राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरूपौर्णिमा

देश आणि समाजासाठी काम करताना ते तन-मन-धनपूर्वक करायला हवे. असे संघटन उभे करायचे असेल तर ते कुणाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असता कामा नये! संघाचे काम हे पूर्णतः संघ स्वयंसेवकांच्या आधाराने उभे राहायला हवे आणि म्हणून पूजनीय डॉक्टरांनी त्या पहिल्या उत्सवात स्वयंसेवकांना भगव्या ध्वजापुढे समर्पण करायला सांगितले आणि आजतागायत तीच पद्धत संघात रूढ झालेली आहे.
संघ नुकताच स्थापन झाला होता. डॉक्टर हेडगेवार यांनी आपल्या स्वयंसेवकांना सांगितले की, गुरूपौर्णिमा आहे, तेव्हा सर्वांनी समर्पण घेऊन यावे. सर्व स्वयंसेवकांना आनंद झाला. आपल्याला डॉक्टरांचे पूजन करायला मिळणार, असे वाटणे स्वाभाविकच होते. कारण, एखादी संस्था ज्याने स्थापन केली, साहजिकच त्याला त्या संस्थेचे गुरूपद मिळणार, हा तर जगमान्य शिरस्ता! सर्व स्वयंसेवक जमले. कुतूहल होते कारण तसा या प्रकारचा हा संघाचा पहिलाच कार्यक्रम!! डॉक्टर हेडगेवार आले. कार्यक्रमास सुरुवात झाली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. डॉक्टर हेडगेवार यांनी निवेदन केले की, आपल्या सर्वांचा गुरू म्हणजे आपण दररोज शाखेत लावतो तो भगवा ध्वज. आज आपण सर्वांनी या भगव्या ध्वजाचे पूजन करून त्यालाच समर्पण करायचे आहे! यासाठी पूजनीय डॉक्टर यांनी जी कारणमीमांसा केली, ती संघाचे चरित्र आणि चारित्र्य स्पष्ट करणारी होती… आजही गुरुपूजन उत्सवात ती स्पष्ट केली जाते, नव्यांसाठी आणि उजळणी म्हणून जुन्यांसाठीही! काय होती ती कारणमीमांसा?
- मनुष्य हा स्वभावतःच स्खलनशील आहे. कोणताही मनुष्य हा सर्वगुणसंपन्न नसतो. त्याच्यात काही ना काही दोष असतोच. ज्याला गुरू म्हणायचे तो तर सर्वगुणसंपन्न असावा. सर्वच जण गुणांचाच आदर्श घेणारे असतात असे नाही. त्याच्यातील दोषांचा आदर्श समोर असू नये! म्हणून संघात कुणी व्यक्ती गुरूस्थानी नाही.
- भगवा हा आपल्या संस्कृतीत त्यागाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. मांगल्याचे प्रतीक आहे. हा रंग आपल्याला भारतभूमीच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देतो.
- रामायण, महाभारत काळातही भगवा ध्वज हाच धर्माचे प्रतीक म्हणून मानला जात होता. ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणासंग, गुरुगोविंदसिंह आदी सर्व जणांनी भगवा ध्वजच धर्माचे, शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून घेतला होता.
- वैदिक काळापासून भगव्या ध्वजाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अनेक वैदिक साहित्यात याचे उल्लेख सापडतात.
- भगवा रंग हा सूर्याचे प्रतीक आहे. सूर्य हा सृष्टीची जोपासना करणारा म्हणून मान्यता आहे.
हाच आदर्श ठेवून देश आणि धर्म यांचे संघटन करण्याचे कार्य संघ पुढे नेणार आहे!
पूजनीय डॉक्टरांनी संघात कुणाही व्यक्तीला गुरूपद न देऊन मोठ्ठा इतिहास घडवला, असे म्हणायला हरकत नाही! कुणी व्यक्ती गुरू आणि मग ते गुरूपद मिळविण्यासाठी असलेली चढाओढ, मत्सर हे सर्व आपण अनुभवत आहोत. सर्वसामान्य पद्धती पूजनीय डॉक्टरांनी एका क्षणात मोडून काढली आणि एक प्रकारे वेगळेच वैचारिक अधिष्ठान संघाला आणि पर्यायाने समाजाला प्राप्त करून दिले, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. त्यावेळी त्या गुरूपूजन कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांची मनःस्थिती काय झाली असेल, याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. एक अद्भुत कार्यपद्धती संघाने स्वीकारली होती.
गुरूपूजन म्हणजे सामान्यतः समाजात जे अभिप्रेत आहे, ते आपल्या आध्यात्मिक गुरूंचे पूजन आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे. त्यासाठी गुरूचे पूजन आणि त्याला यथाशक्ती धनाचे वा अन्य समर्पण. आध्यात्मिकदृष्ट्या याचे महत्त्व आहेच. तिथेही केवळ धन समर्पणावर भर असतोच असे नाही. संघामध्ये याच गुरूपूजन परंपरेच्या प्रथेचा अंगीकार केला गेला, पण वेगळ्या कारणासाठी, वेगळ्या उद्देशाने.
संघाची स्थापना झाली, त्याचे उद्दिष्ट संघाच्या प्रार्थनेतील एका पंक्तीत आहे. ‘परम वैभवं नेतुमेततः स्वराष्ट्रम्’ यासाठी संघटन, शाखांची आणि कार्यक्रमांची रचना. एकदा मदन मोहन मालवीय यांनी पूजनीय डॉक्टरांना विचारले की, “तुमच्या कामाने मी प्रभावित झालो आहे. यासाठी मी किती पैसे जमवून देऊ?” पूजनीय डॉक्टरांनी सांगितले की, “मला पैसे नकोत. तुम्ही हवे आहात…. यातील भाव लक्षात आला की, संघकामाचे मर्म लक्षात येते. कुणी धनिकाने पैसे दिले की संघटन त्याचे मिंधे होते. त्याच्या मर्जीने काम करावे लागते आणि इथे तर देशाच्या परमवैभवासाठी काम करायचे आहे. मग, ते कुणाच्या मर्जीने करून कसे चालेल?” म्हणूनच संघाचे काम हे स्वयंपूर्ण व्हावे, हाच पूजनीय डॉक्टरांचा दृष्टिकोन संघाच्या गुरुपूजन संकल्पनेमागचा होता.
संघ हे पारिवारिक संघटन आहे. ‘Ours is a Family Organisation.’ एखादे कुटुंब त्या कुटुंबातील सर्व सदस्य कष्ट करून चालवतात, तसे सर्व स्वयंसेवक एका कुटुंबाप्रमाणे संघ चालवतात.
देश आणि समाजासाठी काम करताना ते तन-मन-धनपूर्वक करायला हवे. असे संघटन उभे करायचे असेल तर ते कुणाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असता कामा नये! संघाचे काम हे पूर्णतः संघ स्वयंसेवकांच्या आधाराने उभे राहायला हवे आणि म्हणून पूजनीय डॉक्टरांनी त्या पहिल्या उत्सवात स्वयंसेवकांना भगव्या ध्वजापुढे समर्पण करायला सांगितले आणि आजतागायत तीच पद्धत संघात रूढ झालेली आहे. संघाचे एकूण सहा उत्सव असतात. त्यातील गुरुपूजन हा एकमेव उत्सव जो फक्त स्वयंसेवकांसाठीच असतो. या उत्सवांतून जी गुरुदक्षिणा जमा होते, केवळ त्याच्याच आधारे संघाचे वर्षभराचे काम चालते.
संघ हा संघाच्या कोणत्याही कार्यासाठी स्वयंसेवक सोडून अन्य कुणाकडून पैसे जमा करत नाही. त्यामुळेच संघाचा प्रत्येक स्वयंसेवक गुरुपौर्णिमा उत्सव कधीही चुकवत नाही. किती गुरुदक्षिणा समर्पण करावी, हे ज्याच्या त्याच्या क्षमता आणि सद्सदविवेक यावर सोडलेले आहे. मला या राष्ट्रकार्यासाठी समर्पण करायचे आहे, हा भाव मनात ठेवावा हा आग्रह! एखाद्याची क्षमता नसल्यास ध्वजाला एक फुल वाहिले तरीही महत्त्वाचे. आत्ताच्या काळात एवढे मोठे संघटन हे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असल्याचे बहुधा दुसरे उदाहरण नसेल आणि अशा प्रकारे आर्थिक स्वयंपूर्णता असणे, हेच संघाच्या वाढत्या कामाचे एक कारण असावे का?
मंडळी, संघात गुरूपूजन उत्सवाची ही एक बाजू झाली. पण, केवळ आर्थिक समर्पण हा एकमेव आधार नाही बरं का! संघाच्या गुरुपूजन संकल्पनेची आणखीनही एक बाजू आहे. समर्पण केवळ धनाचेच नाही, तर वेळेचेही असावे यावर भर असतो. देशाला परमवैभवाप्रत न्यायचे असेल, तर अधिकाधिक कार्यकर्त्यांचा अधिकाधिक वेळ हा सुद्धा आवश्यक आहे. ते सुद्धा एक आवश्यक समर्पण आहे. संघात एक सुंदर पद्य आहे. स्वयंसेवकांची मानसिकता कशी असते/असावी याचे जणू दर्शनच! ती पंक्ती अशी-
तन समर्पित, धन समर्पित और यह जीवन समर्पित….
चाहता हुं मातृभू तुझको अभी कूछ और भी दू…
गुरूपूजन संकल्पना एका वेगळ्याच उंचीवर संघाने नेऊन ठेवली आहे, असे म्हणता येईल. धनाचे समर्पण करत असतानाच आपल्या पूर्वजांचे स्मरण करून, देशकाल परिस्थितीची गरज लक्षात घेऊन यापुढेही अधिक वेळ देऊन काम करायचे आहे, हा संकल्प मनात जगवावा, ही अपेक्षा असते आणि हाच आदर्श समोर ठेवून आज संघाचे हजारो कार्यकर्ते काम करत आहेत. प्रसंगी केरळ, पूर्वांचल इत्यादी ठिकाणी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिलेली आहे. हजारो उच्चशिक्षित कार्यकर्त्यांनी देशासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. यंदा संघ शंभरावे वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्त देशातील हजारो तरुण आपले करिअर सोडून वर्ष दोन वर्ष देशाच्या कामासाठी देत आहेत. समर्पणाचा सर्वोच्च आदर्श आणखीन काय असू शकतो?
लेखक :- अरविंद जोशी
साभार:- मुंबई तरुण भारत
