HinduismNewsकोकण प्रान्त

कोंकण दिग्विजय – मराठा आरमाराची मुहूर्तमेढ

भारताला नाविक परंपरेचा एक प्रदीर्घ कालावधीचा इतिहास लाभलेला आहे.भारताच्या प्राचीन नाविक इतिहासाचा संदर्भ वेगवेगळ्या ग्रंथपुराणातून पाहायला मिळतो. वृक्ष आयुर्वेदात जहाज बांधणीसाठी उपयुक्त अशा विविध प्रकारच्या लाकडांचा उल्लेख केलेला आहे. माळव्याच्या भोज नरपती यांनी युक्ती कल्पतरू या ग्रंथात विविध प्रकारची जहाजे त्यांची सजावट, रंगरंगोटी, नाळेवरील कोरीव काम, आकार इत्यादी संबंधीची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जवळील प्रसिद्ध वेरूळच्या लेण्यांमध्ये जहाजांची चित्र आढळतात. पुरातन नाणी, वीरगळ यावर देखील जहाजांवरील युद्ध प्रसंग कोरलेले पाहायला मिळतात.

सातवाहन, चालुक्य, शिलाहार, कदंभ या राजवटींच्या आरमार इतिहासाचा कालखंड फार मोठा आहे. पंधराव्या शतकात कालिका चा राजा समृद्धी याने पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्यासाठी कुंजली मराक्कर याच्या अधिपत्याखाली एक आरमार उभारले होते. व्यापारी मार्गाने भारताकडे येणारा समुद्री मार्ग अनेक विदेशी खलाशांसाठी खुला झाला होता. समृद्ध असलेल्या भारत खंडावर या मार्गाने मुसलमानी सत्ताधीश, युरोपियन आणि इंग्रज यांचे आवागमन सुरू झाले. महाराष्ट्र पारतंत्र्यात लोटला गेला आणि महाराष्ट्राच्या या समुद्री सीमा असुरक्षित झाल्या.

सुमारे साडेतीनशेहुन अधिक काळ महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुसलमानी सत्ताधीश त्याचे लचके तोडत होते. इथोपिया, अबॅसिनिया येथून आलेले हबशी यांच्या अन्यायाखाली प्रजा होरपळून निघाली होती. गोव्याच्या पोर्तुगीजांनी तेथील प्रजेच्या धर्मांतरासाठी नानाविध अत्याचार सुरू केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अन्यायविरुद्ध तलवार उपसली आणि कोकण किनारपट्टी ताब्यात घेऊन इथे स्वतःचा अंमल बसवला. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणून संबोधले गेले आहे. आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे असा उल्लेख आज्ञापत्रात केलेला पाहायला मिळतो.

इ.स १६५७ मध्ये शिवरायांनी कोंकणच्या मोहिमेला सुरुवात केली. शिवरायांच्या जीवन चरित्राचे अस्सल साधन म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ म्हणजे ‘शिवभारतम’ व संकर्षण सकळकळे लिखित ‘शिवकाव्य’. ‘शिवकाव्य’ या ग्रंथात कोंकण मोहिमेचा उल्लेख आला असून हि मोहीम तैलबैल या घाटातून सुरु झाली असा उल्लेख आढळतो. या ग्रंथात कोंकण मिहीमेचा विस्तृत वृतांत देण्यात आलेला आहे. शिवकाव्या मधील श्लोक ४३ मध्ये..

इति सकलकलाकलापराजच्छिवतनयम्य कृतौ शिवस्य काव्ये ।
बुधजनसुखदे परं समाप्तः सुविहितकौंकणदिग्जयोऽपि सर्गः ।। ४३ ।।

या सर्गातील उल्लेखा प्रमाणे कोंकणच्या मोहिमेला ‘कोंकण दिग्विजय’ असे म्हटले गेले आहे. शिवरायांचे सैन्य तैलघट्ट या घाटातून कोकण किनारपट्टीवरील चौल भागात उतरले. शिवाजी महाराजांनी चौल येथील परकीय सागरी सत्तांपासून विस्तीर्ण कोंकण किनारपट्टीच्या असुरक्षिततेचे निरीक्षण केले. या प्रदेशाला जंजिऱ्याचे सिद्दी आणि पोर्तुगीज यांसारख्या बाह्य शक्तींच्या सततच्या आक्रमणांचा आणि वर्चस्वाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी या प्रदेशाचे रक्षण करणे आणि तो सुरक्षित करणे आवश्यक मानले. जेव्हा शिवाजी महाराज किनारपट्टीच्या उत्तरेकडील भागाकडे आणखी पुढे सरकले, तेव्हा त्यांना स्थानिक हिंदू लोकसंख्येचे, प्रामुख्याने कोळी, भंडारी, गाबीत आणि भोई यांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेले शोषण पाहायला मिळाले. त्यांचे या प्रदेशात आगमन झाल्यावर, दीर्घकाळापासून जाचक राजवटीखाली भरडल्या गेलेल्या स्थानिक हिंदूंनी पुढे येऊन त्यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली.

चौल पासून ठाण्यामधील पारसिक किल्ल्या पर्यंत शिवरायांच्या सैन्येने कूच केला. ठाणे आणि कल्याण-भिवंडी शहरांजवळील पारसिक किल्ला सुरक्षित खाड्यांच्या काठावर वसलेला होता, ज्यामुळे पोर्तुगीजांच्या बलाढ्य नौदलाच्या थेट हल्ल्यापासून तो सुरक्षित राहिला. म्हणूनच, कल्याण-भिवंडी जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या घोडदळ आणि पायदळासह या खाडीच्या मार्गाने वेगाने उत्तरेकडे कूच केले. कल्याण भिवंडी ताब्यात घेऊन तिथे आरमाराची निर्मिती सुरु केले. तो दिवस होता आश्विन वद्य द्वादशी म्हणजेच वसुबारस..

स्वराज्याच्या सीमा संरक्षित करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ह्या आरमाराची निर्मिती केली. पंधराव्या शतकापासून ते अगदी सतराव्या शतकापर्यंत बलाढ्य अशा युरोपियन सत्ताधीशांचे आरमार भारतीय किनारपट्टीवर येत जात होते. कोकण किनारपट्टीतील प्रमुख बंदर ही महसुलाच्या दृष्टीने देखील फार महत्त्वाची होती, यासाठी कोकण किनारपट्टी राखण्यासाठी आरमाराची गरज होती. कोकण किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी मध्यम आकाराची जहाजे म्हणजे गलबते व गुराब याचे निर्मिती कार्य कल्याण, भिवंडी, पेण व पनवेल येथे सुरू करण्यात आले.

महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेचा अभ्यास करून काही जहाजे शिडा बरोबरच वल्हवल्याने चालणाऱ्या नौकाही तयार करवून घेतल्या. महाराजांनी आरमाराचे बांधकाम हे त्यामध्ये पारंगत असणाऱ्या पोर्तुगीज कारागीर यांच्याकडे सोपवले होते. रुय लैतांव व्हियेगास, फेर्णाव व्हियेगास हे पोर्तुगीज पिता पुत्र त्यांच्यासोबत ३४० कामगार मराठ्यांच्या अरमार निर्मितीचे काम करत होते. गुराबा, तरांडी, गलबते, तारवे, पगार शिबाडे, मचवे, तीरकाटी, कमान इत्यादी प्रमुख प्रकारची जहाजे शिवरायांच्या या मराठा आरमारात होती.

रामचंद्र पंत अमात्य यांनी आरमारा विषयी सांगताना असे म्हटले आहे की “ज्याच्या जवळ अश्व बळ त्याची पृथ्वी प्रजा आहे व ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र”. हे सूत्र मांडताना ते पुढे म्हणतात “आरमार अवश्यमय करावे चालीच्या गुराबा बहुत थोर ना बहुत लहान अशा मध्यम रीतीने सजवाव्या, शिडाची गलबते वाऱ्या शिवाय कुचकामी ठरतात यासाठी त्यावर वल्हवण्याची देखील सोय असावी”. आरमारावर मर्दानी मारक माणसं ठेवून त्यावर भांडी म्हणजे तोफा, बंदुका, दारूगोळे, होके इत्यादी शस्त्रांनी युक्त करून युद्धासाठी तैनात ठेवावे. मराठ्यांचे आरमार सुमारे ७० टना पासून ते ३०० टनापर्यंतचे होते प्रत्येक जहाजावरती १२ पौंड वजनाच्या दोन तोफा असत, काही जहाजांवर तोफांची संख्या १० ते १६ पर्यंत असे. या जहाजांमधून ६० ते १५० लोक वाहून नेले जात असत.

आरमाराचे प्रशासन व त्याचे नियोजन करताना त्याचे वेगवेगळे सुभे करावेत, प्रत्येक सुब्यात ५ गुराबा व १५ गलबते असावी. एका सर सुभेदाराची नेमणूक करून त्याच्या अज्ञात सर्वांनी राहावे. अधिकारी वर्गाची तनखा, आरमाराचा खर्च त्या त्या मुलखातून आलेल्या पैशातून द्यावा. बंदरात येणारे साहुकार यांना उपद्रव होऊ नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिलेली आहे. साहुकार बुडाले तर बंदरे ओस पडतील. कोकण किनारपट्टीवरील बहुतांश बंदरे महाराजांच्या ताब्यात होती समुद्रकिनाऱ्यावरती आपली सत्ता प्रस्थापित करून कोकणवासीयांना पोर्तुगीज, हबशी, इंग्रज यांच्यापासून त्यांना संरक्षण दिले होते.

स्वराज्याच्या सुरक्षितेचे बरोबर स्वराज्यासाठी लागणारा महसूल देखील तितकाच महत्त्वाचा होता. समुद्र मार्गाने येणारे व्यापारी स्वराज्याच्या महसूलात भर घालणार होते. स्वराज्याचे महसूल व्यवस्थापन हे बंदरावर येणाऱ्या साहुकार यांच्यावर अवलंबून होते. जकात स्वरूपात आलेला महसूल हा स्वराज्याला बळकटी देत होता. साहुकारांना संरक्षण देण्यासाठी मराठ्यांचे आरमार सदैव सज्ज होते.

आरमारावर लागणारे सामान वेळच्या वेळी पोहोचते करावे या योगे आरमार सुसज्ज ठेवावे. किनारपट्टीवर गस्त घालून गनीम राखण्याची सूचना अमात्यांनी दिली आहे. जंजिरेकर सिद्धी यापासून बंदरे सुरक्षित ठेवावी. बंदरा बंदरावर साहुकारांच्या जहाजांची येजा असू द्यावी त्यांना वेळोवेळी मदत करून लाकडे, पाणी व लागेल तो जिन्नस विकत द्यावा. गनिमाच्या जहाजांना पकडून ते बंदरास आणून सर्व माल जप्त करावा. गानिमाशी सर्वांनी मिळून लढावे आणि आपणास राखून गनीम घ्यावा म्हणजे स्वतःचे संरक्षण प्रथम करावे व नंतर शत्रूला जेर करावे असे शिवरायांच्या आज्ञापत्रात नमूद केले आहे.

आरमाराच्या देखभाली संबंधीच्या सूचना देताना अमात्य सांगतात. पर्जन्यकाळी समुद्रात वादळी वाऱ्यासह लाटा देखील उसळतात यामुळे जहाजे खराब होण्याची शक्यता असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आरमाराची छावणी करावी लागत असे. आरमार सुरक्षित ठेवण्यासाठी नारळ व इतर झाडांचे झाप लावून पावसाचे पाणी जहाजात येणार नाही याची खबरदारी घेतली जात असे. आरमार एका सुरक्षित स्थळी छावणी करून ठेवले जाई. एकाच बंदरामध्ये छावणी करू नये अशा सूचना देखील दिल्या गेल्या होत्या. मुख्यत्वे आरमाराची छावणी किल्ल्यांच्या बंदरामध्येच केली जाई. छावणी करताना गनीम दगा करून त्यास आगी लावणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्यावी. रात्रीस गस्त घालून त्याची जपणूक करावी. सुभेदारांनी आपला कबिला देखील दोन महिने त्याच जागी ठेवावा.

आरमारास लागणारे तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या व इतर अवजार यांच्या साठी लागणारे लाकूड सामान (सागवान लाकूड) हे राज्यातील आरण्यातून सरकारच्या परवानगीने तोडून घ्यावे. स्वराज्यातील आंबे फणसाची लाकडे आरमारास उपयुक्त असली तरी त्यास हात लावू नये. ही झाडे रयतेने लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढवलेली आहेत. ही झाडे जर तोडली तर त्यांच्या दुःखास पारावर राहणार नाही. असे दुःख देऊन कार्य कशास करावे आणि असे केल्यास प्रजापीडनाचा दोष पडतो. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक धोरण व प्रजाहीत दक्षता आपल्याला पाहायला मिळते. वृक्षतोड होऊ देता परदेशातून लाकूड फाटा आणून आरमारास लागणाऱ्या साहित्य बनवण्याचा सूचना शिवरायांनी केल्या आहेत. हे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तर त्याच्या धन्यास योग्य द्रव्य (मोबदला) त्यास संतोष करून तोडून घ्यावे जबरदस्ती कदापि करू नये.

स्वराज्याच्या असुरक्षित सीमा सुरक्षित करण्याचं महत्त्वपूर्ण काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात स्वतःचे आरमार निर्माण करून केलं. शिवाजी महाराजांच्या आरमाराला हिणवण्याचे काम ज्या इंग्रजांनी केले तेच इंग्रज १६७९ च्या खांदेरी युद्धात पराभूत झाले व त्यांना तहास सामोरे गेले. मराठ्यांच्या आरमारा बद्दलचे वर्णन करताना इंग्रज म्हणतात “ऑल दोज स्मॉल क्रिपिंग बोट्स डिसीव अस विथ ग्रेट ऍडमिरेशन” म्हणजे “मराठ्यांच्या या छोट्या सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीत्या चकवतात”.

१६५७ ची चौल ते कल्याण-भिवंडी दरम्यानची कोकण मोहीम हा केवळ एक प्रादेशिक हल्ला नव्हता, तर ती भू-राजकीय दूरदृष्टीचा एक उत्कृष्ट नमुना होता. सागरी आणि खंडीय साम्राज्यांविरुद्ध केवळ जमिनीवरील लष्करी शक्तीच्या जोरावर स्वतंत्र राज्य टिकवून ठेवता येणार नाही हे ओळखून, शिवाजी महाराजांनी पद्धतशीरपणे कोंकण किनारपट्टीवर आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. या मोहिमेने किनारपट्टीवरील परकीय सत्तांची मक्तेदारी मोडीत काढली. गोवा व वसई येथील पोर्तुगीजांना त्यांची गर्विष्ठ उदासीनता सोडून बचावात्मक व चिंताग्रस्त मुत्सद्देगिरीचा अवलंब करण्यास भाग पाडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले ‘मराठा आरमार’ केवळ लष्करी दृष्ट्या नाही, तर राजकीय आणि आर्थिक दृष्ट्याही मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल ठरले.

लेखक :- पंकज विद्याधर भोसले

Back to top button