मुंबई, ३० सप्टेंबर :- मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ‘पांचजन्य’ पाक्षिकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘सुशासन संवाद’ हा नेत्रदीपक सोहळा वैचारिक मंथन, सामाजिक बांधिलकी आणि समग्र भारतीयत्वाच्या विविध पैलूंना उजाळा देणारा ठरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात राजकारण, समाजसेवा, कला, संस्कृती आणि प्रशासन क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. भागय्याजी यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून संघाची राष्ट्रीय तसेच वैश्विक पटलावरील भूमिका विशद केली. भारतीय संस्कृती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रजीवनातील संघाच्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी आपल्या संवादातून हिंदुत्वाची आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. सागरी सुरक्षेचा प्रश्न हा केवळ प्रशासनापुरता मर्यादित नसून समाजाच्या व्यापक सहभागाशीही जोडलेला असल्याचे त्यांच्या मांडणीतून अधोरेखित झाले.
सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांनी आपल्या संवादातून संघाशी संबंधित अनुभव आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांविषयीची आपली भूमिका व्यक्त केली. “आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा पुनर्प्रत्यय आला तो संघामुळे,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले. त्यांच्या मनोगतातून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आणि तिच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले.
राज्यपाल बीष्णुदेव बर्मा यांनीही आपल्या उद्बोधनातून ‘पांचजन्य’शी असलेले आपले ऋणानुबंध आणि वैचारिक नाते उलगडून सांगितले. त्यांच्या संवादातून पत्रकारिता, विचारविश्व आणि राष्ट्रजीवन यांच्यातील परस्परसंबंधांवर प्रकाश पडला.
कार्यक्रमातील ‘सेवा’ सत्रात डॉ. सिद्धार्थ पाटणी आणि निजामृतानंद यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या वैद्यकीय सेवाकार्याची माहिती दिली. समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविताना येणाऱ्या आव्हानांचा आणि सेवाभावातून त्यावर मात करण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला.
भारतीय संस्कृती आणि विचारविश्वाचा सिनेमा या माध्यमातून होत असलेला आविष्कार हा देखील या सोहळ्यातील महत्त्वाचा विषय ठरला. डॉ. प्रकाशचंद्र द्विवेदी आणि नितीश भारद्वाज यांनी चित्रपटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या भारतीय विमर्शाबाबत संवाद साधला. भारतीय इतिहास, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे चित्रपट माध्यमातून होणारे सादरीकरण यावर त्यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सुशासनातील सरकारची भूमिका स्पष्ट केली. विविध विकासकामे, प्रशासनाची कार्यपद्धती आणि शासनाच्या निर्णयांची माहिती त्यांनी तथ्यांच्या आधारे मांडली.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवा क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रांतील धुरिणांनी या व्यासपीठावर एकत्र येत विचारांचे मंथन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या ‘सुशासन संवाद’ सोहळ्यातून भारतीयत्वाचे सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय आणि सेवाभावी असे अनेकविध पैलू उलगडले.
या संपूर्ण संवादाचा केंद्रबिंदू ठरला तो बंधुत्व, सामाजिक समरसता आणि भारतीय मूल्यांचा पुनर्प्रत्यय. विविध विचार, क्षेत्रे आणि अनुभवांना एका व्यासपीठावर आणत ‘पांचजन्य’ने आयोजित केलेला हा सोहळा वैचारिक देवाणघेवाणीचा एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरला.