महर्षी वाल्मिकी, ज्यांनी अजरामर आणि हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या रामायणाची रचना केली. त्यांची आज जयंती.
महर्षी वाल्मिकी(maharishi valmiki jayanti), ज्यांना वाल्मिकी ऋषी, भगवान वाल्मिकी असेही म्हटले जाते…. यांचा जन्म आजच्या उत्तरप्रदेश मधील तुलसीपुर या गावी झाला अशी मान्यता आहे. मात्र त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठे सापडत नाही. मात्र ते प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात असल्याचे मानले जाते… (त्रेता युग हे हिंदू मान्यतेनुसार चार युगांपैकी एक… काही हजार वर्षांपूर्वी झाले अशी मान्यता आहे). त्यांचा जन्म आणि निर्वाण या संबंधी कुठेही माहिती नाही, मात्र त्यांची जन्मतिथी – अश्विन पौर्णिमा – ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात – त्यादिवशी विशेषतः उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात सणासारखी साजरी केली जाते.
महर्षी वाल्मिकी यांना आद्य कवी असेही म्हटले जाते. ते संस्कृत मधील आणि जगातील पहिल्या श्लोकाचे रचयिता मानले जातात. या संबंधी एक आख्यायिका अशी आहे की एकदा ऋषीवर नदीवर स्नानाला गेले असताना तेथे एक क्रौंच पक्षांची जोडी शृंगारात मग्न होती आणि एका शिकाऱ्याने बाण मारून त्यातील नर पक्षाला मारले. त्या आघाताने मादी पक्षी आक्रोश करू लागली. ते न सहन झाल्याने वाल्मिकी ऋषींनी त्या शिकऱ्यास शाप दिला…. तो नकळतपणे संस्कृत मध्ये छंदबद्ध स्वरूपात व्यक्त केला…. आणि सृष्टीतील पहिल्या छंदबद्ध काव्याची – श्लोकाची – निर्मिती झाली!! काव्य परंपरा इथपासून सुरू झाली असे मानले जाते!! भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे महान लेखक म्हणून भगवान वाल्मिकी यांची मान्यता आहे….
महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केली ज्यात ७ कांड आणि २४००० श्लोक आहेत…. अनुष्टुभ छंद या शास्त्रीय संस्कृत छंदात रामायणाची रचना केली गेली आहे. अस म्हणतात की ही रचना राम जन्माच्याही आधीची आहे…. त्यानंतर जे रामायण घडले ते याबरहुकूमच घडले!! रामायण हे काव्यात्मक सुंदरता आणि साहित्यिक समृद्धता यासाठी प्रसिद्ध आहेच पण यामध्ये तत्वज्ञान आणि नैतिकता यांचे यथार्थ दर्शनही आहे. वाल्मिकी रामायणाचा भारतीय मानसावर मोठा प्रभाव आहे. परंपरा, नैतिकता यांचा आदर्श हजारो वर्षे प्रस्थापित करणारा…. भारतीय मानसिकतेचा, संस्कृती आणि नितीमूल्यांचा आणि धार्मिक मान्यतांचा आधारभूत असा हा ग्रंथ. प्रभुराम यांचे जीवन, वनवास, सितामैय्याचे अपहरण, रावणाचे अधार्मिक वर्तन, हनुमानाचा पराक्रम, रावणाशी म्हणजेच आधार्मिकतेशी युद्ध, धर्माचा विजय, वनवासी मंडळींचे संघटन इत्यादींचे वर्णन या महाकाव्यात आहे. एका अर्थाने भारतीय समाजाच्या आदर्शांचे यथार्थ दर्शन या महाकाव्यातून घडते.
भारतीय कला, नृत्य, नाटक, राजकारण, समाजकारण अशा सर्वच बाबींवर अजूनही ज्याचा प्रभाव आहे असा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ आहे. केवळ भारतातच नाही तर सर्व आशियाई देशात आजही रामायणाचा प्रभाव जाणवतो. थायलंड सारख्या देशात तर अयोध्या तिथलीच अशी आजही मान्यता आहे, रामायणाचे प्रयोग आजही होतात. जगभरातील अनेक भाषांमध्ये याचा अनुवादही झाला आहे.
महर्षी वाल्मिकी यांनी रामायणात राम जन्माच्या वेळच्या आणि अन्य घडलेल्या घटनांच्या वेळच्या ग्राहताऱ्यांच्या स्थिती बद्दल माहिती दिली आहे. आजच्या संशोधनानुसार ती एकदम अचूक अशी आहे असे म्हणतात. त्याकाळी ग्राहतारे माहिती असणे आणि त्यांची हालचाल, त्यांच्या भ्रमण कक्षा, त्यांच्या स्थितीनुसार काळ आणि ऋतु इत्यादी यांची माहिती असणे म्हणजे एक अप्रुपच. म्हणूनच महर्षी वाल्मिकी यांना प्रथम खगोलशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जाते…. अर्थात पाश्चात्य मंडळी हे मानत नाहीतच!! मध्यंतरी निलेश गोरे नावाच्या एका अभ्यासकाचे काही व्हिडिओ पाहिले. त्यात रामायणातील सितामातेच्या शोधाचे वर्णन आहे. सुग्रीवाने मातेच्या शोधासाठी सर्व पृथ्वीवर आपली माणसं (वानर) पाठविले आणि त्यांना कुठल्या भागात गेलात तर काय असेल, काय काळजी घ्या, तिथे कसे हवामान आहे, कशी माणसे राहतात, निसर्ग कसा आहे वगैरे चे वर्णन सांगितले आहे. या वर्णनाबरहुकूम आजच्या जगातील कोणत्या खंडातील कोणता भाग आणि त्याचे तंतोतंत वर्णन याचे विवेचन श्री गोरे यांनी केले आहे…. आणि हे सर्व हजारो वर्षांपूर्वी महर्षींनी लिहिलेल्या रामायणातील वर्णन आहे. आपल्या पुर्वजांना समस्त पृथ्वीची खडानखडा माहिती त्याकाळीही होती याचा आणखीन पुरावा काय हवा?? यावर अधिक संशोधनाची गरज आहे!!
भगवान वाल्मिकी यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे. योगवशिष्ठ…. भारतीय तत्वज्ञान आणि मुक्ती चा मार्ग दाखविणाऱ्या या महत्त्वाच्या ग्रंथाची निर्मिती सुद्धा महर्षी वाल्मिकी यांचीच आहे…. अनेक रचना आणि महान कार्य करणारा हा महान ऋषी…. त्याला शत शत नमन….
महर्षी वाल्मिकी हे केवळ कवी, दार्शनिक होते असे नाही. त्यांना अस्त्र शास्त्रांचे उत्तम ज्ञान होते. माता सीता यांच्याच आश्रमात राहिली होती. त्यावेळी लव-कुश यांचा जन्मही त्यांच्याच आश्रमातला. या लव-कुश यांना संस्कारित करणे, वेद विद्येत पारंगत करणे, गायन आणि विज्ञानात पारंगत करणे आणि याच बरोबर अस्त्र-शस्त्र युक्त अजिंक्य योद्धा बनविण्याचे कार्यही भगवान वाल्मिकी यांनी केले आहे.
मंडळी, या वाल्मिकी ऋषींचे कुळ लावणारा समाज ही तसाच गौरवशाली कामगिरी करणारा आणि पराक्रमीच असेल….नाही का? खरंय…. संपूर्ण भारतात या ऋषींचे कुळ गौरवाने सांगणारा मोठा समाज आजही आहे. महर्षी वाल्मिकी यांना भगवान/ देव मानणारा समाज… अनेक ठिकाणी भगवान महर्षी वाल्मिकी यांची मंदिरं सुद्धा भारतभर आहेत…. निरनिराळ्या भागात निरनिराळ्या नावाने ओळखला जाणारा हा समाज…. वाल्मिकी, नायक, बोया, मेहतर इत्यादी नावांनी…. पंजाब मध्ये सुद्धा आज शीख पंथाची दीक्षा घेतलेली मजहबी मंडळी ही वाल्मिकी असल्याचे म्हणतात….
हा एक लढवैय्या समाज म्हणून प्रसिद्ध होता. समाज रक्षणाचे ब्रीद घेतलेला पराक्रमी समाज. हिंदू सनातन धर्माचा अभिमान बाळगणारा हा समाज…. दुर्दैवाने आज या समाजाची परिस्थिती काय आहे??? एके काळी अत्यंत प्रगत, पराक्रमी आणि सुससंस्कृत असलेला हा समाज आज काय अवस्थेत आहे????….. इंग्रजांनी या समाजाला अपमानित केलं आणि साफसफाई वगैरे कामे जबरदस्तीने त्यांच्या माथी मारली…. काही शतके या समाजाला हिंदुत्व प्रवाहापासून तोडण्याचा प्रयत्न केला, या समाजाला अस्पृश्य ठरविले…. दुर्दैव हे की त्यावेळी हिंदू समाज या मंडळींच्या मागे समर्थपणे उभा राहिला नाही….. आणि त्याची परिणीती म्हणजे एकेकाळी प्रगतिशील आणि पराक्रमी असलेला हा समाज आज अत्यंत हलाखीच्या अवस्थेत जगतोय!!!!
आपल्या पूर्वजांचे कुठे आणि काय चुकले…. नक्की काय झाले वगैरे खोलात न शिरता आज आपण हिंदू म्हणून काय विचार आणि कृती करायला हवी याचा विचार करणे गरजेचे आहे. आज या समाजाला धर्मांतरासाठी लक्ष केले जात आहे. शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य, जगण्यासाठीच्या किमान सुविधांचा अभाव, स्वाभाविक पणे तरुण पिढीवरील संस्करांचा अभाव, व्यसनाधीनता आणि या सर्वांचा परिणाम म्हणून मूळ प्रवाहापासून दूर लोटले जाण्याचा धोका…… मंडळी, अजूनही ही बहुतांश मंडळी ही भगवान महर्षी वाल्मिकी यांनाच मानून हिंदू धर्माशी नाळ टिकवून आहेत…. परंतु यांना फसवून, भुलवून अन्य धर्मीय त्यांच्या परिस्थितीचा फायदा उठवू पाहत असतील तर दोष कुणाचा????….. त्यांचा कमी आणि माझा आणि तुमचा जास्त!!!….. एकच आवाहन करतो…. कधीतरी या मंडळींच्या वस्तीत फेरफटका मारून या, भगवान वाल्मिकी मंदिरात जा आणि प्रेमाने तिथल्या या आपल्या मंडळींशी संवाद साधा…. काय अनुभव येतो ते पहा!!!…. आणखीन काहीच बोलावे किंवा सांगावे लागणार नाही…..
आज या मंडळींमध्ये चांगले नेतृत्व उभे रहात आहे ही एक चांगली बाब आहे. आपला समाज कोण होता, काय होता याचीही जाणीव होत आहे. आपल्या समाजाला शिक्षण, संस्कार, आरोग्य आणि व्यवसायाचे मार्गदर्शन इत्यादी कसे मिळेल याचा ध्यास घेतलेले तरुण आज या समाजात उभे रहात आहेत….. आज गरज आहे ती गौरवशाली परंपरा असलेल्या आणि महर्षींचे कुळ अभिमानाने मिरवणाऱ्या या समाजाला प्रेमाने आधार देण्याची…. उपकार म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून…. याची गरज आहे….
मंडळी, महर्षी वाल्मिकी जयंती दरवर्षी येते…. पण या वाल्मिकी ऋषींच्या वारसांचे काय झाले याचा विचार आपण कधीच केला नसेल….. या समाजाला आपल्या मूळ प्रवाहात सामावून घ्यायची जबाबदारी आपलीच आहे!!!…. पटतंय का मंडळी?
असेच हिंदुत्वाची नाळ सांगणारे अनेक समूह/ समाज आज दैन्यावस्थेत आहेत…. त्यांचीही जबाबदारी आपल्याला घ्यायलाच हवी… खरंय ना?….
महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त त्या महान ऋषींना आणि त्यांचे कुळ आजही अभिमानाने मिरवणाऱ्या बंधूंना सादर प्रणाम !
सीताकांत स्मरण जय जय श्रीराम..
लेखक :- अरविंद श्रीधर जोशी