
पूर्वांचलात ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले यांचे अभिष्टचिंतन, चौथाईवाले लिखित ‘माझी प्रचारक यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ : पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. स्थानिक भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.
पूर्वांचलात ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले लिखित ‘माय जर्नी अॅज प्रचारक’ (इंग्रजी) आणि ‘माझी प्रचारक यात्रा’ (मराठी) या अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात ‘माय होम इंडिया’ आणि ‘भारतीय विचार साधना’ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भैयाजी जोशी यांच्यासह संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंतजी आमशेकर, लेखक शशिकांत चौथाईवाले, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, डॉ. विजय चौथाईवाले, भाविसाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शशिकांत चौथाईवाले यांचा अभिष्टचिंतन सोहळाही यावेळी पार पडला.
भैयाजी जोशी म्हणाले, “उपेक्षा, अपमान आणि असुविधांचा सामना करत वेळप्रसंगी जीवाचेही बलिदान देत संघ प्रचारकांनी पूर्वांचलात काम केले. शाळा, सेवाकार्ये आणि जनजातींच्या प्रश्नांना उत्तरे शोधली. आपल्यातील भेद विसरून एक झाले पाहिजे, हा विचार तेथे रुजवला. त्यामुळे आज आसाममधील अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. झोकून देऊन कार्य करणाऱ्या अशा प्रचारकांच्या पिढीचे प्रतिनिधित्व शशिकांतजी करत आहेत.”

संघ कार्याचे यश एका व्यक्तीचे नसून, सामूहिक कार्यपद्धतीचे आहे, असे उद्गार शशिकांत चौथाईवाले यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. पूर्वांचलातील संघकार्याच्या वाढीबद्दल ते म्हणाले, “उग्रवाद जसा कमी होत गेला, तसे पूर्वांचलात संघाचे काम वाढत गेले. सेवाकार्यांमुळे आज सर्व भाषांचे लोक संघाशी जोडले गेले असून, हे संघ कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.”
आसाममधील ज्या जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रचारकांची हत्या केली, तेथून कार्यकर्ता उभा करत नवीन प्रचारक तयार करण्याचे कार्य शशिकांतजींनी केले आहे, असे गौरवोद्गार सुमंत आमशेकर यांनी काढले. ‘माझी प्रचारक यात्रा’ हे पूर्वांचलातील संघकार्याचा धांडोळा घेणारे पुस्तक आहे. एकप्रकारे ही पूर्वांचलातील संघयात्राच असल्याचे आमशेकर म्हणाले. पूर्वांचलातील संघकार्याचा खडतर प्रवास आणि शशिकांत चौथाईवाले यांची प्रतिबद्धता, समर्पण आणि धैर्याचा प्रवास सुनील देवधर यांनी उलगडला. अनेक कार्यकर्त्यांमुळे पूर्वांचलात संघ वाढला. त्यांचे जिवंत अनुभव या पुस्तकात असल्याचे डॉ. विजय चौथाईवाले यांनी सांगितले. दिल्लीतील प्रभात प्रकाशनाने पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला आहे. पुस्तकाचा अनुवाद प्रा. शिवशंकर मुजुमदार यांनी केला. कार्यक्रमात अनिल वळचनकर यांनी मानपत्राचे वाचन केले, तर सूत्रसंचालन अभय थिटे यांनी केले.