News

लोकसंस्कृतीचा महाकुंभ ‘लोकमंथन २०२६’ जयपूरमध्ये ४ ते ६ डिसेंबरदरम्यान

२४ समांतर सत्रांमध्ये लोकजीवनाशी संबंधित विविध विषयांवर मंथन; रोमा आणि यझिदी समुदायांचे प्रतिनिधीही सहभागी होणार

जयपूर, १८ नोव्हेंबर :लोकमंथनच्या पाचव्या पर्वाचे आयोजन ४, ५ आणि ६ डिसेंबर २०२६ रोजी जयपूर येथील जवाहर कला केंद्रात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, अयोध्येतील श्रीहनुमत निवासाचे पीठाधीश्वर आचार्य मिथिलेशनन्दिनीशरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच वक्ते म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. देशभरातून निवडलेले दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी आणि सहभागी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

बुधवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक आणि लोकमंथन स्वागत समितीचे महासचिव जे. नंदकुमार तसेच राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि लोकमंथन आयोजन समितीच्या अध्यक्षा दिया कुमारी यांनी ही माहिती दिली. जे. नंदकुमार यांनी सांगितले की, लोकमंथन हा केवळ एक कार्यक्रम नसून लोकजीवन, लोकचेतना आणि भारतीय ज्ञानपरंपरेला राष्ट्रीय विचारमंथनात योग्य स्थान मिळवून देण्याचा व्यापक प्रयत्न आहे. लोकजीवन आणि समाजातील विविध घटकांमध्ये संवादाचा सेतू निर्माण करणे, तसेच लोकानुभव, लोकज्ञान आणि परंपरा यांची आधुनिक शैक्षणिक व बौद्धिक विचारप्रवाहांशी सांगड घालणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लोक म्हणजे केवळ ग्रामीण किंवा जनजाती समाज नव्हे, तर भारताची मूळ संस्कृती होय. ही संस्कृती देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारी आहे.

ते म्हणाले की, २०१६ मध्ये भोपाळ येथून सुरू झालेला लोकमंथनचा प्रवास रांची, गुवाहाटी आणि भाग्यनगर (हैदराबाद) असा होत आता जयपूरमध्ये पोहोचला आहे. मागील चार आयोजनांमुळे लोकसंस्कृती, लोककलाकार आणि पारंपरिक ज्ञान यांना राष्ट्रीय विचारमंथनात अधिक स्थान मिळाले आहे. तसेच आजवर दुर्लक्षित राहिलेल्या अनेक परंपरांना व्यापक समाजासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे.

यंदाच्या लोकमंथनमध्ये लोकशिक्षण, लोकस्वास्थ्य, लोकसंवाद आणि भारतीय क्रीडा परंपरा यांसह विविध विषयांवर २४ समांतर सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक सत्राचा कालावधी दीड ते दोन तासांचा असेल. या सत्रांमध्ये लोकपरंपरांचे प्रत्यक्ष प्रतिनिधी आपले अनुभव मांडतील. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील विद्वान, वैज्ञानिक, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि धोरणकर्ते त्यांच्याशी संवाद साधतील. या चर्चांमधून निघणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे लोकशिक्षण, लोकस्वास्थ्य, अभ्यासक्रम निर्मिती आणि भविष्यातील संशोधनासाठी आवश्यक सूचना तयार केल्या जातील. समांतर सत्रांमध्ये लोकशिक्षण, लोकस्वास्थ्य, लोकसंवाद, लोकविज्ञान, लोककला, लोकविमर्श, भारतीय दृष्टिकोनातून क्रीडा परंपरा आणि भारतीय हवामानाचा पारंपरिक अंदाज अशा विविध विषयांवरील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

या आयोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय सहभाग. देशाच्या विविध भागांतील प्रतिनिधींसह परदेशातील प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रोमा, यझिदी आणि लातविया येथील सांस्कृतिक परंपरांशी संबंधित प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येत आहे. यामुळे जगातील प्राचीन संस्कृतींमधील समान सांस्कृतिक सूत्रांवर संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

लोकमंथनाच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडणार – दिया कुमारी

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी म्हणाल्या की, लोकमंथनच्या आयोजनाची संधी राजस्थानला मिळणे ही अभिमानाची बाब आहे. या आयोजनाच्या माध्यमातून राजस्थानची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा, लोककला, भाषा आणि पारंपरिक ज्ञान यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल. ‘हम भारत के लोग’ या संकल्पनेवर आधारित लोकमंथनचा उद्देश नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडणे आणि भारतीय वारशाचे जतन व संवर्धन करणे हा आहे. त्या म्हणाल्या की, नव्या पिढीवर पाश्चात्त्य प्रभाव आणि वसाहतवादी मानसिकतेचा प्रभाव राहिला आहे. मात्र, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतीय संस्कृती, इतिहास आणि लोकपरंपरांना योग्य स्थान मिळत आहे.

लोकमंथनचा संदेश राज्यातील गावागावांपर्यंत आणि दुर्गम वस्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजस्थानमध्ये तीन टप्प्यांत ‘लोकदर्शन यात्रा’ आयोजित करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून राजस्थानमधील सर्व ४१ जिल्हे आणि शेकडो गावांना जोडण्यात आले. या यात्रेदरम्यान लोकगीते, लोकनृत्य, हस्तकला प्रदर्शन, महिला संमेलन, युवा संवाद आणि ग्रामदर्शन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रतिभावंत आणि स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

उपमुख्यमंत्री म्हणाल्या की, लोकमंथनमध्ये केवळ भाषणे होणार नसून संवादात्मक सत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. या सत्रांमध्ये युवक आणि महिलांना आपले विचार मोकळेपणाने मांडता येतील. लोकांमधून लोकचेतना, लोकचेतनेतून लोकशक्ती आणि लोकशक्तीतून राष्ट्रशक्ती’ हा विचार प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

https://vskbharat.com/lokmanthan-2026-a-grand-festival-of-folk-culture-will-be-held-in-jaipur-from-december-4-to-6/
Back to top button