CultureHinduismReligion
Trending

तळकोकणात अशी साजरी होते नरक चतुर्दशी!

कोकणात आश्विन कृष्ण चतुर्दशीला मोठ्या उत्साहात साजरा होणार दीपावलीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अन्यायाकडून न्यायाकडे जाण्याचा संदेश देणारा हा सण आहे. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची आणि घराबाहेर दिवे लावण्याची आपली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांत दसऱ्याला रावण दहन केले जाते, मात्र सिंधुदुर्ग आणि गोव्यात दीपावलीच्या पहाटे ‘नरकासुर दहन’ करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. नरकचतुर्दशीची आदली रात्र आणि पहाट संपूर्ण मालवण नगरीसाठी कला, संगीत, उत्साह आणि भक्तीचा महासंगम असतो. 

मालवणमधील ‘नरकासुर दहन’:

मालवणात नरकासुर दहनाची तयारी दिवाळीच्या १५ दिवस आधीपासूनच सुरू होते. प्रत्येक वाडी, गल्ली आणि मित्रमंडळी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

बांबूच्या कामट्या, गवत, सुतळी, कागद आणि शाडूच्या मातीचा वापर करून १० ते २० फूट उंच नरकासुराचे भव्य पुतळे साकारले जातात. पुतळ्याचे लालभडक डोळे, मोठे सुळे, हातातली तलवार आणि क्राळविक्राळ चेहरा पाहून अंगावर शहारे येतात. पुतळ्याच्या आत फटाके आणि दारूगोळा भरलेला असतो.

नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्रीपासूनच मालवणच्या बाजारपेठेत आणि रस्त्यांवर या नरकासुरांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशांचा गजर, बेंजो पार्टीचे संगीत आणि तरुणांचा जल्लोष यामुळे संपूर्ण शहर जागे असते.

सूर्योदयापूर्वी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास, मोकळ्या मैदानात किंवा समुद्रकिनारी हे पुतळे एकत्र आणले जातात. भगवान श्रीकृष्णाच्या वेशातील बालक किंवा स्थानिक मानकरी नरकासुराचा प्रतीकात्मक वध करतात आणि पुतळ्याला अग्नी दिला जातो. फटाक्यांच्या आतषबाजीत नरकासुर जळून खाक होतो.

हा ‘नरकासुर दहन’ उत्सव केवळ एक प्रथा नसून, तो कोकणी माणसाच्या कलेचा, एकजुटीचा आणि जिवंत संस्कृतीचा एक सुंदर अविष्कार आहे. नरकासुर तयार करण्याच्या निमित्ताने गावातील सर्व वयोगटातील लोक एकत्र येतात. स्थानिक कलाकारांच्या हस्तकलेला आणि सर्जनशीलतेला मोठी चालना मिळते. अनेक ठिकाणी ‘सर्वोत्कृष्ट नरकासुर स्पर्धा’ देखील आयोजित केल्या जातात.

नरकासुराची पौराणिक कथा:

नरकासुराने प्रचंड तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की, त्याचा वध केवळ त्याच्या आईच्या हातूनच होऊ शकेल. इच्छेनुसार वर प्राप्त झाल्यानंतर उन्मादलेल्या नरकासुराने प्राग्ज्योतिषपूरवर राज्य करताना तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. त्याने देवांचे दागिने पळवले आणि १६,१०० राजकन्यांना बंदी बनवून ठेवले.

अखेर देवांच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्ण आणि भूमातेचा अवतार असलेली सत्यभामा यांनी नरकासुराशी युद्ध केले.  घनघोर युद्धात सत्यभामा हिने नरकासुराचा वध केला आणि बंदीवान स्त्रियांची मुक्तता केली तो हा दिवस आश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता, जो आज ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा. कथेनुसार, मृत्यूपूर्वी नरकासुराने यादिवशी मंगलस्नान करणाऱ्यांना नरकयातनांपासून मुक्ती मिळावी,अशी इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी ती मान्य करून वर दिला. तेव्हापासून नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे.

नरकासुर दहन झाल्यानंतर पहाटे घरी परतल्यावर पारंपरिक कोकणी पद्धतीने दिवाळीच्या विधींना सुरुवात होते. 

अंगाला खोबरेल तेल आणि सुवासिक उटणे लावून गरम पाण्याने मंगल स्नान केले जाते. कोकणात स्नानानंतर दारात ‘कारिट’ (एक कडू रानफळ) डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडण्याची प्रथा आहे. हे फळ म्हणजेच नरकासुर मानले जाते. कारिट फोडल्यावर आयुष्यातील कडवटपणा आणि दुष्ट प्रवृत्ती संपवून गोडवा यावा यासाठी त्याचा रस कपाळाला आणि थोडा जिभेला लावतात. 

नरकचतुर्दशीच्या पहाटे गावच्या वेशीवर आणि समुद्रकिनारी पेटणाऱ्या नरकासुराच्या अग्नीत आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, निराशा आणि कटुता जळून खाक होवो. उटण्याचा मंद सुवास, कारिटाच्या कडवटपणानंतर येणारी फराळाची गोडी आणि अंगणात उजळणाऱ्या पणत्यांचा स्निग्ध प्रकाश तुमचे आयुष्य सुख, शांती आणि आरोग्याने भारून टाको. सर्वांना नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा! 

Back to top button