आता आपण नवरात्रोत्सवाच्या मंगलपर्वात प्रवेश करत आहोत. दुर्गामातेने महिषासुरासह अनेक असुरांचा संहार केला. त्या युद्धाचे हे नऊ दिवस! देवीच्या विविध रूपांच्या शक्तीची उपासना करण्याचा हा उत्सव. संपूर्ण समाजातही ही शक्ती निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या काळात साधना करतो.आपणही या निमित्ताने आपल्या समाजाची शक्ती काय आहे, ती कशी आहे, याचे स्मरण करू या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचाही याच संदर्भात विचार करायचा आहे. आजचा विषय आहे ‘संघटनशक्ती’.
सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचे आहे की संघशक्ती ही समाजाचीच शक्ती आहे. संघाच्या प्रार्थनेत स्वयंसेवक म्हणतात की, आम्ही हिंदूराष्ट्राचे अंगभूत घटक आहोत. याचा अर्थ असा की संघ, समाज, देश आणि राष्ट्र यांच्यात अद्वैताचे नाते आहे. संघाला समाजात स्वतंत्र ताकद उभी करायची नाही किंवा प्रचलित भाषेप्रमाणे ‘प्रेशर ग्रुप’ बनवायचा नाही, तर संपूर्ण समाजाला एकात्म आणि समरस करत त्याची ताकद वाढवायची आहे.
संघटन म्हणजे काय, याचा विचार करू लागलो की लक्षात येते की संघटन म्हणजे केवळ संख्या नव्हे किंवा नुसती गर्दीही नव्हे, तर संघटन हा एक भाव आहे. त्यामध्ये प्रत्येक घटकाचे संघटनेशी आणि इतर घटकांशी काय नाते आहे, याचा विचार असतो. त्यामुळे सर्व घटकांमध्ये परस्परांप्रति आत्मीयतेचा आणि बंधुत्वाचा भाव असतो. तसेच इतरांविषयी आणि समाजाविषयी कर्तव्यबोधही असतो. हा संघटनभाव निर्माण करणे, हे संघटनेचे मूलभूत कार्य आहे.
या कार्यात अनेक अडचणीही आहेत. विविधतेतून एकतेचे दर्शन करण्याऐवजी भेदभाव पाहणाऱ्या विचारांचा अडसर आहे. तसेच जात, भाषा, प्रांत किंवा उपासनापद्धती यांवर आधारित वेगवेगळ्या तथाकथित अस्मिता फुलवून परस्परांना झुंजवणाऱ्या शक्तीही संघटनेच्या मार्गातील अडथळे आहेत. अशा विभेदकारी शक्तींवर मात करून संपूर्ण समाजात एकात्मता आणि समरसता जागवणे, तसेच प्रत्येकामध्ये कर्तव्यबोध निर्माण करणे, हेच संघटन आहे.
संघटनशक्तीचे महत्त्व
संघटनशक्तीमुळे काय साध्य होऊ शकते, हे आपण संघसंस्थापक परमपूजनीय डॉ. हेडगेवार यांच्याच शब्दांत पाहू या.
“संगठन ही राष्ट्र की प्रमुख शक्ति होती है। संसार में कोई भी समस्या हल करनी हो तो वह शक्ति के आधार पर ही हो सकती है। शक्तिहीन राष्ट्र की कोई भी आकांक्षा कभी भी सफल नहीं होती। परन्तु सामर्थ्यशाली राष्ट्र कोई भी काम, जब चाहे तब, अपनी इच्छानुसार कर सकता है।”
संघटनकार्यातून शक्ती निर्माण करण्यासाठी संघाने केलेले प्रयत्न तीन प्रकारे समजून घेता येतात. हे संघाच्या नावातच स्पष्ट होते.
१. राष्ट्रीय
‘राष्ट्रीय’ या शब्दातून आपला विचार व्यक्त होतो. पूजनीय डॉक्टरजींच्या वरील वचनातही तोच विचार व्यक्त झाला आहे. आपल्या हिंदूराष्ट्रविचारामागील अनेक शतकांचे अनुभव हेच सांगतात की या भूमीत उदयास आलेले धर्म आणि संस्कृती केवळ या देशातीलच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आवश्यक असलेले विचार जगाला देत आहेत. अशा शाश्वत विचारांवर आधारित कार्य, हे संघटनशक्तीचे पहिले वैशिष्ट्य आहे.
२. स्वयंसेवक
स्वयंसेवक या शब्दाचा अर्थ आहे, स्वयंप्रेरणेने मातृभूमीची सेवा करणारा आणि समाजाला आत्मीयतेने सशक्त करण्यासाठी झटणारा. या शब्दाला खरा अर्थ दिला आहे तो गेल्या शंभर वर्षांत असे आचरण करणाऱ्या स्वयंसेवकांनी. प्रसंगी प्राणांचे बलिदान देणाऱ्या आणि आयुष्यभराचा प्रत्येक क्षण संघकार्यासाठी व समाजकार्यासाठी वेचणाऱ्या स्वयंसेवकांचे समर्पण हा संघटनशक्तीचा दुसरा आधारस्तंभ आहे.
३. संघ
संघटनशक्तीचा तिसरा आधार आहे ‘संघ’ म्हणजेच संघटितपणे काम करण्याची कार्यपद्धती. तिचा वस्तुपाठ संघाच्या विविध कार्यक्रमांतून आणि उपक्रमांतून दिसून येतो. मुळात, शंभर वर्षे हिंदूंचे संघटन एकाच दिशेने, एकाच विचाराने, त्यात तुकडे न पडता अभंगपणे आणि अखंडपणे वाटचाल करत आहे, हा अनुभवच या समाजाच्या दृष्टीने विलक्षण आहे. त्याचे कारण म्हणजे व्यक्तिप्रधान नव्हे, तर ध्येयप्रधान कार्यपद्धती. त्याचबरोबर संपूर्ण समाजाला सोबत घेऊन, एकात्मता आणि समरसतेचा अनुभव देत वाटचाल करणे, हेही या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे. चला तर, या शुभपर्वाच्या निमित्ताने आपण सर्वजण या संघटनकार्यात सर्वशक्तीनिशी सहभागी होण्याचा आपला संकल्प दृढ करू या आणि त्यासाठी शक्ती देण्याची प्रार्थना मातृशक्ती दुर्गेला करू या.
लेखक –सुनिल श्रीकृष्ण सप्रे.
अध्यक्ष, राष्ट्रीय सेवा भारती व रा.स्व.संघ पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य..