HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग ७…

“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विठ्ठलभक्ती..

अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याशा गावात जन्मलेल्या माणिक (राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव) यांना लहानपणापासूनच विठ्ठलनामाचा ध्यास होता. त्यांच्यासाठी पंढरपूरचा पांडुरंग केवळ मंदिरापुरता मर्यादित नव्हता, तो सर्वव्यापी, प्रत्येकाच्या अंतःकरणात वसणारा परमेश्वर होता. त्यांच्या खंजिरीच्या प्रत्येक तालात आणि भजनाच्या प्रत्येक सुरात विठ्ठलनामाचा अखंड नाद घुमत असे.

तुकडोजी महाराजांच्या विठ्ठलभक्तीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन. वारकरी संप्रदायाने विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून समाजाला समता, समरसता आणि एकात्मतेचा संदेश दिला, तर तुकडोजी महाराजांनी त्या भक्तीला राष्ट्रसेवा, ग्रामविकास आणि समाजजागरणाची दिशा दिली. समाजातील गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता दूर करण्याचे कार्यही भक्तीचाच अविभाज्य भाग आहे, अशी त्यांची भूमिका होती.

‘ग्रामगीता’ या अजरामर ग्रंथातून त्यांनी ग्रामविकास, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, परस्पर प्रेम आणि समाजसेवा यांनाच ईश्वरभक्ती , विठ्ठलभक्तीचे स्वरूप दिले. विठ्ठलाला “अमूर्ताचे मूर्त रूप” मानत समाजातील शेवटच्या घटकाची सेवा हीच विठ्ठलाची खरी सेवा असल्याचा समरसतेचा संदेश त्यांनी दिला.

विठ्ठलाचे नाव घेऊन विलासी जीवन जगणाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत फटकारले. “हात पाय हलवा, काम करा, तरच विठ्ठल प्रसन्न होईल,” असा कर्मयोगाचा संदेश त्यांनी दिला.

सन १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनी मंडळांसह सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रेरणादायी भजनांनी आणि गीतांनी असंख्य तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. देशसेवा हीच ईश्वरसेवा आणि राष्ट्रभक्ती हीच खरी विठ्ठलभक्ती, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून जनमानसात दृढपणे रुजवला.

अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
Back to top button