देशभरातून निवड झालेल्या उत्कृष्ट महिला शेतकऱ्यांचा होणार सन्मान
नवी दिल्ली : येत्या ३० सप्टेंबरला इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या अखिल भारतीय महिला किसान कार्यकर्ता संमेलनानिमित्त दिल्ली येथील भारतीय किसान संघ कार्यालयात २८ सप्टेंबर ला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्रा आणि अखिल भारतीय महिला संयोजिका मंजू दीक्षित यांनी सांगितले की भारतीय किसान संघ ही देशातील सर्वात मोठी शेतकरी संघटना आहे.
देशातील ६० हजारांहून अधिक गावांमध्ये संघाच्या ग्राम समित्या कार्यरत असून या समित्यांमध्ये ४२ लाखांहून अधिक महिला व पुरुष शेतकरी कार्यकर्ते सक्रिय सदस्य म्हणून काम करतात. यामध्ये सुमारे ७ लाख महिला शेतकरी कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भारतात पेरणी, लागवड, कापणी, तण नियंत्रण आणि पशुपालन यांसारख्या शेतीशी संबंधित ६० ते ८० टक्के कामांची जबाबदारी महिला सांभाळतात. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने शेती व्यवसायाचा कणा आहेत, असे म्हणता येईल असेही त्यांनी नमूद केले .
“महिला शेतकरी पिढ्यान्पिढ्या चालत आलेले पारंपरिक कृषी ज्ञान जतन करण्यासोबतच देशी बियाण्यांचे संरक्षण आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘गौ कृषी वाणिज्यम्’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणे, रसायनमुक्त अन्नासाठी गाईवर आधारित सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रत्यक्षात आणणे तसेच कुटुंब आणि समाजाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात महिलांची अग्रणी भूमिका आहे.” असेही ते म्हणाले. शेती, दुग्ध उत्पादन आणि ग्रामीण हस्तकलेच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासोबतच आता कृषी व्यवस्थापन आणि निर्णयप्रक्रियेतही महिला सक्रिय सहभाग घेत आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, २०२६ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारतातील महिला शेतकऱ्यांना समाजात ‘शेतकरी’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासमोरील आव्हाने अधोरेखित करण्यासाठी भारतीय किसान संघातर्फे अखिल भारतीय महिला किसान कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन ३० सप्टेंबर २०२६ रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले असून, त्याची सुरुवात सकाळी ९.०० वाजता होईल. या संमेलनात देशातील सर्व राज्यांतील महिला शेतकरी कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत.
या संमेलनात गौ कृषी वाणिज्यम्, सेंद्रिय शेती, बियाणे संरक्षण, पशुपालन, रोजगार आणि अन्नप्रक्रिया या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेदरम्यान अखिल भारतीय उपाध्यक्षा सुशीला विश्नोई आणि अखिल भारतीय मंत्री वीणा सतीश उपस्थित होत्या.