IslamNews

श्रीलंकेत बुरखाबंदी; मदरसेही बंद होणार!

कोलंबो, दि. १५ : श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात येणार असून एक हजाराहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार असल्याचे श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरासेकेरा यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुरख्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर आपण स्वाक्षरी केली असून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे, असे वीरासेकेरा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. यापूर्वी मुस्लीम महिला आणि मुली बुरखा वापरत नव्हत्या. बुरखा हे धार्मिक दहशतवादाचे लक्षण असून गेल्या काही वर्षात याचे प्रमाण अती झाले आहे. त्यामुळे आम्ही बुरख्यावर बंदी घालणारच आहोत, असेही वीरासेकेरा म्हणाले.

सरकार नवे शैक्षणिक धोरण राबवणार असल्यामुळे देशातील एक हजार मुस्लीम शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यापुढे देशात कोणालाही शाळा सुरु करुन त्यांना जे हवे ते शिकवता येणार नाही’ असेही वीरसेकेरा यांनी नमूद केले.

इस्लामी दहशतवाद्यांनी चर्च आणि हॉटेलांवर दहशतवादी हल्ले केल्यानंतर २०१९ मध्ये श्रीलंकेत बुरख्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.   

Back to top button