Opinion

यशस्वी संघर्षाचा परमोच्च बिंदू : शिवराज्याभिषेक!

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेला भारतीय समाज अदृष्य सांस्कृतिक भावबंधनांनी घट्ट बांधलेला आहे. आसेतु हिमाचल भारतीयांचे मातृभूमी प्रेम आणि स्वजनांबद्दलची आत्मियता राष्ट्रप्रेमाच्या रूपात व्यक्त होते. विश्वविख्यात भारतवर्षाच्या वैभवशाली परंपरेत अनेक पराक्रमी प्रजावत्सल राजवटींनी राज्य केले. न्याय, विविध कला, धर्म, संस्कृति, व्यापार, धनसमृद्धी आणि आरोग्यसुविधा यांना पाठबळ आणि प्रोत्साहन देत त्यांनी प्रजाहित संवर्धनासाठी जे जे शक्य होईल ते ते करण्याचे कर्तव्य निष्ठेने पार पाडले.

सुमारे एक हजार वर्षांपूर्वी या सुखसमृद्धीच्या लोभाने आलेल्या आक्रमकांच्या टोळ्यांनी या देशाचे शांततापूर्ण जीवन हत्या, लूट, मानवी जीवनाचे शोषण आणि अन्य वर्णनापलीकडील रानटी वर्तनाने ढवळून काढले.

अर्थात भारतावर्षातल्या पराक्रमी राजांनी त्यांच्या त्यांच्या परीने या आक्रमकांना थोपवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु संघटित प्रयत्न न झाल्याने हे कफल्लक, हिंस्त्र आक्रमक येतच राहिले. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या स्वकियांनीच घात केल्यामुळे झालेल्या करूण अंतानंतर भारतवर्षावर गुलामगिरीची पकड घट्ट झाली. त्यानंतर चारशे वर्षांनी महाराणा प्रतापांनी मुघली आक्रमणाचा प्रखर प्रतिकार केला खरा परंतु, त्यांना यश आले नाही आणि वनवासातच त्यांचा अंत झाला.

त्यानंतर सुमारे पन्नास वर्षांनी महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत एक तेज:पुंज हुंकार रायरेश्वराच्या मंदिरात २७ एप्रिल १६४५ उमटला, साक्षात शिवतेज प्रकटले. त्यानंतर स्वधर्म रक्षणाचा लढा सुरू झाला. परकीय आक्रमकांना पराभूत करून स्वराज्य स्थापनेचा हा मंगल दिवस प्रत्येक भारतीयास प्रेरणादायक ठरला.

या यशस्वी संघर्षाचा परमोच्च बिंदू म्हणजेच शिवराज्याभिषेक!

न अभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते वने ।

विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता ।।

सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी राज्याभिषेकाची आवश्यकता नाही तर तो आपल्या पराक्रम आणि साहसामुळे स्वत:च राजा होतो असे सांगणाऱ्या या सुभाषिताचा आशय या हजार वर्षांच्या आक्रमणांमुळे बदलला होता. तत्कालीन आवश्यकता होती ती, ताठ मानेने उभ्या राहिलेल्या भारतीय जनमानसावर आत्मसन्मान ठसवण्याची आणि परकीयांना ठणकावून सांगण्याची!  

त्यासाठी महाराजांनी जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ (दि. ६ जून १६७४) या शुभदिनी विधीवत राज्याभिषेक करवून घेतला आणि या पराक्रमावर धार्मिक, सांस्कृतिक मान्यतेची मोहोर उमटवली.

लेखक : विश्वजित भिडे

Back to top button