ECONOMYNews

महिला शेतकऱ्यांची पारंपरिक प्रतिमा बदलण्याची गरज – मंजू दीक्षित

“हम भारत की नारियां वैभव लाएंगी…”च्या घोषणेने दुमदुमले इंदिरा गांधी स्टेडियम

विकसित राष्ट्र आणि निरोगी समाजाच्या संकल्पपूर्तीसाठी देशातील महिला शेतकरी सज्ज

३० सप्टेंबर २०२६ नवी दिल्ली : भारतीय किसान संघाच्या अखिल भारतीय महिला किसान कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन ३० सप्टेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते गो-पूजन, भगवान बलराम पूजन आणि ध्वजारोहण केल्यानंतर ‘हम भारत की नारियां वैभव लाएंगी’ या घोषणेने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. देशभरातील विविध प्रांत आणि गावांमधून हजारोंच्या संख्येने महिला शेतकरी या संमेलनात सहभागी झाल्या.

नारीशक्ती सृजन आणि संवर्धनाचे प्रतीक – प्रा. विमला डूंकवाल

उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी आणि कोटा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. विमला डूंकवाल यांनी सांगितले की, भारतातील नारीशक्ती एकाच वेळी सृजन आणि संवर्धनाचे कार्य करण्यास सक्षम आहे. नारी ही अन्नपूर्णा आणि दुर्गेचे स्वरूप आहे. ती आपल्या अधिकारांपेक्षा आधी आपल्या कर्तव्यांचा विचार करते.
तत्पुर्वी अखिल भारतीय महिला संयोजिका मंजू दीक्षित यांनी संमेलनाची प्रस्तावना मांडली. यावेळी त्या म्हणाल्या, “भारतातील महिला शेतकऱ्यांची पारंपरिक प्रतिमा बदलण्याची आवश्यकता आहे. आज महिला शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या ऊर्जेच्या माध्यमातून कुटुंबासोबतच देशाच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.”

या सत्रात अखिल भारतीय अध्यक्ष के. साई रेड्डी, अखिल भारतीय उपाध्यक्ष श्रीमती सुशीला विश्नोई आणि मंत्री वीणा सतीश यांनीही महिला शेतकऱ्यांना संबोधित केले.

‘गौ-कृषी-वाणिज्यम्’ शिवाय २०४७ च्या विकसित भारताची कल्पना अशक्य

समारोपाच्या सत्रात अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्रा यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “२०४७ च्या विकसित आणि निरोगी भारताचा संकल्प ‘गौ-कृषी-वाणिज्यम्’ आणि जैविक शेतीशिवाय अपूर्ण आहे.”

तसेच त्यांनी, सरकारला विषमुक्त शेती, रोगमुक्त समाज आणि अमृत आहारयुक्त धोरण तयार करण्याचे आवाहन या सत्रात बोलताना केले.
अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी म्हणाले, “स्वावलंबी आणि आत्मनिर्भर महिला शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळाल्याने गाव, समाज आणि कुटुंबाचा गौरव आपोआप वाढेल.”

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी, राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सह-संपर्क प्रमुख रितू शर्मा यांच्यासह भारतीय किसान संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान..

संमेलनात देशभरातून प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला…

• गौ-कृषी-वाणिज्यम् – श्रीमती सुनंदा सायसिंग (महाराष्ट्र)
• जैविक शेती – श्रीमती दीपाली ओरांव (पश्चिम बंगाल)
• बियाणे संवर्धन – श्रीमती कमला बेन (गुजरात)
• पशुपालन – श्रीमती अंबा कालिंधी आणि श्रीमती पंपा गराई (पश्चिम बंगाल)
• रोजगार निर्मिती – श्रीमती पुष्पा सिंह (बिहार)
• अन्नप्रक्रिया – श्रीमती माया सिन्हा महापात्रा (ओडिशा), श्रीमती सुलता चटर्जी आणि श्रीमती शुक्ला बैरागी (पश्चिम बंगाल)

इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ‘विविधतेतील एकते’चे दर्शन

संमेलनात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला शेतकरी आपल्या-आपल्या प्रांतांच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या दिसून आल्या. महिलांनी आपल्या-आपल्या भाषांमध्ये लोकगीते सादर केली तसेच सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण केले. त्यातून भारताची सांस्कृतिक समृद्धी आणि ‘विविधतेतील एकता’ यांचे मनोहारी दर्शन घडले.

संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होण्यासाठी आलेल्या महिला शेतकरी कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या तिकिटाचा आणि प्रवासाचा खर्च करून दिल्ली येथे पोहोचल्या होत्या.विविध सत्रांमध्ये त्यांनी कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने आणि समस्यांवर मुक्तपणे चर्चा केली. तसेच या समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Back to top button