गणेशोत्सव म्हणजे भक्तीने श्रद्धेने सर्व समाजाला एकत्र करणारा असिम उत्साहाचा आणि आनंदाचा उत्सव. गणरायाचे आगमन झाले की त्याच्या स्वागताला सगळे एक होतात. याच माध्यमातून समाजाचे एकत्रिकरण, संवाद आणि विचारांचे आदान प्रदान सार्वजनिकरित्या सुरू आहे. समरस समाजाच्या एक्यासाठी गणेशोत्सवाची भूमिका नेहेमीच अतुल्य अमुल्य राहिली आहे. भाषा प्रांत जात धर्म आणि लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन गणेशोत्सव समरसतेचे गान गात आहे. गणेशोत्सवातून निर्माण होणार्या समरसतेचा जागर या लेखात केला आहे.
गणपती विद्येची देवता आहे. गणाचा पती लोकधिराज आहे. त्याची कृपा जातपात वंशवर्ण लिंगाच्या पलिकडे जाऊन सर्वच भक्तांवर समान आहे. आजही गणेयोत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नावर मंथन करण्यात येते. गणपती बापाच्या साक्षीने समाजाने समस्यांवर मात करण्याची जिद्द निर्माण होते. गणेशोत्सवामध्ये आयोजित होणार्या कार्यक्रमाचा किंवा देखाव्यांचा मागोवा घेतले तर जाणवते की यामध्ये सामाजिक भान जपलेले असते. समाजाचे प्रश्न आणि त्यावरचे सकारात्मक उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. संविधान, लोकशाही हुंडाविरोधी किंवा नशामुक्ती अभियान किंवा बालविवाहविरोध ते अगदी लव्हजिहाद विरोध ते दहशतवाद विरोध या विषयावरही अनेक देखावे साजरे केले जातात. या सगळ्या मागचा हेतू हाच असतो की समाजात सकारात्मक जाणिव जागृती व्हावी.
वस्ती पातळीवर गणेशोत्सव साजरा करणार्या शेकडो मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी हे सर्व समाजाचे असतात. अमुक एक जातीचाच अध्यक्ष असेल आणि तोच बाप्पाच्या उत्सवाचे नियोजन करेल असे काही नसते. शहर गाव खेडे कुठेही जा सर्वच वस्तीत बाप्पा आज विराजमान झाले आहेत. त्याच्या पुजाअर्चेत सगळेच आपआपल्यापरीने योगदान देतात. गणेशोत्सवादरम्यान विविध स्पर्धा, कलाविष्कार दाखवणारे कार्यक्रम, समाजभान जपणारे आणि जागरण करणारी व्याख्यान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित केली जातात. उत्सवादरम्यान श्रद्धाळू भक्तांनी अर्पण केलेल्या दानाचा विनीयोगही अनेक मंडळ सामाजिक कार्यासाठी करतात.
यावर्षीही समाजाच्या सर्वच स्तरातून गणरायाची मनोभावे पुजाअर्चा केली जात आहे. फुलमाळा करणारे असोत की ढोल ताशा वाजवणारे असोत की सजावट करणारे असोत की मंडप परिसर स्वच्छ करणारे असोत की बाप्पाची पुजा यथासांग सांगणारे असोत यापैकी कुणीही कुणाची जात विचारत नाही. गणपती माझा आहे मला जे जमते त्याने बाप्पाची सेवा करणार हाच भाव त्यांच्यात असतो. गणपती बाप्पा म्हंटले की आबाल थोरांचे लाडके दैवत. इथे कोणत्याही भेदाला थारा नाही. गणपती बापा म्हंटले की उपस्थित प्रत्येकजणाच्या ओठावर येणार मोरया! गणपती बाप्पा लवकर या चैन पडेना आम्हाला असे म्हणत सगळा समाज गणेश विसर्जनाच्या दिवशी भावविभोर होतो. गणेशोत्सवाचा अल्लेख गौरी गणपती केला जातो. गणपती आले की त्यांच्यापाठी गौराई येते.
मातृ शक्तीचा जागर होतो. यात श्रिमंत की गरीब असा भेदाभेद नसतो. णपतीबाप्पाचे आगमन असो की निरोपाची मिरवणूक असू दे भाविक श्रद्धाळूंना कोणतीही जात नसते. ते केवळ गणरायाचे भक्त असतात. गणरायाचे आगमन होताना उत्साहाने आनंदित झालेले तर निरोपाच्या वेळेस बाप्पा जाणार म्हणून मनात दुख दाटून आलेले तेे भाविक ! करोडो लोक केवळ गणेश भक्त असतात. कोण कोणत्या जातीचा,गरीब की श्रिमंत आणि इतर भेदभाव या गणेशोत्सवामध्ये नसतो. सगळे धार्मिक आस्थेच्या बंधाने जोडलेले असतात. गणरायाची श्रद्धा सगळ्यांना एकत्र करते.
मात्र ही एकता काही विघातकी लोकांच्या पोटात शुळ उठवते. त्यामुळेच तर गौरव मोरे किंवा भाऊ कदम या कलाकरांनी गणेशाची पुजा केली म्हणून काही विकृत विचारांच्या व्यक्तीं त्यांना ट्रोल करतात. गौरव मोरेला प्रश्न विचारला गेला की की बौद्ध समाजाचा आहेस का? तु गणपतीची पुजा का केलीस? आमच्या बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांचा भंग केलास. तथागत बुद्धांचा आणि डॉ बाबासाहेबांचा अपमान केला. हे असे म्हणणारे जे लोक होते ते स्वताला बाबासाहेबांचे अनुयायी मानतात पण प्रत्यक्षात डॉ बाबासाहेबांचे विचार यांना कळलेच नाही आणि त्यांचे नावही घेण्याची लायकी अशा लोकांची नाही. तर गौरव मोरेला काही लोकांनी ट्रोल केले मात्र त्याच्या शेकडो पटीने जास्त लोक त्याच्या समर्थनार्थ आले. पण हे समर्थन आताच आहे का? तर अजिबात नाही. स्वातंत्र्यपुर्व काळातही विविध सामाजिक मंडळ गणेशोत्सव साजरा करायची. स्वातंत्र्यपुर्व काळातही गणेशोत्सव हा सामाजिक समरसतेचा केंद्रबिंदू होता.
१९२६ मध्ये मुंबईतील दादर सार्वजनिक गणेशोत्सव (ज्याला काही ठिकाणी ’जावळे कमिटी’चा गणेशोत्सव असेही म्हटले गेले आहे) मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.अर्थात तत्कालीन परिस्थितीमध्ये काही लोक सामाजिक समता आणि समरसतेला विरोध करणारी होतीच. त्यामुळे बाबासाहेबांनी गणेशोत्सवामध्ये सहभागी होऊ नये यासाठी काही लोकांनी ताशेरे ओढण्यास सुरवात केली . पण मंडळ ठाम राहिले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. ते उत्सावामध्ये आले त्यांनी व्याख्यान दिले.
ते म्हणाले ” जोपर्यंत समाजातून ही उच्च-नीचतेची भावना आणि जातीभेद नष्ट होत नाही, तोपर्यंत देशाची आणि समाजाची खरी प्रगती किंवा ऐक्य शक्य नाही. खरी राष्ट्रीय एकात्मता ही सामाजिक समतेच्या पायावरच उभी राहू शकते.” त्यांनी तिथल्या शोषित आणि वंचित समाजाला आवाहन केले की, आपल्या धार्मिक आणि सामाजिक हक्कांसाठी त्यांनी स्वतःहून पुढे आले पाहिजे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता सन्मानाने जगले पाहिजे. १९२६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर जर गणेशोत्सवामध्ये सहभागी होऊन समाजहिताचे जागरण करत असतील तर अमुक एक व्यक्ती अमुक एक जातीची आहे म्हणून तीने गणेशोत्सव साजरा केला तर बाबासाहेबांचा अपमान होईल असे म्हणणारे लोक हे धुर्त पाखंडी आणि डॉ बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधकच म्हणायला हवेत. या परिक्षेपात वाटते की उत्सवाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल होत असतात.
थोडक्यात गणेशोत्सव हा उत्सव मानवी मुल्यांचा उद्धोष करणारा समरसतेचा उत्सव आहे . समाजाचे मंगल करणारा उत्सव आहे.त्यामुळेच तर म्हणतात —
तू मंगलकारी जगत अधिकारी
कर्मरूपी वाटे वरचा तू पालनहारी
तू आरंभ तू विशेष
तूच आमचा श्री गणेश…
लेखिका :- योगिता साळवी