Opinion

जगज्जेती निखत झरीन

निखत अत्यंत आक्रमक खेळाडू आहे, पण तिचा बचावही तितकाच मजबूत आहे. महिलांच्या बॉक्सिंग विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यामुळे ती अशी कामगिरी करणारी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आर. एल., लेखा के. सी. ह्या खेळाडूंनंतरची पाचवी भारतीय ठरली आहे. देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता तिचं लक्ष असेल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं.

2011 मध्ये ती कनिष्ठ गटात विश्वविजेती ठरली होती, आणि 2021 मध्ये तिने वरिष्ठ गटात हा बहुमान मिळवला. कसा होता हा 10 वर्षांचा प्रवास? किंवा त्याहून मागे जायचं म्हटलं तर, बॉक्सिंग खेळण्याची इच्छा होणं आणि त्यानंतर हा निर्णय पालक आणि उर्वरित समाजाकडून स्वीकारला जाणं सोपं गेलं असेल का? आंध्रप्रदेशच्या निझामाबादमध्ये जन्मलेली निखत झरीन आठवीत असताना वडिलांबरोबर फिरायला बाहेर पडली, जवळच्या एका मैदानात वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या.
 
 
जवळजवळ सर्वच खेळांमध्ये मुलींचा सहभाग होता, अपवाद होता बॉक्सिंगचा. तिने वडिलांना ह्याचं कारण विचारलं. ते म्हणाले, “तितकी ताकद नाही इथल्या कुठल्याही मुलीमध्ये” आणि निखतने ठरवलं ती बॉक्सिंगच शिकणार. तिचे चुलत भाऊही हाच खेळ खेळायचे. खेळाची आवड असलेल्या वडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला, आईचा सुरुवातीला विरोध होता कारण बॉक्सिंग म्हटलं की दुखापती, जखमेच्या खुणा ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच येणार. त्यामुळे भविष्याच्या चिंतेने आईने तिला ह्या खेळापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण निखत तिच्या निर्णयावर ठाम होती. हळूहळू आईचाही विरोध मावळला. इतर नातेवाईक आणि समाजाचा विरोध मात्र कायम होता. खेळाची गरज म्हणून घालावे लागणारे आखूड कपडे हा टीकेचा मुख्य विषय.
 
बॉक्सिंग हा पुरुषांचा खेळ आहे, मुली जर हा खेळ खेळायला लागल्या तर त्यांच्याशी लग्न कोण करणार? एक ना अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या, पण वडिलांनी निखतला सांगितलं, “तू फक्त खेळावर लक्ष दे”.अनेक प्रकारचे टोमणे ऐकावे लागले, पण बाप-लेकीची जोडी मागे हटली नाही. तिच्या गावात त्यावेळी मुलांच्या बरोबरीने बॉक्सिंग ग्लोव्हज घालणारी ती एकटीच मुलगी होती. पुढे लवकरच विशाखापट्टणमच्या SAI केंद्रात तिचा सराव सुरु झाला. कनिष्ठ गटात तिने चांगली कामगिरी केली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली. 2016 मध्ये निखत कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात खेळायला लागली. त्याच वर्षी तिने राष्ट्रीय विजेतेपद मिळवलं. मात्र राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय हा प्रवास तितका सुकर होणार नव्हता. तिच्यासमोर मोठं आव्हान होतं मेरी कोमचं. मेरी चांगल्या फॉर्ममध्ये होती त्यामुळे मोठ्या स्पर्धांसाठी इतर कुठल्या खेळाडूचा विचार होणंच अशक्य झालं होतं. 2017 मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे निखत खेळापासून दूर गेली. पण जिद्दीने तिने 2018 मध्ये पुनरागमन केलं
 

2019 मध्ये निखत झरीन चर्चेत आली. बॉक्सिंग फेडरेशनने ऑलिम्पिक ट्रायल्ससाठी मेरी कोमची थेट निवड केली आणि ह्या निर्णयाला निखतने आव्हान दिलं. त्याआधी जागतिक स्पर्धेसाठीही मेरीची निवड झाली होती आणि त्यामुळे आपल्याला संधीच मिळत नाहीये ही भावना निखतच्या मनात निर्माण झाली होती. जागतिक स्पर्धेत मेरीने कांस्य पदक मिळवलं. फेडरेशनने जाहीर केल्याप्रमाणे केवळ सुवर्ण आणि रौप्य पदकप्राप्त खेळाडू ऑलिम्पिक ट्रायल्ससाठी थेट पात्र ठरु शकणार होते, मेरीला कांस्य मिळालं होतं आणि त्यामुळे निखतने मेरीबरोबर तिचा सामना खेळवला जावा आणि योग्य प्रकारे निवड व्हावी ही मागणी केली. बॉक्सिंग फेडरेशन पासून ते क्रीडा मंत्र्यांपर्यंत सर्वांना पत्र पाठवून तिने आपली मागणी पोहोचवली. शेवटी दोघींमध्ये सामना होणार हे ठरवण्यात आलं. मेरी ह्या निर्णयाने नाखूष होती. सामना अगदी एकतर्फी झाला आणि मेरीने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. मेरीची नाराजी सामना जिंकल्यावरही टिकून होती. तिने विजयानंतर हस्तांदोलनही न करता निखतकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
  
 
निखतने एकप्रकारे मेरीचा रोष ओढवून घेतला होता, पण ती तिच्या हक्कासाठी लढली ह्यात काही चूक होतं असं वाटत नाही. निखत त्या पराभवाने खचणारी मुलगी नव्हती. ती खेळत राहिली. युरोपातील अत्यंत जुन्या आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या Strandja tournament मध्ये 2019 ह्याच वर्षी तिने सुवर्णपदक जिंकलं, ह्याच स्पर्धेत 2022 मध्येही ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य, थायलंड ओपनमध्ये कांस्य पदक ही तिची 2019 ह्याच वर्षातली कामगिरी. गेल्या वर्षी मार्चमध्ये तिने 2 माजी विश्वविजेत्यांना हरवून Bosphorus बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं.

2022 हे वर्ष तिच्या कारकिर्दीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं वर्ष ठरलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इस्तंबूल, तुर्की येथे नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या बॉक्सिंग विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत तिने थायलंडच्या खेळाडूवर मात केली.
 
 
पहिल्या फेरीत 5-0 अशी बाजी मारल्यावर दुसऱ्या फेरीत मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूने थोडा प्रतिकार केला, आणि 3-2 आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत पाचही पंचांनी निखतच्या बाजूने मत दिलं आणि एकूण गुणांमध्ये 30-27, 29-28, 29-28, 30-27, 29-28 अशा फरकाने ती जिंकली.. जिंकल्यावर तिच्या डोळ्यात तरळलेले अश्रू पुरेसे बोलके होते.

निखत अत्यंत आक्रमक खेळाडू आहे, पण तिचा बचावही तितकाच मजबूत आहे. ह्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यामुळे ती अशी कामगिरी करणारी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आर. एल., लेखा के. सी. ह्या खेळाडूंनंतरची पाचवी भारतीय ठरली आहे. देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता तिचं लक्ष असेल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं.
 
 
52 किलो वजनी गटात मेरीचा वारसा पुढे नेण्याची ताकद नक्कीच तिच्यात आहे, मेरीशी वाद झाला असला, तरी ती निखतची आदर्शही आहे. 6 वेळचं जगज्जेतेपद, ऑलिम्पिक पदक आणि वयाला स्वतःच्या तंदुरुस्तीने हरवणं ह्यामुळे मेरी सर्वांसाठीच आदर्श आहे. निखत झरीन 26 वर्षांची आहे त्यामुळे तंदुरुस्ती राखल्यास ती नक्कीच पुढे जाईल..
 
निखतला तिच्या भावी यशस्वी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा.

Back to top button