गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः।
रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव॥
अर्थात:- आकाश किती विशाल तर आकाशाएवढे, सागर किती अथांग तर सागराइतका आणि राम-रावण युद्ध कोणत्या युद्धासारखे तर राम-रावण युद्धासारखेच. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांनी एका भाषणात मार्गदर्शन करताना हे उदाहरण दिले होते. याच न्यायाने त्यांना कोणी प्रश्न विचारला असता की, संघ आणि राष्ट्रभक्ती यांचे परिमाण काय? तर कदाचित दत्तोपंतांनी उत्तर दिले असते की, संघ म्हणजे राष्ट्रभक्ती. जगामध्ये संघातील राष्ट्रभक्तीला कोणतीच उपमा नाही किंवा कुणाशीही तुलना नाही.
जगाच्या पाठीवर संघासारखी तन मन धन सर्वकाही देशासाठी, त्यात तडजोड नाही. सर्वकाही समाजासाठी त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही, स्वतःचा विचार नाही. कुटुंबाचा विचार दुय्यमच, अशी संघटनात्मक रचना असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एकमेव आहे. संघाच्या राष्ट्रभक्तीसंदर्भात कोणीही, कुठेही संशय घेतलेला नाही. परदेशातील सामाजिक, राजकीय संस्थांनीही संघाच्या कर्माबद्दल, राष्ट्रभक्तीबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी इंग्लंडमधील संघाच्या एका भव्य शिबिरात संघाच्या शिस्तबद्ध कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले होते की, “आमच्या देशातील तरुणांनी ही शिस्त आणि हे देशप्रेम आत्मसात करायला हवे.” मार्गारेट थॅचर हे एक उदाहरण झाले. अनेकांनी वेगवेगळ्या संदर्भात, प्रामुख्याने राष्ट्रभक्तीच्या संदर्भात संघाबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत.
डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली तीच मुळी प्रखर राष्ट्रभक्तीतून. पूर्णपणे लोकशाही मार्गाचा अवलंब करून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संघाचे नामकरण केले. इतर दोन नावेही चर्चेत आली पण बहुमताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव ठेवले. एवढेच नव्हे तर माता भगिनींकरिता ‘राष्ट्र सेविका समिती’ ही संस्था स्थापन करताना राष्ट्र याच शब्दाला अग्रस्थान दिले. डॉक्टर मुसलमानांचा द्वेष करीत, असा काही जणांनी संघाला बदनाम करण्याकरिता प्रचार केला. काहींचे म्हणणे होते, हिंदू- मुसलमान ऐक्य शक्य नाही व व्यवहार्यही नाही.
सन १९२३ मध्ये बनारस येथे झालेल्या हिंदू महासभेच्या झालेल्या वार्षिक अधिवेशनात पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदूंच्या संरक्षणार्थ हिंदू महासभेसमोर हिंदू संघटना उभारण्याचा ठराव मांडला. स्वामी श्रद्धानंदांनी मुसलमानांचे शुद्धीकरण करण्याची योजना जाहीर केली होती. डॉ. हेडगेवारांचा दृष्टिकोन त्यापेक्षाही विशाल होता. जे जे कोणी ही भूमी आपली मातृभूमी समजतात, जे जे या मातृभूमीत जन्माला आले आहेत त्या सर्वांचेच पहिले उद्दिष्ट स्वराज्य मिळवणे हेच राहील. स्वातंत्र्य गमावल्याचे आणि परकीय सत्ता आपल्या देशात दृढ होण्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय वृत्तीचा अभाव, जनतेचा आणि देशाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी सदैव झटण्याचा भाव. डॉक्टरांना यामुळे प्रामुख्याने असे वाटू लागले की, जनतेमध्ये, समाजामध्ये, राष्ट्रीय वृत्ती तसेच देशहितासाठी सदैव सज्ज राहण्याची वृत्ती निर्माण करणे, ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती नाहशी होणे गरजेचे आहे.
डॉक्टरांनी राष्ट्रीय वृत्तीचा दाखविलेला राजमार्ग पुढील सर्व सरसंघचालकांनी अंमलात आणला. संघाची रचना करताना डॉक्टरांनी, प्रार्थना, गणवेश, विविध आज्ञा आणि संघाची दिनचर्या यात एकरुपता आणली. संघाला, संघकार्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना सुरुवातीपासूनची घडी विस्कटू दिली नाही. जिथे बदलाची निश्चित गरज होती ती विचार-विनिमय करून बदलली. संघाच्या आज्ञा संस्कृत केल्या. प्रार्थना पूर्ण संस्कृत केली. शारीरिक शिक्षणाकरिता लाठीच्या वापरावर भर दिला. शासनाला उगाचच विरोध केला नाही. पण राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आवश्यक तिथे अवश्य बदल केला. संघाच्या प्रत्येक कृतीत तन मन धनाने त्याग आहे. त्याची सुरुवात डॉक्टरांनी स्वतःपासून केली. वास्तवतेत डॉक्टर स्वतः वैद्यकीय तज्ञ होते. त्यांनी ठरविले असते आणि वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांना अमाप धन कमविता आले असते. पण त्यांनी समाजसेवेसाठी त्याकडे पाठ वळवली. संघामध्ये जात, पंथ आणि पुढे तर धर्मासंबंधी सुद्धा लवचिकपणा ठेवला गेला.
आज जगात २००च्या आसपास देश आहेत त्यातील ४० पेक्षा जास्त देशांमध्ये संघाचे कार्य चालते. तिथे बदल करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐवजी हिंदू सेवा संघ नावाने संघ ओळखला जातो. संघाने हिंदू संघटन हे प्रमुख ध्येय मानलेले असले तरीही राष्ट्रीयत्वालाही तितकेच महत्त्व दिले आहे. पण हिंदू संघटन महत्त्वाचे मानले आहे. भारतातच नाही तर विदेशातही संघ स्वयंसेवक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण सगळे एक आहोत, जाती, पंथ, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जात नाही. गुरुदक्षिणा समर्पित करताना कोणी, किती, काय, दिले हे महत्त्वाचे नसते. समर्पण महत्त्वाचे असते. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही भारतीय आहोत आणि हिंदूही आहोत. आपल्यात भेदभाव नाहीत त्यामुळे एकप्रकारची आपुलकी, प्रेम, आदर निर्माण होते. परदेशात तर ही भावना अधिक तीव्र दिसते. परदेशातील संघाचे संघटक, प्रचारक शंकरराव तत्ववादी यांनी संघविस्तार आणि प्रचाराकरिता आयुष्य वाहिले. ते एकदा म्हणाले होते, “जगाच्या पाठीवर कुठेही एकजरी स्वयंसेवक असेल, हिंदू असेल तर त्याच्या पाठीशी संघ कायम उभा राहील.”
देशात ज्या ज्या वेळी मानवी किंवा नैसर्गिक आपत्ती आल्या त्यावेळी राष्ट्रीय भावनेतून संघाने आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले. राजकारण हा एक वेगळा भाग आहे. समाजकारण हे क्षेत्र काहीसे विस्तृत आहे. ज्यावेळी इंदिरा गांधींनी कन्याकुमारीला विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट दिली, त्यावेळी एकनाथजी रानडे यांनी केलेल्या अथक परिश्रमांनी उभारलेले हे रॉक मेमोरियल पाहून त्या म्हणाल्या होत्या, “हे काम चांगले आहे असेच चालू ठेवा.” आणीबाणीच्या काळात सर्व संघ नेत्यांना पकडले गेले, पण एकनाथजी मात्र पकडले गेले नव्हते. ही त्या राष्ट्रीय कार्याची पोचपावती होती.
डॉक्टरांनी संघात शिस्त आणतानाच अनेक आदर्श घालून दिले आणि त्याची सुरुवात स्वतःपासून केली. एका शिबिराला बच्छराजजी व्यास निमंत्रित होते. त्यांनी आल्या आल्या सांगितले की, मी परान्न घेत नाही. मला स्वतंत्र व्यवस्था हवी, माझे जेवण मीच तयार करीन. डॉक्टरांनी त्यांना मान्यता दिली. सर्व साहित्य पुरवले. दुपारी जेवणाच्या वेळी सर्व स्वयंसेवक एकत्र जेवायला बसले आणि बच्छराजजी एकटेच जेवत होते. बच्छराजजी यांनी बसल्या बसल्या पाहिले की, त्यात सर्वजण गप्पागोष्टी करीत, हसत-खेळत जेवत होते आणि डॉक्टरही त्यांच्यात सहभागी झाले आहेत. आपणच या सर्वांपासून अलिप्त आहोत हे चांगले नव्हे. संध्याकाळच्या जेवणात ते सर्वांबरोबर जेवले. डॉक्टरांनी त्यांना एकही प्रश्न विचारला नाही. यातून डॉक्टरांनी संघभावना, राष्ट्रभावना वाढीस लावली. डॉक्टरांनी केवळ भाषणबाजी केली नाही तर राष्ट्रभावना स्वतःपासूनच अवलंबिली. राष्ट्रभावना आणि हिंदू संघटन हेच संघाचे सर्वस्व होते आणि आज त्याचे विलोभनीय दृश्य सर्वत्र दिसत आहे.
संघाने राष्ट्रभक्तीचे, एकतेचे दर्शन घडविले, त्यावेळी मानतेचाही स्वीकार केला. तसे आचरण केले. कोरोनाच्या काळात परदेशात हिंदू बांधवांना मदत करता करता इतर जनतेचीही मदत केली. ते इतर धर्माचे आहेत असा भेदभाव केला नाही. केवळ कोरोना काळातच नव्हे तर इतरवेळी भारतात आणि भारताबाहेरही मानवी जाण कायम ठेवली. संघाच्या १०० वर्षांच्या यशस्वी कार्याचे हे मर्म आहे. त्यामुळे संघाबद्दल इतर जनांतही फारसा द्वेष नाही. म्हणून तर पंडित नेहरूंनी राजपथावरील एका संचलनात संघ स्वयंसेवकांना भाग घेण्याची परवानगी दिली होती हे विसरून चालणार नाही.
लेखक- डॉ. प्रकाश करमरकर