RSS

प्रचारकांच्या माध्यमातून संघसृष्टीचे सृजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) ‘प्रचारक’ (pracharak )हा घटक असा वैशिष्ट्यपूर्ण आहे. संघटनेचा विस्तार, दृढीकरण, कार्यकर्त्यांची जडणघडण, निर्णयप्रक्रियेतील अनौपचारिक संवादाची जपणूक, व्यक्ती-व्यक्तीतील समन्वय-सामंजस्य टिकविणे व वृद्धिंगत करणे इत्यादींच्या बाबतीत प्रचारकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तांत्रिकदृष्ट्या प्रचारक ही अनौपचारिक व्यवस्था आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात सर्व स्वयंसेवकांच्या दृष्टीने प्रचारक ही सर्वाधिक आदराचे स्थान असलेली व्यक्ती असते. आणि मुख्य म्हणजे हा आदरभाव कृत्रिम रित्या लादलेला नसून वर्तनातून कमावलेला(Commanded, Not Demanded) असतो. अन तरीही लौकिकाच्या, प्रसिद्धीच्या वलयापासून प्रचारक सर्वथा अलिप्त असतो.

“प्रचारक हवेत.. प्रचारक हवेत अशी मागणी चहूकडून येत आहे. ती आपणच पूर्ण करायची आहे. कार्यकर्ते काही आकाशातून टपकत नाहीत… एका वर्षासाठी आपण संन्यासी बनले पाहिजे…” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(RSS) इतिहासात, दुसरे सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकर यांनी केलेल्या या आवाहनाचे विविध पैलू महत्त्वाचे आहेत. एकतर ज्या काळात आणि ज्या पार्श्वभूमीवर गुरुजींनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले ती वैशिष्ट्यपूर्ण होती. १९४१-४२चा सुमार होता. एकाच वर्षापूर्वी मुस्लीम लीग ने स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी अभियान सुरु केले होते, लाहोर येथील अधिवेशनात बॅरिस्टर महम्मद आली अली जिना यांनी द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून स्वतंत्र पाकिस्तानची मागणी प्रतिपादित केली होती. यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या आंदोलनाचे संदर्भ बदलले आणि ते एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसरे जागतिक महायुद्धही अत्यंत मोक्याच्या टप्प्यावर येऊन ठेपले होते. काही वर्षांतच ब्रिटीश भारत सोडून जाणार याची चाहूल लागली होती आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने ही ‘भारत छोडो अभियान’ बुलंद करून स्वातंत्र्य चळवळीला गती दिली होती. अशा कालखंडात हिंदू संघटनेच्या उपक्रमाला गती देण्यासाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांनी पूर्णवेळ कामासाठी झोकून देण्याची गरज अधोरेखित करणारे आवाहन गुरुजींनी केले होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या आवाहनात संन्यासी बनण्याचा अत्यंत सूचक असा उल्लेख गुरुजींनी केला होता. संघटन, शक्तीसंपादन आणि भौगोलिक विस्तार यांची निकड प्रतिपादित करीत असतानाच प्रचारक संकल्पनेच्या वैचारिक पैलूकडेही गुरुजींनी आवर्जून संकेत केला होता, हे लक्षात घ्यायला हवे.

संघाच्या कामाचा प्रारंभ आणि विस्तार करण्याच्या हेतूने कार्यकर्ते देशभरातील विविध भागांत पाठ्विण्याचा पाठविण्याचा क्रम संघसंस्थापक डॉ हेडगेवार यांनी १९३५ पासूनच सुरु केला होता. अगदी प्रारंभी उच्च शिक्षण आपल्या गावात घेण्याऐवजी अन्यत्र जाऊन घ्यावे असे आवाहन करून त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना योजनापूर्वक देशातील प्रमुख शहरांमध्ये जाऊन राहण्यास उद्युक्त केले. १९३५ मध्ये त्यांनी दादाराव परमार्थ, बाबासाहेब आपटे आणि गोपाळराव येरकुंटवार यांना खानदेश आणि महाकोशल भागात संघाच्या प्रचारासाठी पाठविले. तर १९३६मध्ये पंजाबमधील मागणी लक्षात घेऊन जनार्दन चिंचाळकर, राजाभाऊ पातुरकर, नारायणराव पुराणिक इत्यादी कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले. या सर्वांनी थेट लाहोरपर्यंत संघकामाचे जाळे विणण्यासाठी, आपले शिक्षण चालू ठेवूनच परिश्रम केले. दादाराव परमार्थ आणि बाबासाहेब आपटे या दोघांना तर छोट्या छोट्या कालावधीसाठी गरजेनुसार पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणी पाठविण्यात आले होते. या अर्थानेच बाबासाहेब आणि दादाराव या दोघांचा उल्लेख अनेकदा संघाचे आद्य प्रचारक या नात्याने करण्यात येताना दिसतो. याचप्रकारे भाऊराव देवरस(लखनौ, बिहार, बंगाल), भय्याजी दाणी(वाराणसी) अशा प्रमुख कार्यकर्त्यांना अन्यान्य प्रांतात रवाना करण्यात आले. डॉक्टर हेडगेवार यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य पाहता, त्यांनी संघाच्या वैचारिक भूमिकेच्या कृतिशूर कार्यवाहीवरच भर दिला हे दिसून येते. संघासमोरील वैचारिक संकल्पाचे त्यांच्या मनातील रूप स्वच्छ आणि स्पष्ट होते. मात्र सहकारी कार्यकर्त्यांच्या छोट्या छोट्या बैठकांमधील संवादव्यतिरिक्त तात्त्विक मांडणी करण्यात वेळ व्यतीत करण्याऐवजी त्यांनी कार्यविस्ताराला अग्रक्रम दिला. प्रचारक संकल्पनेबाबतही त्यांनी हेच धोरण अवलंबिले दिसते. खरे तर ते स्वतःही आपल्या साऱ्या दिनक्रमाची, जीवनातील प्राधान्यक्रमाची आणि एकूण व्यक्तिगत जीवनाची मांडामांड निखळ प्रचारकाच्या दृष्टीने करीत होते. संघाच्या प्रचार आणि विस्तारासाठी अक्षरशः झंझावातासारखे भ्रमण करीत होते. प्रचारकांसारखे विविध गावी ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठविले त्यांच्याशी पत्रव्यवहारातून मात्र ते मार्मिक हितगुज करीत असत. अन्य अनोळखी गावात संघप्रचाराचे काम करण्यासाठी गेल्यानंतर कोणती पथ्ये पाळावीत, कशा प्रकारे काम करावे याचे व्यावहारिक मार्गदर्शन या पत्रांमधून आढळते. “….परप्रांतात संघाचे कार्य करणे आहे. तरी सर्व परिस्थितीचे निरीक्षण करून, माणसे ओळखून चातुर्याने, धीमेपणाने एक एक पाउल पुढे टाकावे. कार्याची घाई करून आपले हातून कोणतीही चूक होऊ देऊ नये.” यातील ‘चूक’ म्हणजे अर्थातच स्नेहाचे संबंध उत्पन्न करण्याच्या कामी, माणसे जोडण्याच्या कामी होऊ शकणारी चूक डॉक्टरांना अपेक्षित होती. संघाचे काम मनुष्यनिर्माणाचे आणि समाज संघटीत करण्याचे. ‘प्रचारक’ हा हे काम उभारण्यातील महत्त्वाचा दुवा. त्यामुळे त्याच्याकडून माणसे ओळखण्यात आणि त्यांना कार्यप्रवृत्त करण्याच्या दृष्टीने हाताळण्यात चूक वा उतावळेपणा होऊ नये हा प्रचारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दंडक असणे स्वाभाविक होते. खुद्द ‘प्रचारक’ या भूमिकेसाठी डॉक्टरांनी ज्या व्यक्तींची निवड, नियुक्ती व योजना केली त्या सर्वांनी पुढे आपापल्या वाटेला आलेल्या क्षेत्रात केलेल्या लोकविलक्षण कार्यावरून डॉक्टर हेडगेवार यांच्या अंतर्दृष्टीच्या आणि मनुष्य पारखण्याच्या कौशल्याचा ठळक प्रत्यय येतो. थोडक्यात, ‘प्रचारक’ या अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा आणि त्या यंत्रणेचा उलगडा नियोजनबद्धतेने डॉक्टरांच्या काळापासून सुरु झाला होता हे लक्षात घेतले पाहिजे. गोळवलकर गुरुजींनी डॉक्टरांच्या मनातील त्याविषयीचा अचूक वेध घेत प्रचारक यंत्रणेला एक सुनियोजित आकार प्राप्त करून दिला.

१९६० साली इंदूर येथे संघाच्या विभागीय आणि त्यावरील पातळीच्या कार्यकर्त्यांचा एक वर्ग ५ ते १३ मार्च या काळात भरला होता. या वर्गात गुरुजींनी विविध विषयांबाबत जे मार्गदर्शन केले त्यात कार्यकर्ता तसेच प्रचारक यांच्याविषयीच्या संकल्पनांचे अचूक विवेचन आढळते. “…आपल्याकडे धर्माचे परिपालन करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनात त्या धर्माचे आचरण करणाऱ्या, तपस्वी, त्यागी आणि ज्ञानी व्यक्ती एका अखंड परंपरेच्या रूपाने येथे निर्माण होत आलेल्या आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्राचे ‘खरे’ रक्षण झाले असून त्यांच्याच प्रेरणेने राज्यनिर्माते उत्पन्न झाले आहेत. म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे की ह्या प्राचीन परंपरेला अनुकूल बनवून तिचे जर आपण पुनरुज्जीवन करू शकलो तरच लौकिक दृष्टीने समाजाला समर्थ, सुप्रतिष्ठित आणि सदधर्माधिष्ठित बनविण्यात सफल होऊ शकतो. युगानुकूल म्हणण्याचे कारण असे कि प्रत्येक युगात ती परंपरा उचित रूप धारण करत उभी राहिली आहे. कधी केवळ गिरीकंदरी, अरण्यात राहणारे तपस्वी झाले, तर कधी योगी निघाले. कधी यज्ञयागादीच्या द्वारे तर कधी भगवंताचे भजन करणाऱ्या भक्तांच्या आणि संतांच्याद्वारे ही परंपरा आपल्याकडे चाललेली आहे” गुरुजी ज्या परंपरेचा उल्लेख करतात ती वेदकालीन ऋषीमुनीपासून भगवान श्रीकृष्णापर्यंत आणि आर्य चाणक्यापासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेक महापुरुषांच्या उदाहरणातून इतिहासात नोंदविली गेली आहे. गुरुजींनी विकसित आणि समृद्ध केलेल्या प्रचारक संकल्पनेतील प्रचारक म्हणजे त्याच परंपरेचा युगानुकूल आविष्कार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘प्रचारक’ हा घटक असा वैशिष्ट्यपूर्ण आहे. संघटनेचा विस्तार, दृढीकरण, कार्यकर्त्यांची जडणघडण, निर्णयप्रक्रियेतील अनौपचारिक संवादाची जपणूक, व्यक्ती-व्यक्तीतील समन्वय-सामंजस्य टिकविणे व वृद्धिंगत करणे इत्यादींच्या बाबतीत प्रचारकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तांत्रिकदृष्ट्या प्रचारक ही अनौपचारिक व्यवस्था आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात सर्व स्वयंसेवकांच्या दृष्टीने प्रचारक ही सर्वाधिक आदराचे स्थान असलेली व्यक्ती असते. आणि मुख्य म्हणजे हा आदरभाव कृत्रिम रित्या लादलेला नसून वर्तनातून कमावलेला(Commanded, Not Demanded) असतो. अन तरीही लौकिकाच्या, प्रसिद्धीच्या वलायापासून प्रचारक सर्वथा अलिप्त असतो. ‘सिद्धांतो पर अपने डटकर, संघ नींव को भरना है, अहंकार – व्यक्तित्व हृदय से पूर्ण मिटाकर चलना है’ या संघातच गायल्या जाणाऱ्या गीतातून प्रचारकाच्या मानसिकतेचे समर्पक वर्णन करण्यात आले आहे. आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे वैचारिक, बौद्धिक वा तात्विक पातळीवर मांडल्या जाणाऱ्या या मानसिकतेचा तंतोतंत अवलंब प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर केला जातो. अहंकारजन्य चढाओढ, व्यक्तीनिष्ठ हेवेदावे यांच्यामुळेच अत्यंत उदात्त, तात्त्विक ध्येयवाद मांडणाऱ्या संस्था-संघटना विखुरतात असा अनुभव समाजजीवनात सामान्यतः येतो. संघाची संघटना मात्र पंच्याण्णव वर्षे उलटली तरीही एकसंघ अभेद्य राहिली.एवढेच नव्हे तर सतत वृद्धींगत होत राहिली आहे. एक दोन नव्हे तर सहा सरसंघचालकांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांच्या आठ-दहा पिढ्या संघकार्याच्या मांडवाखालून वाटचाल करून गेल्या. देशातील राजकीय, सामाजिक परिस्थिती या कार्याला अनुकूल तर सोडाच, सर्वथा प्रतिकूलच राहत आली. ब्रिटीश काळापासून ही संघटना नेस्तनाबूत करण्याचे, चिरडून टाकण्याचे सर्वंकष प्रयत्न सर्व शक्तीनिशी अनेकदा करण्यात आले. अत्यंत घृणास्पद आणि धडधडीत खोट्या अपप्रचाराची राळ उडवून संघाची प्रतिमा कलंकित करण्याचे उपद्व्याप तर सातत्याने सुरूच आहेत. तरीही त्या साऱ्यांना शांतपणे पचवून दर दिवसागणिक संघाचे काम प्रगतीपथावर राहिले आहे. भल्या भल्यांना चक्रावून टाकणाऱ्या या संघ किमयेचे रहस्य ज्या ज्या बाबींमध्ये सामावले आहे त्यामध्ये संघाची प्रचारक यंत्रणा ही एक महत्त्वाची बाब आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर लौकिक पातळीवरील व्यक्तिगत जीवन(निदान काही काळापुरते) बाजूला ठेवून संघकार्यासाठी संपूर्ण वेळ देण्याचा निर्णय दरवर्षी अनेक तरुण घेतात. हा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला तरी प्रत्यक्ष कामाचे क्षेत्र आणि स्वरूप सर्वस्वी संघटनेच्या अधीन करून टाकतात. काही वर्षे असे पूर्ण संघटनशरण काम करून त्यानंतर आपल्या व्यक्तिगत जीवनाकडे वळतात. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांमध्ये अशा प्रकारे काम केलेल्यांची संख्या हजारांमध्ये मोजावी लागेल. यातलेच काही जण काम करता करता जीवनाच्या एका टप्प्यावर ‘प्रचारक जीवन हेच आपले व्यक्तिगत जीवन’ अशी मानसिक अवस्था सहज प्राप्त करतात. अशा आजीवन प्रचारक राहिलेल्यांची संख्याही आता हजारांच्या परिभाषेत पोचली असेल. अशा प्रचारकांची जीवने अक्षरशः कापरासारखी समाजयज्ञात जळून गेली. राखेच्या रूपानेही शिल्लक राहायचे नाकारत, परंतु सामाजिक पर्यावरणाच्या शुद्धीसाठी उपकारक ठरणाऱ्या वायूच्या रूपाने तरंगत…! ज्यांनी तुलनेने अल्पकाळ प्रचारक म्हणून काम केले तेही आपल्या साऱ्या उर्वरित जीवनासाठी एक विशिष्ट दृष्टी प्राप्त करूनच व्यक्तिगत जीवनाकडे वळले. सामाजिक आणि देशहिताला प्राधान्य देत आपापल्या जीवनाची मांडामांड करण्याची प्रेरणा त्यांना लाभलेल्या त्या ‘जीवनदृष्टी’ने जागविली. ‘नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही, भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनि गेलो अम्ही..’ या भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीतील उद्गारांवर दावा सांगणारी कृतार्थ जीवने अशा साऱ्या प्रचारक मांदियाळीने समाजजीवनात विरघळून टाकली आहेत.

समर्पित सृजनशक्ती

डॉक्टर हेडगेवार यांनी बीजारोपित केलेली, गुरुजींनी क्रमबद्ध विकासाचाअचूक वेध घेत विकसित केलेली आणि नैसर्गिक सहजतेने फुलत गेलेली प्रचारक यंत्रणा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अविभाज्य घटक, एक व्यवच्छेदक लक्षण आणि एक अतिशय गौरवशाली परंपरा या नात्याने स्थिर झाली आहे. या प्रचारकांच्या मनोभूमिकेचे अतिशय मार्मिक वर्णन एका संघगीतात करण्यात आले आहे. ‘स्वयंप्रेरणा से माता के सेवा का व्रत धारा है, सत्य स्वयंसेवक बनने का सतत प्रयत्न हमारा है…’ हे ते गीत. यातून प्रचारक बनण्यामागील प्रेरणा स्वयंपूर्ण आहे याची ग्वाही देतानाच सच्चा मातृभूमीसेवक बनण्याच्या प्रयत्नपथावरील पथिक असल्याचीही नम्र भावना व्यक्त करण्यात आली आहे. तपस्वी, योगी वा परिव्राजक बनण्याची आकांक्षा तर आहे पण त्या योग्यतेपर्यंत पोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र करीत आहोत, याची सततची जाणीव आहे, या जाणीवेमुळे व्रतस्थ असल्याचे भानही जागे राहते आणि त्या बरोबरच जगावेगळे कोणीतरी नाही आहोत तर नित्य लोक व्यवहारात लोकव्यवहारात राहूनच काम करायचे आहे याचेही स्मरण राहते.

संघकार्याच्या विकासाचा उलगडा आणि त्या विषयीच्या इतिहासावर सूक्ष्म नजर टाकली की प्रचारक या घटकाचे त्यातील योगदान कसे सृजनशील आणि समर्पित आहे ते लक्षात येते. डॉक्टर हेडगेवार यांच्या हयातीत १९३५ ते १९४०-४२ पर्यंतच्या काळातील प्रचारकांच्या कामाचा मुख्य भर अर्थातच संघटन विस्ताराच्या प्रयत्नानंतर स्वाभाविकपणे राहिला. शब्दशः काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छपासून कामरूपपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात संघशाखांचा विस्तार या काळात पोचला. हाताशी अत्यंत तुटपुंजी साधने, प्रसिद्धी-गाजवाजापासून कटाक्षाने बाळगलेली अलिप्तता आणि ज्या कामाचा प्रसार करावयाचा ते काम वरपांगी अनाकर्षक भासणारे – नित्य शाखेचे अशा स्थितीतही आपल्या अंगच्या प्रतिभा आणि कौशल्याचा उपयोग करून त्या काळातील प्रचारकांनी अगदी नव्या नव्या क्षेत्रातही कामाचे बीजारोपण कसे केले याच्या कथा रोमहर्षक आणि विलक्षण आहेत. बालवयीन स्वयंसेवकांच्या शाखा तर त्यांनी सुरु केल्याच, पण त्याशिवाय गावोगावच्या महनीय आणि प्रतिष्ठित व्यक्तींना कष्टपूर्वक संघाजवळ आणून तेथील कामाला स्थैर्य प्रदान करण्याची व्यवस्थाही केली. पुन्हा हे सर्व काम इतक्या वेगाने केले की १९४० साली, मृत्युपूर्वी जेमतेम महिनाभरच संघशिक्षावर्गात देशभरातून आलेल्या समूहासमोर बोलताना ‘आज मी हिंदुराष्ट्राचे लघुरूप माझ्या डोळ्यासमोर पाहत आहे’ असे सार्थकतेचे उद्गार डॉक्टर हेडगेवार यांनी व्यक्त केले. खरोखरच देशाच्या सर्व भागांतून तरूण स्वयंसेवक संघकार्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या वर्गात उपस्थित झाले होते. संघटनेला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय – अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले होते. हा सारा विस्तार अर्थातच प्रचारकांच्या नियोजनबद्ध आणि आत्मविलोपी कामातूनच निर्माण झाला होता.

गुरुजींनी सरसंघचालकपदाची सूत्रे हाती घेतली त्या पूर्वीपासूनच त्यांच्या प्रवृत्तींमधील अध्यात्मिक प्रगल्भता सर्वांच्या प्रत्ययाला आली होती. डॉक्टर हेडगेवार यांच्या घनिष्ट परिचयात आल्यानंतरही १९३६मध्ये गुरुजी संन्यासाच्या ओढीने हिमालयात सारगाछी येथील स्वामी अखंडानंद यांच्या आश्रमात निघून गेले होते. स्वामी अखंडानंद हे स्वामी विवेकानंद यांचे गुरुबंधू(रामकृष्ण परमहंस यांच्या अकरा शिष्यांपैकी एक). त्यांच्या या सारगाछी मुक्कामाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही हे खरे. परंतु एक मात्र निश्चित की त्यांच्या पुन्हा लौकिक जगात परतण्याच्या अन संघकार्याची धुरा स्वीकारण्याच्या निर्णयामागील प्रेरक शक्ती ही गुरु अखंडानंदांच्या निर्देशातच सामावलेली होती. सारांश, आपले सारे उर्वरित जीवन संघकार्याच्या माध्यमातून समाजाला समर्पित करणे ही त्यांच्या लेखी संन्यासग्रहणाची कृती होती. त्यांनी अर्थातच संपूर्ण संन्यस्तवृत्तीनेच ती आयुष्यभर निभावली. स्वाभाविकच त्यांच्या कल्पनेतील प्रचारक व्यक्तिमत्वालाही परिव्राजक अवस्थेचीच डूब होती. प्रचारक बनण्याचे आवाहन करीत असतानाही त्यांनी ‘आपण संन्यासी बनलं पाहिजे…’ या शब्दावलीचा उपयोग केला होता. मात्र प्रचारकाच्या संन्यस्त जीवनाचा एक विरोधी पैलूही ध्यानात घेतला पाहिजे. संन्यास म्हटला म्हणजे सर्वसंगपरित्याग, अगदी स्वतःच्या नावासकट व्यक्तित्वाच्या सर्व खुणा मिटवून टाकणे, लौकिक भौतिक जगाशी जोडले गेलेले सर्व बंध मुक्त करून टाकणे(गुरुजींनी तर आपले स्वतःचे श्राद्धही आपल्याच हस्ते, हयातीतच करून टाकले होते) आणि मोक्षप्राप्तीच्या आकांक्षेची सिद्धता करण्यासाठी तपसाधना करण्यातच आपली समस्त शक्ती, बुद्धी पणाला लावणे असाच सामान्यपणे अर्थ लावला जातो. लोभ, मोह, श्रेय, सत्ता, संपत्ती, सुखोपभोग इत्यादींविषयीच्या सर्व अन्य व्यक्तिगत आकांक्षा-इच्छांचा परित्याग कटाक्षाने करणे ही त्यामुळे संन्यास ग्रहणाची स्वाभाविक पूर्वअट , . याच अर्थाने स्वयंसेवकांना ‘संन्यासी’ बनण्याचे आवाहन गुरुजींनी केले होते काय?… स्वतः गुरुजींच्या जीवनापासून ‘प्रचारक’ या व्यक्तीमत्त्वाविषयीच्या ज्या परंपरा आणि वर्तनसूत्रे यांची रुजवत गुरुजींनी घालून दिली त्यांच्यापर्यंत व्यक्तिगत जीवनाविषयीच्या आशा आकांक्षा यांना तिलांजली देण्याचेच आवाहन त्यांनी केले हे खरे; परंतु वनात-जंगलात वा हिमालयात जाऊन तपाचरण करण्याची कल्पना मात्र प्रचारक संकल्पनेत अंतर्भूत नाही. उलट ऐहिक जगात आणि समाजसन्मुख राहूनच प्रचारकांनी समाज संघटनेच्या कामात आपल्या अंगच्या सर्व क्षमता आणि कौशल्यांच्या उपयोग करावा हेच अपेक्षित आहे. समाजाभिमुख आणि समाजोद्धारक संन्यस्त जीवन ही स्वामी विवेकानंद प्रेरित जीवनशैली हा प्रचारकांसमोरचा आदर्श आहे, असे म्हणणे अप्रस्तुत ठरणार नाही. गुरुजींच्या कल्पनेतील संन्यासही याच स्वरूपाचा होता.

प्रचारकांच्या माध्यमातून झालेले संघसृष्टीचे सृजन हा तर प्रचारक यंत्रणेचा सर्वात विलोभनीय पैलू आहे. संघविचाराच्या आणि संघसंस्काराच्या निर्मितीवरील निष्ठा गुरुजींनीच स्पष्ट शब्दांत व्यक्त करताना म्हटले होते, ‘Yes, we want to dominate all walks of human life’ होय, आम्हाला समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांवर हुकुमत निर्माण करावयाची आहे! ही हुकुमत अर्थातच संघाला अभिप्रेत असणाऱ्या संस्कारांची. व्यक्तीव्यक्तीच्या जडणघडणीतून राष्ट्रजीवनाची उभारणी(Man Making, Nation Building) ही स्वामी विवेकानंद यांनी दिग्दर्शित केलेली राष्ट्रीय पुनर्निर्माणाची परिभाषा प्रत्यक्षात साकार करणे हे संघासमोरील उद्दिष्टाचे मुख्य स्वरूप. त्या दृष्टीने संघशाखांच्या संघटनेला काहीशी पायाभूत मजबुती प्राप्त झाल्यानंतर समाजजीवनाच्या एकेका क्षेत्रात संस्था-संघटनांच्या निर्मितीचा क्रम सुरु झाला. पहिल्या पिढीतील ज्येष्ठ प्रचारक भाऊराव देवरस, दीनदयाळ उपाध्याय, दादासाहेब आपटे, मोरोपंत पिंगळे, दत्तोपंत ठेंगडी, नानाजी देशमुख आदींच्या प्रतिभेतून एकेका संस्थेची निर्मिती, पायाभरणी आणि भक्कम उभारणी होत गेली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनसंघ, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, विद्या भारती(सरस्वती शिशु मंदिर), दीनदयाळ शोध संस्थान यासारख्या भक्कम संस्था, सरस्वती शोध भारतीय इतिहास संकलन योजना, गोवंश प्रतिपालन आणि संशोधन, स्वामी विवेकानंद भव्य स्मारक तसेच सामाजिक समरसता मंच, संस्कृत भारती, संस्कार भारती, स्वदेशी जागरण मंच यांच्यासारख्या त्या त्या वेळची आणि परिस्थितीची गरज लक्षात घेऊन उभ्या केलेल्या रचना यांचे आज राष्ट्रजीवनातील योगदान लक्षणीय आहे, निर्विवाद आहे. एकेका क्षेत्रात विशुध्द भारतीय चिंतनाच्या प्रेरणा जागवून त्या दृढमूल करण्यातील या संस्थांचे योगदान विलक्षण आहे. आपापल्या क्षेत्रात या संस्था पाय रोवून उभ्या आहेतच. शिवाय यातील अनेक संस्था देशातच नव्हे तर जगातही आज अव्वल क्रमांक सांभाळून आहेत. यातील एकेक संस्था आणि तिच्या उभारणीच्या कामी आपली शक्ती-बुद्धी-कर्तृत्व पणाला लावलेला प्रत्येक प्रचारक हा एकेका ग्रंथाचा, प्रबंधाचा विषय ठरावा इतका सघन आणि गहन आहे.

आणखी पाचच वर्षांनी संघाच्या कार्याची शताब्दी साजरी केली जाईल. त्याआधीच गेल्या पंचवीस तीस वर्षांपासूनच प्रारंभिक काळातल्या एकेका महानुभाव प्रचारकांच्या जन्मशताब्दीची वर्षे पार पडली गेली. समाज-राष्ट्र उभारणीचा प्रवास शतकांच्या पावलांनी होत असतो असे म्हणतात. त्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनेने आणि अनेक प्रचारकांच्या जीवन-कर्तृत्वाने एकेक दमदार पाउल पुढे टाकले आहे. या एकाच पावलात संघसृष्टीने पादाक्रांत केलेले विश्व अनोखे आहे. या सिद्धीचे मोजमाप अन्य कुणी करो न करो, इतिहास नक्की करील आणि त्यामध्ये अनामिक प्रचारकांच्या मांदियाळीची नोंद ठळक राहिलं राहील यात शंका नाही. संघ मात्र आजही आणि उद्याही ‘Little done, vast undone’ याच मानसिकतेने सातत्य आणि नवोन्मेष यांचा उत्कृष्ट समतोल साधत पुढे जातच राहील.

अरुण करमरकर (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Back to top button