विचारांची दृढता आणि इतरांच्या दुःखांप्रती संवेदनशीलतेचा दुर्मीळ संगम म्हणजे अशोक सिंघल जी यांचे व्यक्तिमत्त्व – दत्तात्रेय होसबाळे जी
श्री. अशोक सिंघल जी देशातील युवकांसाठी प्रेरणास्थान होते – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२६
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित अशोक सिंघल जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, “भारतातील युवकांनी श्रद्धेय अशोक सिंघलजींच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी,” असे आवाहन केले.
“अशोक सिंघल जी यांनी आपले संपूर्ण जीवन देश, समाज आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी समर्पित केले. राम जन्मभूमी आंदोलनातील त्यांचे योगदान आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाप्रती त्यांची बांधिलकी सदैव अविस्मरणीय राहील.” असेही ते म्हणाले.
भारतीय संस्कृती, आध्यात्मिक चेतना, हिंदू समाजाचे संघटन आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या युगद्रष्ट्याला श्री. अमित शाह यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या समारंभात अशोक सिंघल जी यांचे प्रेरणादायी जीवन, विचार तसेच देश आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यात आले. विश्व हिंदू परिषद आणि अशोक सिंघल फाउंडेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “विश्व हिंदू परिषद आणि श्री अशोक सिंघल फाउंडेशन यांच्याकडून अशोक सिंघलजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या जीवनकार्याचा, मूल्यांचा आणि योगदानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत, विशेषतः युवकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. हे जन्मशताब्दी वर्ष युवा पिढीला अशोक सिंघल जी यांचे आदर्श समजून घेण्याची आणि राष्ट्र व समाजासाठी त्यांनी समर्पित केलेल्या जीवनातून प्रेरणा घेण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
या कार्यक्रमात परमपूज्य युगपुरुष महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरि जी महाराज म्हणाले, “हा आपला देश आहे आणि त्याच्या प्रत्येक वारशाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. आपल्या समाज आणि धर्माप्रती आपण सदैव जागरूक राहिले पाहिजे, कठोर परिश्रम केले पाहिजेत आणि देशाला अधिक सामर्थ्यवान व प्रगतिशील बनविण्यासाठी योगदान दिले पाहिजे. हाच श्री अशोक सिंघल जी यांचा विचार होता.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे जी म्हणाले, “श्री अशोक सिंघल जी यांच्या व्यक्तिमत्त्वात विचारांची दृढता आणि इतरांच्या दुःखांप्रती अपार संवेदनशीलतेचा दुर्मीळ संगम होता. एकदा एखादा निर्णय घेतल्यानंतर ते त्यावर ठाम राहत असत. काम किती कठीण आहे, याकडे त्यांचे लक्ष नसे, ते कार्य कसे सिद्धीस नेता येईल, यावर त्यांचा भर असे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यापासून भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, समाजसेवा आणि परंपरांच्या संवर्धनापर्यंत श्री. अशोक सिंघलजींचे योगदान अतुलनीय राहिले. दृढ संकल्प करण्याबरोबरच त्या संकल्पांचे संघटित आणि सातत्यपूर्ण कार्यात रूपांतर करण्याची विलक्षण क्षमता त्यांच्यात होती.
समारंभाचा शुभारंभ १०० वेदपाठी बटुकांच्या शंखनाद आणि वैदिक मंत्रोच्चाराने झाला. या कार्यक्रमात ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के दिव्य पदचिह्न’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातून भारतीय समाजावर भगवान श्रीराम यांच्या जीवनमूल्यांचा, आदर्शांचा आणि त्यांच्या अमीट सांस्कृतिक प्रभावाचा वेध घेण्यात आला आहे. यावेळी ‘श्रीराम स्तंभा’च्या प्रतिकृतीचे अनावरणही करण्यात आले.
यावेळी अयोध्या जिल्ह्यातील राम वन-गमन पथावर उभारण्यात येणाऱ्या ‘श्रीराम स्तंभां’चे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. भगवान श्रीरामांच्या वनगमन यात्रेच्या स्मृती तसेच या यात्रेशी निगडित सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्थळांशी जनसामान्यांचा संबंध जोडणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. याशिवाय, श्री. अशोक सिंघलजींचे जीवन, आध्यात्मिक मूल्ये, संघटनात्मक कार्य तसेच रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांची भूमिका यांवर आधारित छायाचित्रे, दस्तऐवज आणि ऐतिहासिक साहित्याचे विशेष प्रदर्शनही भरविण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, “पूज्य श्री अशोक सिंघल जी यांचे जीवन भारतीय संस्कृती, आध्यात्मिक चेतना आणि राष्ट्राप्रती निःस्वार्थ समर्पणाचा जिवंत स्रोत आहे. जन्मशताब्दी वर्ष हे केवळ त्यांचे स्मरण करण्याचे वर्ष नसून, त्यांचे आदर्श, सेवाभाव आणि भारतप्रेमाची भावना पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे वर्ष आहे.”