Newsकोकण प्रान्त

स्वच्छ सागर अभियान : समुद्र स्वच्छतेपासून जनसहभाग चळवळीपर्यंत…

सागरी सीमा मंच, कोकण प्रांताचा पुढाकार

“स्वच्छ किनारा – सुरक्षित सागर” ही सामूहिक जबाबदारी

कोकण, दि. १९ सप्टेंबर २०२६ :
समुद्र हा कोकणच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मच्छीमारी, पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि हजारो कुटुंबांची उपजीविका समुद्राशी जोडलेली आहे. त्यामुळे समुद्र व समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

याच उद्देशाने सागरी सीमा मंच, कोकण प्रांत यांच्या माध्यमातून “स्वच्छ सागर अभियान” व्यापक जनसहभागातून बीच स्वच्छता सप्ताह, दि: १९ ते २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत कोकण प्रांतातील, सागरी जिल्हे, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा येथे राबविण्यात येत आहे. समुद्रकिनारा स्वच्छ करण्याबरोबरच समुद्रात जाणारा कचरा रोखणे, कचऱ्याचे वर्गीकरण व योग्य व्यवस्थापन करणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

समुद्रातील कचऱ्याचे प्रमुख स्रोत:
समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा कचरा विविध माध्यमांतून समुद्रात पोहोचतो. घरगुती प्लास्टिक, खाद्यपदार्थांची पॅकेट्स, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल तसेच नाले, ओढे आणि नद्यांमधून वाहून येणारा कचरा यामध्ये मोठ्या प्रमाणात असतो.

  • मासेमारी व्यवसायातील जुनी जाळी, दोर, प्लास्टिक क्रेट्स, पॅकिंग साहित्य आणि इतर वस्तूही समुद्री कचऱ्याचा भाग बनू शकतात. त्याचबरोबर पर्यटनस्थळांवरील कचरा आणि अनधिकृत कचरा टाकण्याच्या घटना यामुळेही समुद्र प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो.

त्यामुळे “समुद्रकिनारा साफ करण्याबरोबरच कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच रोखणे” यावर अभियानामध्ये विशेष भर देण्यात येणार आहे.

पूर्वतयारी आणि स्थानिक सहभाग:
स्वच्छ सागर अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित समुद्रकिनाऱ्यांचे पूर्वसर्वेक्षण, कचऱ्याचे हॉटस्पॉट निश्चित करणे आणि कचऱ्याच्या प्रकाराची नोंद करणे आवश्यक आहे.

या अभियानामध्ये मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्रालाय विभाग, Nss, पर्यावरण संरक्षण गतिविधी, अ.भा.पूर्व सैनिक सेवा परिषद,
स्थानिक प्रशासन, मच्छीमार संस्था, ग्रामपंचायत व नगरपालिका, शाळा-महाविद्यालये, युवक मंडळे, महिला बचतगट, पर्यावरण संस्था, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवक यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.

स्वच्छता साहित्य, हातमोजे, कचरा संकलन पिशव्या, कचरा वर्गीकरण आणि संकलित कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीचे नियोजनही करण्यात येणार आहे.

जनजागृतीला विशेष महत्त्व:
स्वच्छ सागर अभियान हे केवळ एका दिवसाचे स्वच्छता अभियान न राहता सातत्यपूर्ण जनजागृती आणि लोकसहभागाची चळवळ बनविण्याचा सागरी सीमा मंचाचा प्रयत्न आहे.

यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, सायकल रॅली, मानव साखळी, सोशल मीडिया अभियान आणि मच्छीमार वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.

मच्छीमार समाजामध्ये “स्वच्छ बंदर – सुरक्षित सागर”, तर विद्यार्थ्यांमध्ये “माझा समुद्र – माझी जबाबदारी” हा संदेश पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

  • एका दिवसाची स्वच्छता नव्हे, वर्षभराची सवय

अभियानाचा उद्देश केवळ एका दिवसात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करणे हा नसून, कचरा निर्माण होण्यापासून त्याच्या योग्य व्यवस्थापनापर्यंतची साखळी मजबूत करणे हा आहे.

समुद्र, किनारा आणि सागरी परिसंस्था सुरक्षित राहिल्यास मच्छीमारांचे जीवनमान, स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि जैवविविधता यांचेही संरक्षण होऊ शकते.

यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, मच्छीमार समाज, पर्यावरण संस्था, शैक्षणिक संस्था, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सागरी सीमा मंच, कोकण प्रांत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संदेश :-

“स्वच्छ सागर – सुरक्षित सागर
स्वच्छ किनारा – समृद्ध कोकण!”

Back to top button