आपण सर्व जाणतोच… वडील बंधू निवृत्तीनाथ आणि अन्य भावंड यांनी हे सर्व जाणले होते.. आणि म्हणूनच समाजाला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी विद्रोहाचा मार्ग न पत्करता समाजाला जागं करण्याचा आणि जोडण्याचा मार्ग स्वीकारला… आणि तो म्हणजे भक्तीभावाचा मार्ग. भक्ती मध्ये अनन्यसाधारण शक्ती सामावलेली असते.. आणि त्या शक्तीच्या आधारे त्यांनी विठ्ठल भक्ती समाजात रुजवली. अवघा समाज भक्तीने भारून टाकला आणि विठ्ठलाच्या वारीचा मार्ग जनसामान्यांना दाखवून दिला!!
माऊलींनी हा जो भागवत धर्म सांगितला, त्यात विठ्ठलाची भक्ती सांगितली.. आणि भक्तीतून येणारी करुणा, सोज्वळ पणा, साधी राहणी.. मी विठुचा आहे म्हणजेच समाजाचा आहे हा भाव स्वाभाविकपणे जागृत केला!! याचा स्वाभाविक परिणाम हा समस्त हिंदू समाज एकसंध राहण्यात झाला!! या विठू माऊलीच्या मंदियाळीतील संतांचे अवलोकन केल्यास लक्षात येईल की समाजाच्या सर्व जाती ज्ञातीतील मंडळी यात जोडली गेली होती.. इथली अट फक्त एकच.. सावळ्या विठ्ठलाची भक्ती आणि त्यातून स्वाभाविक पणे निर्माण होणारी प्रेमाची भावना!!.. हिंदू समाजात समरसता जगविण्याचे काम या वारीने केले!!.. समाजाला जोडून ठेवण्याचे एक महान काम या वारकरी पंथाने केले आहे. सर्व उभा आडवा समाज यात बांधला गेला. धर्माची बांधिलकी यातूनच सहजपणे मनामनात रुजली गेली.. आणि याचाच स्वाभाविक परिणाम म्हणून इस्लामच्या वावटळीतही हिंदू धर्म या महाराष्ट्र भूमीत टिकून राहिला!!
वारी निरनिराळ्या गावातून जात असते. वाटेत एखाद्या गावात मुक्काम असतो. त्या गावात तर उत्सवी वातावरण असते. गावातील समाज मंदिरात, धर्मशाळेत मुक्कामाची व्यवस्था, सर्व गाव मिळून करत असलेली भोजनाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था. मंडळी मी १९८९ साली सोलापूर भागात संघाचे कामासाठी वारीच्या दरम्यान एका गावात असताना हे अनुभवले आहे. रात्री गावातील काही भाविक मंडळींना या वारकरी मंडळींचे पाय चेपताना, पायाला तेल लावताना आणि तळपायाला कशाच्या वाटीने घासताना पाहिले आहे. त्यावेळी मुखाने हरिनामाचा गजर!! ज्यांची सेवा आपण करतोय तो कोण आहे, कुठून आला आहे, गरीब आहे की श्रीमंत, कोणत्या जातीचा/ ज्ञातीचा आहे याची ना फिकीर ना विचारपूस!! ओळख फक्त एकच की हा वारकरी आहे. पांडुरंगाला भेटायला चालला आहे आणि आमच्यासाठी हीच पांडुरंगाची सेवा!! मंडळी, समाजात समरसता याहून वेगळी काय असू शकते??
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…
लेखक :- अरविंद श्रीधर जोशी
साभार : दैनिक ठाणे वैभव