HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग ३

“अवघा रंग एक झाला”.. या १९ भागाच्या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

पांडुरंगाच्या भक्तीत रममाण होणाऱ्या संत सोयराबाई..

‘स्त्री ही अबला आहे’ हा समज किती पोकळ,संकुचित आहे हे भरतभूमीने शेकडो वर्षांपूर्वीच समस्त जगाला दाखवून दिले आहे. आपल्या संतपरंपरेने स्त्री-पुरुष समानतेचा दृढनिश्चयी समागम केलेला आपल्याला पदोपदी आढळून येईल. माउली ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे भक्तशिरोमणी संत तुकारामांच्या काळात अनेक महान स्त्री संत होऊन गेल्या. या स्त्री संतांनी आपल्या अभंगांमधून केवळ ईश्वराप्रती भक्ती प्रकट केली नाही. उलट तत्कालीन भेदाभेद मानसिकतेवर, विषमतेवर जोरदार प्रहार केला. स्त्री संतांचे कार्य, विचार आजदेखील तितकेच सापेक्ष आहेत. आज आपण विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असलेल्या संत सोयराबाईंबद्दल जाणून घेऊया..

सुंदर शब्द,उत्तम कर्म व निरलस भक्ती यांची उच्चतम पातळी गाठणाऱ्या संत सोयराबाई या संत चोखोबांच्या पत्नी व शिष्या होत्या. तत्कालीन समाजरचनेमुळे संत सोयराबाईंना अनेक यातना, उपेक्षा प्रसंगी प्रतारणा देखील भोगाव्या लागल्या. तरी देखील समस्त समाजाचे भले चिंतणाऱ्या संत सोयराबाई म्हणतात..

“मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीचा राया ॥”

अद्वैत सिद्धांतानुसार संपूर्ण चराचर सृष्टीचा गाभा तो दिव्यात्मा एकच आहे. त्याचाच जर अंश आपल्या सर्वांच्या ठायी आहे. तर यात मी आणि तू या भेदाचे अस्तित्व कसे असू शकेल? असे संत सोयराबाई ठामपणे म्हणतात. भक्तवत्सल पांडुरंगाच्या सान्निध्यात त्याचे शांतचित्त रूप पाहताना आपले सर्व द्वैत गळून आपण निर्विकार होतो.

“अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥”

वरील अभंगात संत सोयराबाईंनी त्यांचे अंतर्मनातले विचार प्रकट केलेले आहेत. अवघा म्हणजे मजजवळ असलेले सर्व काही. माझा सर्व रंग, म्हणजे माझे अस्तित्वच परमेश्वराशी एकरूप झाले म्हणजे या रंगांत श्रीरंग म्हणजेच परमेश्वराचा निवास आहे..

“देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥”

ही ओळ म्हणजे परमेश्वराचे गुणगानच. देही असोनि विदेही म्हणजे देहात असूनही देहाच्या अस्तित्वाची जाणीवच नसणे. थोडक्यात देहात राहूनही देहातून मुक्ती होऊन निर्विकार-निर्गुण अशी अवस्था प्राप्त होणे. संत सोयराबाई विठ्ठलाला सदा समाधिस्त बघत आहेत. म्हणजे भक्त ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होऊन चर सृष्टीत असूनही विदेही अवस्था प्राप्त करणारा होय. एवढा सुंदर भाव संत सोयराबाईंनी आपल्या अभांगातून व्यक्त केला आहे.

आज आपण २१ व्या शतकात स्त्री स्वातंत्र्याच्या, सबलीकरणाच्या निव्वळ गप्पा मारतो. परंतु महाराष्ट्रातील स्त्री संतांनी आपल्याला ‘स्व’ची ओळख करून दिली. स्वतःच्या हक्कांसाठी, विचारांसाठी समाजात कसे उभे राहायचे याचे धडे त्यांनी आपल्या कृतीतून दिले.

आजमितीला मातृशक्ती आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्र गाजवत आहे.तिच्या या यशाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वी या स्त्री संतांनी पेरलेल्या विचारांमध्येच आढळतात. समतेचा, स्त्री शक्तीचा वारसा जपणे इतकेच नव्हेतर तो वृद्धिंगत करणे आपले इष्ट कर्तव्य आहे.

अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
Back to top button