HinduismNews

विठूचिया द्वारी, माझ्या जीवाची ही वारी..

पहिला पाऊस पडतो… मातीचा गंध आसमंतभर दरवळू लागतो… आभाळ भरून येते… शेतकरी आकाशाकडे आशेने पाहू लागतो… आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक वेगळीच चाहूल लागते—”वारी निघाली…!”

ही चाहूल केवळ पावसाची नसते; ती भक्तीच्या ऋतूची असते. ती मनाला आलेल्या ओढीची असते. ती विठ्ठलाच्या प्रेमळ हाकेला दिलेल्या प्रतिसादाची असते. भारतीय संस्कृतीत अनेक यात्रा आहेत. हिमालयातील तीर्थयात्रा आहे, काशी आहे, रामेश्वर आहे, द्वारका आहे; पण पंढरपुरची वारी ही या सर्वांपेक्षा निराळी आहे. कारण इथे देवापर्यंत पोहोचण्यासाठी वैभव लागत नाही, विद्वत्ता लागत नाही, संपत्ती लागत नाही. लागते ती फक्त श्रद्धा. लागते ती प्रेमाने उच्चारलेली दोन अक्षरे—”विठ्ठल… विठ्ठल…”

वेदांनी माणसाला सांगितले—”संगच्छध्वं संवदध्वम्”—एकत्र चला, एकत्र बोला, एक मनाने जगा. संतांनी या वैदिक तत्त्वज्ञानाला लोकभाषेची पालवी फोडली. म्हणूनच महाराष्ट्रात वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही; ती सामाजिक समतेचा, बंधुभावाचा आणि विश्वकल्याणाचा चालता-बोलता उत्सव आहे.

“दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥”

अशा उदात्त विश्वप्रार्थनेचे पसायदान गाणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पहिले पाऊल पडते आणि लाखो अंतःकरणे एकाच लयीत धडकू लागतात. त्या लयीत जात नसते, पंथ नसतो, श्रीमंती नसते, गरिबी नसते. असते ती फक्त एकच ओळख—”मी वारकरी.”

संत ज्ञानेश्वर म्हणतात— “अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोकी ॥”

ही केवळ प्रार्थना नाही; ही संतविचारांची जीवनदृष्टी आहे. स्वतःचे सुख मागणारा भक्त संत होत नाही; जगाचे सुख मागणारा संत होतो. म्हणूनच वारीचा प्रत्येक टप्पा “मी” पासून “आपण” पर्यंतचा प्रवास आहे.

वारकरी चालतो… चालतंच राहतो… उन्हात, पावसात, चिखलातून, धुळीतून. पण त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. कारण शरीर चालत असले, तरी मन विठ्ठलाच्या चरणाशी विसावलेले असते.

संत नामदेवांच्या ओठी सहज उमटते—“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥”

जेव्हा प्रत्येक श्वासात विठ्ठल भरून राहतो, तेव्हा पंढरपूर शोधावे लागत नाही. विठ्ठल प्रत्येक शेतात दिसतो, प्रत्येक नदीत दिसतो, प्रत्येक अश्रूत दिसतो, प्रत्येक स्मितात हसतो. वारीची वाट म्हणजे चालणाऱ्या माणसांची नदी. त्या नदीत कोणाचा अभिमान वाहून जातो, कोणाचा अहंकार विरघळतो, कोणाचे दुःख हलके होते, तर कोणाला आयुष्याचा अर्थ सापडतो. वारकरी संप्रदायाचे सौंदर्य त्याच्या साधेपणात आहे. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदन, हातात टाळ, खांद्यावर पताका आणि मुखी हरिनाम—इतक्यातच संपूर्ण विश्व सामावलेले असते.

संत एकनाथ म्हणतात—“देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर ॥”

वारी म्हणजे या मंदिराची स्वच्छता. शरीराला धूळ लागते; पण मन आरशासारखे निर्मळ होत जाते. म्हणूनच पंढरपूर गाठणारा प्रत्येक वारकरी प्रत्यक्षात स्वतःलाच भेटून परत येतो.

संत चोखामेळा विठ्ठलाला सांगतात— “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.”

किती मोठा संदेश आहे यात! माणसाचा पोशाख, पद, प्रतिष्ठा, जन्म यापेक्षा त्याचे अंतःकरण महत्त्वाचे. म्हणूनच वारीत राजा आणि रंक एकाच दिंडीत चालतात. एका ताटात प्रसाद घेतात. एका नामात विलीन होतात. टाळांचा नाद जसजसा वाढतो, तसतसे मनातील कोलाहल शांत होत जातो. मृदंगाची लय जशी वेग घेते, तशी जीवनाची विस्कटलेली तालबद्धता पुन्हा जुळून येते. अभंगांची प्रत्येक ओळ मनावर संस्कार करत राहते.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगात ही अनुभूती जिवंत होते— “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ॥”

ही विट केवळ पुंडलिकाने टाकलेली विट नाही; ती संयमाची विट आहे, सेवाभावाची विट आहे, भक्तीची विट आहे. त्या विटेवर आजही विठ्ठल उभा आहे—भक्ताची वाट पाहत.

तुकाराम महाराज पुढे म्हणतात-“जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥”

वारीचे सार एका अभंगात सामावले असेल, तर तो हाच अभंग. विठ्ठल शोधायचा असेल तर मंदिरात जाण्यापूर्वी माणसात पाहा. भुकेल्याच्या हातात भाकर ठेवा, तहानलेल्याला पाणी द्या, निराशेच्या डोळ्यात आशेचा दिवा लावा—विठ्ठल तेथेच भेटेल.

संत जनाबाईंची हाक किती निरागस आहे— “ये गं ये गं विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥”

भक्तीला जेव्हा मातृत्वाचा स्पर्श होतो, तेव्हा देव दुरावत नाही; तो घरचा होतो. म्हणूनच वारकऱ्यांसाठी पंढरी हे तीर्थ नसून माहेर असते. आजच्या युगात माणूस अवकाशात झेपावला आहे; पण शेजाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्यात कमी पडतो आहे. माहिती वाढली आहे; पण माणुसकी कमी झाली आहे. संवादाचे असंख्य मार्ग निर्माण झाले; पण मनांचे पूल तुटत चालले आहेत. अशा वेळी वारी आपल्याला पुन्हा हातात हात घालून चालायला शिकवते. ती सांगते—एकट्याने यशस्वी होण्यापेक्षा, सोबत घेऊन जगणे अधिक सुंदर आहे. म्हणूनच वारी ही महाराष्ट्राची चालती-बोलती संस्कृती आहे. ती अभंगात गाते, टाळांत नाचते, चंद्रभागेत स्नान करते आणि प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूतून बोलते.

आषाढीची पहाट उजाडते. मंदिराचा कळस दिसतो. “ज्ञानोबा-तुकाराम”चा गजर आकाश दुमदुमवतो. दर्शनाची वेळ येते. विठ्ठल समोर उभा असतो. पण त्या क्षणी भक्ताला उमगते—मी विठ्ठलाला पाहायला आलो होतो पण प्रत्यक्षात विठ्ठलच माझ्या मनात मला दर्शन देत होता. दर्शन संपते. दिंड्या परतीच्या वाटेवर निघतात. धुळीचे ढग विरतात. टाळांचा नाद दूरवर विरून जातो. पण खरी वारी तेव्हा सुरू होते. कारण पंढरपूर मागे राहते; विठ्ठल मात्र सोबत निघतो. तो आपल्या विचारात उतरतो, आपल्या वाणीला माधुर्य देतो, आपल्या कृतीत सेवा फुलवतो आणि आपल्या नजरेला समतेची दृष्टी देतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात— “आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥”

हा आनंद दर्शनाचा नसतो; तो अंतर्मनात जागलेल्या विठ्ठलत्वाचा असतो. शेवटी जाणवते—वारी पंढरपुरला संपत नाही; ती तेथूनच सुरू होते. विठ्ठलाच्या विटेपर्यंत पोहोचणे सोपे आहे; परंतु विठ्ठलाच्या विचारापर्यंत पोहोचणे कठीण आहे. जो आपल्या मनातील द्वेष वितळवतो, अहंकाराची वीट खाली ठेवतो, प्रत्येक जीवात पांडुरंग पाहतो आणि प्रत्येक सेवेत परमेश्वराचा स्पर्श अनुभवतो, त्याच्याच जीवाची खरी वारी पूर्ण होते. मग चंद्रभागा बाहेर वाहत नाही; ती अंतःकरणात झुळझुळू लागते. अभंग ओठांवर राहत नाही; तो आचरणात उतरतो आणि विठ्ठल मंदिरात उभा राहत नाही; तो आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात चिरंतन निवास करतो. तेव्हाच अंतर्मन नकळत गुणगुणू लागते..

‘विठूचिया द्वारी, माझ्या जीवाची ही वारी…
जन्मोजन्मी सुख धाम ठरो माझी ही पंढरी.’

लेखिका :- डॉ.मंजूषा कुलकर्णी
(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका,कवयित्री)

Back to top button