HinduismNewsReligion

दीपावलीतील चैतन्यमयी पर्व : लक्ष्मीपूजन

‘लक्ष्मीपूजन’ म्हणजे दीपावली उत्सवातील अत्यंत चैतन्यमयी पर्व. पंचांगानुसार आश्विन अमावस्येच्या प्रदोष काळात (संध्याकाळी) देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या रात्री संपूर्ण देश दिव्यांच्या लखलखाटात न्हाऊन निघतो. 

पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून आश्विन अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. तिच्या स्वागतासाठी देवांनी दीपप्रज्वलन केले होते, तेव्हापासून लक्ष्मीपूजनाची परंपरा सुरू झाली. कुटुंबांमध्ये धनधान्य आणि संपत्तीसोबतच घरात सुख, शांती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी या भावनेने मोठ्या भक्तिभावाने लक्ष्मीपूजन केले जाते. पूजेमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, नाणी, हिशोबाच्या वह्या आणि नवीन केरसुणी ठेवली जाते. धन-धान्याचे प्रतीक म्हणून लाह्या आणि बत्तासे अर्पण केले जातात.

हिंदू संस्कृतीत माता लक्ष्मी केवळ धनाची देवता नसून, ती धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय आणि संतान यांचे प्रतीक असलेली ‘अष्टलक्ष्मी’ आहे.

ॐ तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥

धन, धान्य, ऐश्वर्य आणि मांगल्याची अधिष्ठात्री माता लक्ष्मीचे आज भक्तिभावाने पूजन ! दीपांच्या मंगल प्रकाशात समृद्धी, सुख आणि समाधानाची प्रार्थना करूया. माता महालक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो!

सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा !

Back to top button