शतकानुशतकांची वारी परंपरा अखंड जपत वारकरी श्रद्धाभावाने वारीत सहभागी होतात.वारीतील नियमांचे काटेकोर पालन करत नामस्मरणाच्या अखंड गजरात पंढरपूर गाठणे, हाच त्यांच्यासाठी परमानंदाचा अनुभव असतो. या वारीत सकल हिंदू समाजाची एकात्मता, समरसता आणि सांस्कृतिक वैभव यांचे विलोभनीय दर्शन घडते. वारीतून परमेश्वराच्या सामूहिक भक्तीचे जागरण होते आणि त्या भक्तीतून समाजशक्ती व राष्ट्रशक्ती दृढ होते. हिंदू समाजाचे मनोबल उंचावणारी ही पंढरीची वारी आहे.
वारी हा प्रत्येक वारकऱ्यासाठी व्यक्तिगत पातळीवरील आध्यात्मिक अनुभव असला, तरी ईश्वरभक्तीच्या निमित्ताने लाखो भाविक एकत्र येतात तेव्हा त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामही अत्यंत व्यापक स्वरूपात दिसून येतात. अध्यात्मिकता म्हणजे सामाजिक एकात्मता, सेवाभाव आणि बंधुभाव यांचे संस्कार; आणि हेच अध्यात्म भारताच्या जीवनदृष्टीचे अधिष्ठान आहे.
आणि त्याचवेळी दुसरीकडे वारीच्या काळात ‘वारीत प्रतिगामी लोकांची घुसखोरी होते आहे.’.. वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून दूर लोटण्याचे प्रयत्न तसेच संतांनी हिंदू धर्माविरुद्ध विद्रोह केला होता असे नर्रॅटिव्ह पसरवण्याचा उद्योग सुरू असतो..काही वर्षांपूर्वी “ज्ञानोबा.. तुकाराम ” याऐवजी “नामदेव तुकाराम ” असा बदल करण्याचेही प्रयत्न झाले होते. परंतु वारकरी संप्रदायाने हे प्रयत्न हाणून पाडले. वेळोवेळी काही ठराविक कंपूतील लोकांनी वारीबद्दल वादग्रस्त विधाने करणे तसेच संविधान वारी, सर्वधर्म समभाव वारी काढणे व वारीत भेद निर्माण करणे हा प्रकार आहे.
मात्र अशा बुद्धीभेदाच्या प्रवाहांना बळी न पडता वारी परंपरा , वारकरी संप्रदायाची एकता , समरसता, बंधुता ही शिकवण खोलवर समाजात रुजत आहे .
१. वारी: विठ्ठल भक्तीची निरंतर साधना..

आळंदी ते पंढरपूर ही वारी १३ व्या शतकात संत ज्ञानदेवांनी सुरु केली. तेव्हापासून गेल्या ८०० वर्षांहून अधिक काळ ती अव्याहत सुरु आहे. जनसामान्यांना भक्तिमार्ग दाखवणे हा तर वारीचा हेतू होताच, त्याचबरोबर धर्मरक्षण व राष्ट्ररक्षण या दृष्टीने वारीचे महत्व आहे. मध्ययुगीन कालखंडातील भक्ती आंदोलनाला वाढीमुळे बळ प्राप्त झाले. धर्म व संस्कृतीवरील सततच्या आक्रमणाला थोपवून धरण्यात वारीचे योगदान आहे.
-ईश्वरभक्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे हे वारीने दाखवून दिले
देवभक्तीचा अधिकार हा समाजातील प्रत्येकाला आहे. देवभक्ती हा हिंदू समाजाच्या एकात्मतेचा भक्कम आधार आहे हे संतांनी ओळखले होते. संत हे सर्व जातींमधून आले होते. संतांनी कधीही आपली ओळख आपल्या जातीवरून करून दिली नाही. त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व केले. संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ॥
अर्थात मनुष्याचे स्वरूप कसेही असले तरी त्यांच्या अंतःकरणातील भक्तिभाव अधिक मौल्यवान व आदरास पात्र आहे. त्याचप्रमाणे संत तुकाराम म्हणतात
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
वारीचा आत्माच या अभंगात सामावलेला आहे. भेद निर्माण करणाऱ्या गोष्टींपेक्षा एकत्व निर्माण करणाऱ्या गोष्टींना महत्त्व देणे ही वारकरी परंपरेची शिकवण आहे. संत सोयराबाई म्हणतात
अवघा रंग एक झाला ।
रंगी रंगला श्रीरंग ॥
नाही भेदाचे ते काम ।
पळोनी गेले क्रोध काम
समाजाच्या सर्व थरांमधील संतांचे ज्ञान व भक्ती यांचा आदर करून सकल हिंदू समाजाने या सर्व संतांच्या पायावर डोके ठेवले. ज्यावेळेस बहुतांश हिंदू समाज कथितरित्या प्रतिगामी होता त्यावेळी वारीचा हा महिमा होता. अन आज त्याच वारीत प्रतिगामी तत्त्वे घुसल्याचे आरोप करण्यात काय तथ्य आहे? आजही लाखो वारकरी ज्या श्रद्धेने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांना वंदन करतात त्याच श्रद्धेने संत चोखामेळा, संत सावता माळी किंवा संत गोरा कुंभार यांच्या समाधीपुढेनतमस्तक होतात. समाजाने सर्व संतांना समान आदर दिला, हीच वारकरी परंपरेची खरी ताकद आहे. त्यामुळे वारी ही जातीय भेदांना बळ देणारी नव्हे, तर सर्व स्तरांतील हिंदूंना एका भक्तीबंधात जोडणारी समृद्ध परंपरा आहे.
२. वारीला हिंदू परंपरेपासून दूर नेण्याचा प्रयत्न: कसा व कशासाठी?
गेल्या काही वर्षांमध्ये वारीला सेक्युलर परंपरा म्हणत वारीला हिंदू परंपरेपासून तोडण्याचे अनेक प्रयत्न डाव्या पुरोगामी संघटना तसेच काही घटकांकडून होऊ लागले आहेत. वारीमध्ये विविध उपक्रम राबवून वारीचे मूळ स्वरूप, आशय व परंपरा याबाबतच गोंधळ निर्माण करण्याचे शिस्तबद्ध प्रयत्न सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वी काही महाभागांनी वारी आणि हिंदू परंपरा , भक्ती परंपरा याबाबत बुद्धीभेदाच प्रयत्न केला आणि तो अजूनही सुरू आहे . आज भक्ती चळवळ हे संतांनी केलेले ब्राह्मणवादाविरोधातील बंड होते, वैष्णवधर्म हा हिंदू धर्म नसून वेगळा आहे असा प्रचार करण्याचा प्रयत्न होत आहे. वारीमध्ये धम्म यात्रा नामक उपक्रम सुरु करून विठ्ठलाची मूर्ती हि बुद्धाची आहे, विठ्ठल विष्णूचा अवतार नाही असे दवे केले जात आहेत. संविधान समता दिंडी, समता कीर्तन असे उपक्रम राबवले जात आहेत.काही वर्षांपूर्वी हिंदू सणउत्सवांची खिल्ली उडवणाऱ्या महाभागांनी वारीत प्रवेश केला व शेख मोहम्मद विठ्ठला असा गजर करण्याचा प्रयत्न केला. हे सारे पाहिल्यास काही घटक वारीचा मूळ आशय व स्वरूपाचे जाणीवपूर्वक विकृतीकरण करू पाहत आहेत का, हा प्रश्न पडतो ..
वारीच्या मार्गात उभे राहून काही मुसलमानांनी वारकऱ्यांना अन्न पाणी देणे, नंतर माध्यमांनी हे एक हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण म्हणून सादर करत त्याचा उदोउदो करणे हे सारे वारीला हिंदू परंपरेपासून दूर नेण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. वारीच्या दिंड्यांवर जेव्हा जिहादी तत्वांकडून दगडफेक होते तेव्हा हे अन्नदान करणारे मुसलमान त्याचा निषेध करतांना दिसतात का?
वारीला भरकटवण्याचे असे प्रयत्न का होत आहेत यावर विचार केल्यास दिसून येते कि हिंदू समाजास जातीपातींमध्ये विभागून त्यांच्यावर राज्य करण्याचे जे राजकारण आजवर डाव्या पुरोगामी लोकांनी केले त्याला आता तडे जाऊ लागले आहेत म्हणूनच ते असे प्रयत्न करत आहेत. वारीच्या माध्यमातून हिंदू समाज संघटित होत आहे. भक्तीच्या ताकदीपुढे जातीपातीच्या भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न फोल ठरत आहेत व हिंदुत्वाचा प्रभाव वाढत आहे म्हणूनच डाव्या पुरोगामी मंडळींचा व जिहादी घटकांचा वारीच्या मार्गात विविध संकटे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
अश्या भूलथापांना बळी न पडता वारी हि एक समृद्ध हिंदू परंपरा आहे हे समस्त हिंदू जाणून आहेत ..

३. वारी: एक समृद्ध हिंदू परंपरा
वारी हि एक हिंदू परंपरा आहे. इस्लामी आक्रमकांपासून हिंदू धर्माचे रक्षण व्हावे व अंतर्गत भेदांच्या भिंती ओलांडून हिंदू समाज एक व्हावा या उदात्त हेतूने संतांनी भक्ती चळवळ सुरु केली. वारी हे याच भक्ती चळवळीचे विराट स्वरूप आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात, एकादशीचे व्रत करतात, व आषाढी तसेच कार्तिकी एकादशीस पंढरपूरची वारी करतात. हरिनाम, हरिपाठ, भजन , किर्तन , जय जय रामकृष्ण हरी याचा गाजर करतात. यातील राम, कृष्ण व हरी म्हणजे कोण? वारीच्या हिंदू असण्याचा याहून अधिक पुरावा काय हवा?
स्वतः तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात:
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
अर्थात हे जग विष्णुमय आहे. वैष्णव धर्म हा सर्वत्र आहे त्यामुळे भेदाभेद करू नये. हे भक्तजनांनो, तुम्ही भगवंताच्या कथा श्रावण करा, त्याचे चिंतन करा व आताच आपले हिट साध्य करून घ्या. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर सांगतात:-
चंहूं वेदीं जाण साहिशास्त्री कारण
अठराहीं पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनि नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
चारही वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे, ही सर्व हरीची महती गात आहेत. ताक घुसळून निघणारे लोणी जसे आपण ग्रहण करतो त्याप्रमाणे ह्यातील हरिनामाचा भाग तितका आत्मसात करावा व इतर कथाभाग सोडून द्यावा.
संत चोखामेळा महाराजांच्या पत्नी संत सोयराबाई “अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग” असे म्हणतात. यातील श्रीरंग हे विष्णूचे नाव आहे जे इथे विठ्ठलास उद्देशून वापरलेले आहे. तुकाराम गाथेमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या कार्याचे वर्णन करतांना रामेश्वर म्हणतात चहू वेदांचे हे केले विवरण अर्थही गहन करुनिया, म्हणजेच संतांनी चारही वेदांचे सोप्या भाषेत विवरण केलेले आहे.

वारी व वारकरी संप्रदाय यांच्या हिंदू असण्याचे असे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर असूनही जर डाव्या पुरोगाम्यांना विठ्ठल विष्णूचा अवतार नाही असे ठसवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर ते केवळ स्वतःचे हसे करून घेत आहेत. ८०० वर्षांहून अधिक काळ विष्णुभक्तीच्या माध्यमातून भक्ती चळवळीने भगवद्गीता, वेद व भागवत सामान्य लोकांना समजावून दिले आहे. त्या चळवळीतुन निर्माण होणाऱ्या हिंदू एकात्मतेचे विराट दर्शन ही वारी आहे. वारीत सांगितले जाणारे तत्त्वज्ञान हिंदू धर्माचेच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. असे असतांना वारी हिंदू नाही असे म्हणणे म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. केवळ हिंदूंमध्ये दुफळी माजवण्याच्या हेतूने हिंदुविरोधी घटक हा वेडेपणा करत आहेत. आज सजग झालेले हिंदू या भूलथापांना बाली पडणार नाहीत हे स्पष्ट आहे. वारकरी संप्रदाय हिंदू धर्माधिष्ठितच आहे. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मात जे अनेकविध उपासना पंथ आहेत, त्यातील वैष्णवांचा पंथ आहे. या पंथाचे प्रस्थानत्रयी मानले जाणारे ग्रंथ –
‘ज्ञानेश्वरी’ (‘भगवद्गीता’ विवेचन) 2) ‘तुकाराम गाथा’ (चहूवेदांचे केलेसे विवरण) 3) ‘एकनाथी भागवत’ (श्रीमद्भगवत एकादश स्कंध). या तीनही हिंदू धर्मातील श्रेष्ठ ग्रंथाधारानेच अगदी तुकोबारायांनी, ‘पाहिली पुराणे। धांडोळली दर्शने॥’ असेच म्हटले आहे. कुठेही इतर धर्माच्या ग्रंथांचे नावही घेतले नाही. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंचपर्वकाळ; एकादशी, सोमवार ही अखंड व्रते कोणत्या धर्मानुसार आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठितच आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
आज वारीचा लाभ हिंदुत्ववादी विचारांना होत आहे, असे स्वत:ला चाणक्य म्हणवणा-यांचे म्हणणे असेल, तर त्यामागे अप्रत्यक्षपणे “वारी ही हिंदू परंपरेचा भाग नाही” किंवा “तिचा हिंदू समाजाच्या एकात्मतेशी संबंध नाही” असा युक्तिवादच दडलेला दिसतो. वारकरी संप्रदायाच्या वैचारिक एकात्मतेला तडा देण्यासाठी बुद्धीभेदाचे कुटील प्रयत्न होताना दिसत आहेत.परंतु वारी ही हिंदू भक्ती परंपरेचे एक सशक्त आणि चिरंतन रूप आहे ही वस्तुस्थिती आहे. ज्या भक्ती चळवळीने समाजातील विविध घटकांना एका सूत्रात बांधले, समतेचा संदेश दिला आणि धर्माधिष्ठित लोकजागरण घडविले, त्याच परंपरेचा वारी हा अविभाज्य भाग आहे.
मागच्या काही वर्षांपासून डाव्या विचारसरणीच्या कंपूतील मंडळी संतांच्या सामाजिक टीकेचा अर्थ संतांचे सनातन परंपरेविरुद्धचे बंड होते असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.वारकरी संप्रदायातील वारक-यांची ज्या संतांवर गाढी श्रद्धा आहे ,त्या संतांच्या अभंगांतील निवडक ओळी संदर्भापासून तोडून त्यांचा उपयोग हिंदू परंपरा आणि संतपरंपरा यांच्यात संघर्ष असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी केला जात आहे. मात्र संतवाङ्मयाचा समग्र अभ्यास केला तर लक्षात येते कि संतांचा संघर्ष किंवा त्यांचा विरोध हा धर्माला कधी नव्ह्ताच , त्यांचा विरोध त्या काळातील धर्मातील कुप्रथा, विकृती आणि भेदभावाला होता.संतांनी विठ्ठलभक्तीच्या मार्गाने धर्म सुधारणा आणि समाजजागरण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
ज्या वारक-यांच्या मुखी “रामकृष्णहरी” आहे…
ज्यांच्या हातात तुळशीमाळ आहे…
ज्यांच्या वारीत हरिपाठ, गीता आणि भागवत आहे…
तो वारकरी संप्रदाय हिंदू संस्कृतीपासून वेगळा कसा असू शकतो?
त्यामुळे संप्रदाय आणि वारक-यांबद्दल नाहक काहीही गैरसमज पसरवायचा कुटील डाव काही मंडळी रचत आहेत . आपण त्यांचा डाव उधळून लावायला हवा . ( तुकाराम महाराज म्हणतात ना “सोटा हाणू पाखंडा ।”) तेव्हा खोटा विमर्श करणा-यांना बेहत्तर करू दे . पण आपण विचारपूर्वकचच वर्तन करायचे आहे .वारीचे पावित्र्य जपूया.संतांचा वारसा जपूया…

संदर्भ :-
https://vskdevgiri.com/item/03c6b06952c750899bb03d998e631860
https://www.vayuveg.com//Encyc/2026/4/21/pandharpur-wari-ideological-debate-warkari-sampraday.php
https://www.tv9marathi.com/videos/sharad-pawar-on-controversial-statement-varkari-sampradaya-sam-1645705.html Sharad Pawar April 2026 statement on Wari
https://csss-isla.com/secular-perspective/my-experiences-of-wari/ 2024 article by one Irfan Engineer on Center for Study of Society and Secularism tries to portray Wari as secular and as revolt against privilaged Bramhans
https://www.mahamtb.com//Encyc/2026/5/17/warkari-sampraday-answers-religious-questions-analysis.html Wari is hindu