बेंगळुरू: नोव्हेंबर २०२६
‘हंड्रेड इयर्स यंग: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकात अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या २० तरुण लेखकांनी लिहिलेली १८ प्रकरणे एकत्रित करण्यात आली आहेत. ज्या नेहमीच्या राजकीय आणि संघटनात्मक शब्दावलीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) चर्चा केली जाते, त्यापलीकडे जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या संग्रहात करण्यात आला आहे. वैयक्तिक अनुभव, व्यावसायिक प्रवास, सांस्कृतिक स्मृती, समाजसेवा, ओळख, क्रीडा, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय संबंध आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा या माध्यमांतून या पुस्तकात संघाचा वेध घेण्यात आला आहे, असे लेखिका रश्मी सामंत यांनी बेंगळुरू येथील भारतीय विद्या भवन येथे पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सांगितले.
त्या म्हणाल्या, “या पुस्तकातील लेखक हे केवळ एकाच संघटनात्मक विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे नाहीत. यामध्ये एक मुस्लिम महिला पत्रकार, एक क्वीअर (LGBTQ) हिंदू कार्यकर्ते, एक ब्रिटिश राजकीय विश्लेषक, एक इस्रायली संशोधक, जर्मनीतील भारतीय वंशाचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, एक प्रसिद्ध खेळाडू, एक चित्रपट निर्माते आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योजक, एक बॉलिवूड अभिनेता, एक काश्मिरी पंडित, एक राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू, एक तरुण शिक्षण उद्योजक आणि संघाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कामुळे ज्यांचे जीवन घडले आहे अशा अनेक व्यावसायिकांचा समावेश आहे.”
“याचा परिणाम म्हणून, एकाच साच्यातील संस्थात्मक विमर्शऐवजी वैयक्तिक मानवी अनुभवांचा एक संग्रह तयार झाला आहे,” असेही त्यांनी पुढे नमूद केले.
पुस्तकातील लेखक: त्यांची ओळख आणि योगदान
●आदित्य श्रीनिवासन -आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेतलेले वकील आणि सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ: मध्य पूर्वेतील सर्वसमावेशक (कॉस्मोपॉलिटन) वातावरणात वाढण्यापासून ते संघाचा शोध घेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास मांडला आहे. यातून शिस्त, वैयक्तिक जबाबदारी, चिकाटी आणि स्वतःच्या कृतीतून नेतृत्व करणे या गोष्टींवर ते प्रकाश टाकतात.
●विजय सुब्रमण्यम -कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्कचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ: चित्रपट, कथाकथन आणि लोकप्रिय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून ते संघाचा अभ्यास करतात. संघाने भारताच्या सांस्कृतिक स्मृती आणि सांस्कृतिक आत्मविश्वासाचे जतन करण्यास मदत केली असे त्यांनी मांडले आहे.
●राहुल कुमार कंबोज -फ्रँकफर्टच्या शहर संसदेत निवडून आलेले भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती: परदेशात राहणारे भारतीय आपली सांस्कृतिक ओळख कशी टिकवून ठेवू शकतात आणि समुदाय, संघटन व सेवेच्या माध्यमातून भारताची जागतिक प्रतिमा कशी उंचावू शकतात, याचा त्यांनी वेध घेतला आहे.
●विक्रांत मसी -राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते: राजकीय धारणांच्या पलीकडे जाऊन शिक्षण, आरोग्यसेवा, आपत्ती निवारण आणि ग्रामीण भागातील संघाच्या तळागाळातील कामाकडे पाहत,मानवी प्रतिष्ठेप्रती असलेली निस्वार्थ बांधिलकी म्हणजेच ‘सेवा’ असल्याचे त्यांनी मांडले आहे.
●रुबिका लियाकत -पुरस्कार विजेत्या पत्रकार आणि वृत्तनिवेदिका: एका मुस्लिम कुटुंबात लहानाचे मोठे होताना बालपणी संघाबद्दल असलेल्या भीतीपासून ते वैयक्तिक भेटी आणि निरीक्षणातून झालेल्या सखोल समजापर्यंतच्या आपल्या प्रवासाचे कथन त्यांनी केले आहे.
●अंकित भुपतानी -क्वीअर हिंदू कार्यकर्ते आणि LGBTQ समावेशकतेचे पुरस्कर्ते: LGBTQ हक्कांचा पुरस्कार हा पारंपरिक किंवा राष्ट्रवादी संस्थांच्या विरोधातच असला पाहिजे, या गृहीतकाला ते आव्हान देतात. भारताच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये संवाद, मूळ विचारप्रणाली आणि समावेशकतेची बाजू त्यांनी मांडली आहे.
●ख्रिस ब्लॅकबर्न -ब्रिटिश राजकीय आणि सुरक्षा विश्लेषक: संघाकडे पाहण्याचा एका युरोपियन उदारमतवादी व्यक्तीचा दृष्टिकोन त्यांनी दिला आहे. संघाची ऐतिहासिक मुळे, सांस्कृतिक प्रतिसाद आणि सामान्यतः लावल्या जाणाऱ्या राजकीय लेबल्सच्या पलीकडे झालेली त्याची उत्क्रांती त्यांनी तपासली आहे.
●रश्मी सामंत -ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतलेल्या लेखिका आणि ऑक्सफर्ड स्टुडंट्स युनियनच्या माजी अध्यक्षा: एका स्वयंसेवकाची मुलगी म्हणून त्या आपला वैयक्तिक दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे. वडिलांच्या शांतपणे सुरू असलेल्या समर्पित कामासोबत वाढताना कर्तव्य, सेवा, शिस्त आणि वारसा यांची समज कशी विकसित झाली, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
●येशया रोझेनमन आणि मतानेल लॉटनर -इस्रायली पत्रकार-संशोधक आणि संस्कृत, भारतीय तत्त्वज्ञान व तुलनात्मक धर्माचे संशोधक: ज्यू आणि भारतीय सांस्कृतिक अनुभवांमधील समांतर दुवे त्यांनी शोधले आहेत. ऐतिहासिक स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य न सोडता समाज प्रगती कशी साधू शकतात, याचे त्यांनी विश्लेषण केले आहे.
●विशेष भृगुवंशी -अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारतीय राष्ट्रीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार: शाखेत पाहिलेली शिस्त आणि सांघिक भावना यांचा संबंध ते आपल्या क्रीडा प्रवासाशी जोडून दैनंदिन सातत्य आणि सामूहिक जबाबदारीतून वैयक्तिक चारित्र्य कसे घडते, यावर त्यांनी विचार मांडले आहेत.
●यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार -म्हैसूर राजघराण्याचे वंशज आणि लोकप्रतिनिधी: संघ, समाजकल्याण आणि म्हैसूरचा लोकसेवेचा वारसा यांच्यातील संबंध तपासून, समाजाप्रती असलेली जबाबदारी हेच खरे नेतृत्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
●वृंदा कोटक -संघाच्या वैयक्तिक अनुभवांवर लिहिणाऱ्या तरुण लेखिका: वैयक्तिक चारित्र्य घडवण्यामध्ये संघाच्या परिसंस्थेतून आत्मसात केलेली मूल्ये, आपलेपणाची भावना आणि संकटांशी सामना करण्याची ताकद यांचा शांत पण खोल परिणाम कसा होतो हे त्यांनी उलगडून दाखवले आहे.
●युवराज आणि यशराज भारद्वाज -तरुण उद्योजक आणि संस्थापक: ‘शाखा ते स्टार्टअप्स’ या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक शिस्त, समस्या निराकरण, उद्योजकता आणि मोठ्या उद्देशासाठी काम करणाऱ्या संस्था उभारणीतील परस्परसंबंध स्पष्ट केला आहे.
●शरद विवेक सागर -सामाजिक उद्योजक आणि डेक्स्टेरिटी ग्लोबलचे संस्थापक: स्वामी विवेकानंदांची शिकवण, संघाचा चारित्र्य निर्मितीवर असलेला भर आणि वंचित पार्श्वभूमीतील तरुणांसाठी संधी निर्माण करण्याचा स्वतःचा प्रवास यांची सांगड त्यांनी घातली आहे.
●भाषा सुंबली -काश्मिरी पंडित अभिनेत्री आणि लेखिका: निर्वासितांचे मूल म्हणून लहानाचे मोठे होतानाचे अनुभव सांगत, विस्थापन, सांस्कृतिक अस्तित्व, स्मृती आणि आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी सामुदायिक आधाराचे महत्त्व यावर यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
●निखिल चंदवानी -सामाजिक उद्योजक आणि निर्वासित पुनर्वसन कार्यकर्ते: सिंधमधून विस्थापित झालेल्या हिंदू आणि शीख कुटुंबांसोबत केलेल्या कामाचा अनुभव, दुर्लक्षित समुदायांची सेवा, पुनर्वसन आणि त्यांचा सन्मान परत मिळवून देणे यातून राष्ट्रीय जबाबदारीला व्यावहारिक अर्थ कसा प्राप्त होतो, हे त्यांनी मांडले आहे.
●ऋषभ शाह -युवा-प्रणीत आंतरराष्ट्रीय संघटना I.I.M.U.N. चे संस्थापक आणि अध्यक्ष: संघ आणि संघाच्या कार्यकर्त्यांसोबतच्या संवादातून आलेले अनुभव, यातून संस्था उभारणी, संयम, नेतृत्व, संवाद आणि स्वतःपेक्षा समूहाला प्राधान्य देण्याचे महत्त्व याचे धडे त्यांनी अधोरेखित केले आहेत.
●सायना नेहवाल -ऑलिम्पिक पदक विजेती, माजी जागतिक नंबर १ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध बॅडमिंटन चॅम्पियन: क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी आवश्यक असलेली शिस्त, चिकाटी आणि चारित्र्य यांची सांगड त्यांनी ‘व्यक्ती निर्माण’ या संकल्पनेशी घातली आहे; तसेच हा वैयक्तिक विकास व राष्ट्रनिर्मिती यांतील समांतर असल्याचे अधोरेखित केले आहे.
संस्थात्मक दृष्टिकोन:
●डॉ. मोहन भागवत -सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: आपल्या विशेष संदेशात त्यांनी शतकातील चारित्र्य निर्मिती, निस्वार्थ सेवा आणि अधिक चांगले स्वयंसेवक बनण्यासाठी सुरू असलेल्या निरंतर प्रयत्नांवर प्रकाश टाकला आहे.
●सुनील आंबेकर- अखिल भारतीय प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: प्रस्तावनेत त्यांनी संघाच्या शताब्दी वर्षाला भारताचा सांस्कृतिक आत्मविश्वास, युवा नेतृत्व, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिर्मितीच्या दीर्घकालीन प्रकल्पाच्या संदर्भात मांडला आहे.
या संग्रहाला कोणती गोष्ट वेगळेपण देते?
या पुस्तकातील विविधता केवळ लेखकांच्या व्यवसायात किंवा चरित्रात नाही, तर ते एकाच संस्थेकडे कोणत्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात यामध्ये आहे:
●कुटुंबाच्या आतून: अदित्य श्रीनिवासन आणि रश्मी सामंत यांचे पिढीजात अनुभव.
●भारताबाहेरून: राहुल कुमार कंबोज, ख्रिस ब्लॅकबर्न, येशया रोझेनमन आणि मतानेल लॉटनर यांचे दृष्टिकोन.
●विविध धार्मिक आणि ओळख पार्श्वभूमीतून: रुबिका लियाकत, अंकित भुपतानी आणि भाषा सुंबली.
●लोकप्रिय संस्कृतीच्या माध्यमातून: विजय सुब्रमण्यम आणि विक्रांत मसी.
●क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून: सायना नेहवाल आणि विशेष भृगुवंशी.
●उद्योजकता आणि युवा विकासाच्या माध्यमातून: युवराज आणि यशराज भारद्वाज, शरद विवेक सागर आणि ऋषभ शाह.
●लोकसेवा आणि सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून: यदुवीर वाडियार, वृंदा कोटक आणि निखिल चंदवानी.
मध्यवर्ती संपादकीय कल्पना: २० तरुण यशस्वी व्यक्तींना संघाबद्दल एकच कथा सांगण्यास सांगण्याऐवजी, या पुस्तकात त्यांना संघाशी आलेला संपर्क, निरीक्षण, प्रश्न किंवा अनुभवांच्या स्वतःच्या कथा सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. काहींनी वैयक्तिक वारशातून लिहिले, काहींनी व्यावसायिक अनुभवातून, काही देशाबाहेरून, तर काही अशा पार्श्वभूमीतून लिहिले आहे ज्यांचा सामान्यतः संघाशी संबंध जोडला जात नाही.
“एकत्रितपणे, हे अनुभव शंभर वर्षे जुन्या संस्थेबद्दल अनेक मानवी दृष्टिकोन सादर करतात. त्यांचा उद्देश एकसुरी आवाज निर्माण करणे नसून, पिढ्या, व्यवसाय, राष्ट्रीयत्व आणि ओळख यांच्यातील एक संवाद घडवून आणणे हा आहे.” रश्मी सामंत म्हणाल्या.
RSS अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी रश्मी सामंत, RSS क्षेत्र कार्यवाह एन टिप्स्वामी, RSS प्रांत कार्यवाह डॉ. एम जयप्रकाश यांच्यासमवेत बेंगळुरू येथे “हंड्रेड इयर्स यंग: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” या पुस्तकाचे प्रकाशन केले.