“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म”म्हणणारे संत तुकाराम महाराज..
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अमोघ अश्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेदभ्रम अमंगळ॥” १७ व्या शतकात तुकोबांनी दिलेला हा संदेश केवळ धार्मिक चौकटीपुरता मर्यादित नसून तो सकल समाजाला एकत्र,एकसंध राहून उन्नतीचा मार्ग दाखवणारा आहे.संपूर्ण सृष्टीच जर त्या विधात्याची निर्मिती आहे तर माणसामाणसांमध्ये जात, भाषा , पंथ, लिंग किंवा आर्थिक स्तरावर भेद करणे हे अत्यंत अमंगल, अपवित्र आहे, हा परखड विचार त्यांनी समाजासमोर मांडला.आजच्या अशांत जगात तुकोबांनी दिलेल्या संदेशाची प्रासंगिकता अधिकच वाढली आहे.
तुकोबा पुढे म्हणतात, “तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुख दुःख जीव भोग पावे॥” मानवी समाजाला एका शरीराची उपमा देऊन त्यांनी वैश्विक बंधुभावाचे अप्रतिम उदाहरण दिले आहे. शरीराच्या एका जरी अवयवाला दुखापत झाली तरी त्याची वेदना संपूर्ण शरीराला होते. त्याचप्रमाणे समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय झाला, कोणीही दुःखी किंवा वंचित राहिला, तर त्याचा त्रास संपूर्ण समाजमनाला झाला पाहिजे. ‘कोणाही जिवाचा न घडावा मत्सर’ हीच खरी ईश्वरभक्ती आहे, असे सांगत त्यांनी द्वेष आणि मत्सराला छेद दिला.
आज आपण २१ व्या शतकात जगत असताना, विज्ञानाने प्रगती केली असली तरी मानवी मने संकुचित होत चालली आहेत. जात-पातीचे राजकारण, भाषिक विखार, प्रांतिक वाद यांमुळे समाज पोखरला जात असताना तुकोबांचा ‘विष्णुमय जग’ हा विचार आपल्याला संकुचिततेच्या पलीकडे जाऊन ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हेच आपले कुटुंब मानण्याची दृष्टी प्रदान करतो.आज गरज आहे ती संतांच्या या समतेच्या आणि समरसतेच्या विचारांना आपल्या दैनंदिन वर्तनात आणण्याची…
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
