बोरीवली आणि ठाण्यात उलगडली पन्हाळा-रायगडाची अनकथित ऐतिहासिक गाथा
‘सिने संवाद’ अंतर्गत ‘महाराष्ट्राचे किल्ले – पन्हाळा आणि रायगड’ या विषयावर चित्रपट प्रदर्शन व विचारमंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न
मुंबई / ठाणे, १५ नोव्हेंबर २०२६ : संस्कार भारतीच्या वतीने आयोजित ‘सिने संवाद – चित्रपट प्रदर्शन आणि विचारमंथन’ या उपक्रमांतर्गत बोरीवली आणि ठाणे येथे ‘महाराष्ट्राचे किल्ले – पन्हाळा आणि रायगड’ या विषयावर दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये पन्हाळा आणि रायगड किल्ल्यांवर आधारित दोन विशेष माहितीपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या माहितीपटांच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना या किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये दडलेले शौर्य, संघर्ष, स्वाभिमान आणि इतिहासातील अनेक अपरिचित पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली.
बोरीवली येथील कार्यक्रम रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत बोरीवली पश्चिम येथील अटल स्मृती उद्यान, शिंपोली रोड येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. हा शुभारंभ प्रमुख अतिथी व इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी रविराज पराडकर यांनी विशेष व्याख्यान दिले. ते म्हणाले की, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत, तर आयुष्यात किमान एकदा तरी रायगडावर जाऊन दर्शन घेतलेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक योद्ध्याचे आणि क्रांतिकारकाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी हिंदू समाजाच्या जीवनात अतुलनीय योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार कर्वे यांनी केले. अतिथींचा सन्मान जयेश मेस्त्री यांनी केला, तर मेहक भाटिया यांनी आभार प्रदर्शन केले.
ठाणे येथील कार्यक्रमाची सुरुवातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. शिल्पा ताई परब, मुकुंद मराठे, संजय गोडसे, नितीन जाधव, संजीव ब्रह्मे आणि मंगेश आकेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक शिल्पा ताई परब यांनी विशेष व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री केतकर यांनी केले. मुकुंद मराठे यांनी अतिथींचा सन्मान केला, तर संजय गोडसे यांनी आभार मानले.
दोन्ही ठिकाणी झालेल्या व्याख्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेल्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. महाराजांनी स्वराज्याच्या प्रशासनात आणि चलनव्यवस्थेत मराठी भाषेला दिलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अष्टप्रधान मंडळातील पदांना प्रचलित फारसी नामांऐवजी संस्कृतप्रचुर मराठी नावे देण्यामागील भाषिक स्वाभिमानाची भूमिकाही स्पष्ट करण्यात आली. मराठी भाषा केवळ बोलण्यातून नव्हे, तर दैनंदिन आचरणातून आणि व्यवहारातून जिवंत राहते, हा संदेश महाराजांनी आपल्या कार्यातून दिला होता, असे प्रतिपादन करण्यात आले. रायगडावरील शिवराज्याभिषेक हा हिंदू समाजाच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा महत्त्वपूर्ण टप्पा होता, असेही नमूद करण्यात आले.
रायगडावर आजही इतिहासाची साक्ष देणारे भव्य अवशेष पाहायला मिळतात. या अवशेषांकडे केवळ वास्तू म्हणून न पाहता त्यामागील इतिहास समजून घेणे, हेच खऱ्या अर्थाने इतिहासाचे आकलन असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे ईश्वरी संकल्पनेला समर्पित असलेले राज्य होते. स्वतःच्या कुळाच्या उद्धारासाठी नव्हे, तर ईश्वरी इच्छेला समर्पित भावनेतून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, असा विचारही मांडण्यात आला.
महाराजांनी किल्ल्यांची नावे ठेवताना संस्कृत-मराठी परंपरेचा विचार केला होता आणि त्यानुसार त्यांच्या उपयोगालाही महत्त्व दिले होते. या व्याख्यानांमध्ये पन्हाळगडाचा ऐतिहासिक पराक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, युद्धनीती आणि किल्ल्यांचे सामरिक महत्त्व यांवरही सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. व्याख्यानानंतर उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधण्यात आला. प्रश्नोत्तरांच्या सत्रातून इतिहासासंबंधी विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.
दोन्ही ठिकाणी इतिहासप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, चित्रपटप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून समजून घेण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व उपस्थित प्रेक्षक, वक्ते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
