ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शिवराज्याभिषेकाचा दिवस. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला आणि हिंदू समाजाच्या दृष्टीने देखील त्या काळातील परिस्थितीत हा परमोच्च बिंदू होता. शिवाजी महाराज राजे झाले. तीनशे वर्षांची काळरात्र संपली. हिंदूंना आपला स्वतःचा एक छत्रपती राजा प्राप्त झाला. २७ जून २०२६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लेख .
“अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती हम सबकी……” हे शब्द आहेत मूळचे कानपूर वासी कवी भूषण यांचे. ज्या वेळेला कवी भूषण यांनी या ओळी लिहिल्या त्यावेळी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याचा भौगोलिक विस्तार महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित होता. तरी देखील शिवाजी महाराज छत्रपती झाल्यामुळे भारतातला हिंदू सुरक्षित झाला. चौदाव्या शतकामध्ये देवगिरीचा राजा रामदेव याचा पाडाव झाल्यानंतर महाराष्ट्रात जणू काही काळरात्रच अवतरली. दख्खनच्या जनतेवर अनन्वित अत्याचार सुरू झाले. अशा स्थितीमध्ये शिवरायांचा जन्म झाला. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी शून्यातून हिंदवी साम्राज्य निर्माण केले. त्याचाच परिणाम म्हणून देशभरातल्या हिंदूंच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे एक विद्वान व्याख्याते होते. त्यांनी असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांनी झोपलेल्यांना जागं केलं, जागं झालेल्यांना उभ केलं, उभं राहिलेल्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं भगवं निशाण दिलं. शिवाजी महाराजांचं एका वाक्यात केलेलं हे अत्यंत समर्पक वर्णन आहे.
थोरांच्या थोरपणाची लक्षणं.
थोर व्यक्तिमत्वांच्या थोरपणाची लक्षणं फार कमी वयात प्रकट होतात. शिवाजी महाराजांनी अवघ्या सतराव्या वर्षी रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. “हे राज्य व्हावे ऐसी तो श्रींची इच्छा आहे” असं ते म्हणाले. त्यांना स्वतः राजे व्हायचं म्हणून ते राज्य स्थापन करणार नव्हते. श्रींची पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध झालो आहे या भावनेने त्यांनी ही प्रतिज्ञा केली होती. स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करू शकणारे जोडीदार त्यांनी आपल्या सोबत उभे केले. यातच त्यांचं मोठेपण आहे. थोर व्यक्ती एकट्याने मोठ्या होत नाहीत. ते आपल्या सोबत अनेकांना मोठं करतात. शिवाजी महाराजांनी तेच केलं. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी, येसाजी, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, शिवा काशिद अशा अनेकांना त्यांनी मोठं केलं.
अफजलखान वध.
अफजलखानाच्या वधा विषयी देखील थोडा वेगळा विचार केला पाहिजे असं वाटतं. आपल्याला हे सांगण्यात येतं की अफजलखानाने विश्वासघात करून शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. पण खरंच तसं झालं असेल का? शिवाजी महाराजांनी आधी आपण अफजलखानाला घाबरलो असल्याचं बनाव उभा केला. अफजल खान महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होता, देवळं तोडत होता, जनतेवर अत्याचार करत होता. या मागचा त्याचा उद्देश शिवाजी महाराजांना युद्धाच्या मैदानात खेचून आणणं हा होता. थंड डोक्याने योजना आखून त्याचा काटा काढणे आवश्यक होते. खरा युद्ध नेता हा युद्धाची वेळ आणि युद्धाचे ठिकाण स्वतः ठरवतो आणि त्याप्रमाणे शत्रूला त्या ठिकाणी आणतो. शिवाजी महाराजांनी युद्ध जावळीच्या आरण्यात होईल हे ठरवलं होतं. त्यांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जावळीच्या आरण्या पर्यंत यायला भाग पाडलं. आपण अफजलखानाला शरण येणार आहोत असं वातावरण तयार केलं. अफजलखानाला गाफील ठेवलं. आपण घाबरले असल्याचे भासवून अफजलखानानं शस्त्र आणू नये व कोणालाही सोबत आणू नये अशा प्रकारची अट घातली.
अफजलखानाचा पुरता विश्वास बसला कि शिवाजी शरण येणार आणि आपण शिवाजीच्या मुसक्या बांधून त्याला बडी साहेबा समोर उपस्थित करणार. तुम्ही शस्त्र आणू नका असं सांगून स्वतः मात्र वाघ नखं घालून गेले. जर तहच करायचा आणि शरणच जायचं तर मग त्यांनी चिलखत आणि जिरेटोप का घातला होता? जावळीच्या आरण्यात अफजलखानाचं सैन्य तळ ठोकून राहिलं होतं. या सैन्याला देखील हेतू पुरस्कार गाफील ठेवलं गेलं. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला मात्र जावळीच्या आरण्यात चारी बाजूनं दबा धरून बसायला सांगितलं होतं ते कशासाठी? आणि त्यांना हेही सांगितलं होतं की गडावरून तोफांचे आवाज आले की अचानकपणे या बेसावध सैन्यावर तुटून पडायचं. या सगळ्याचा अर्थच असा की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारायचं ठरवलं होतं, मारून झाल्यानंतर गडावरून तोफांचे आवाज करायचे. आवाज ऐकून मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर तुटून पडायचे आणि प्रतिकार करायची संधी न देताच त्या सैन्याला पळवून लावायचे. वर्तमान परिभाषेत बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांनी अफजलखानावर सर्जिकल स्ट्राइकच केला. पण आधी वार आम्ही करणार नाही हीच आपली मानसिकता विकसित केल्यामुळे अफजलखानाने विश्वासघात केला असं आपल्याला शिकवलं गेलं. मला तर असं वाटतं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला विश्वासघात करायची संधीच दिली नाही.
आरमार.
शिवाजी महाराज हे त्या काळातील एकमेव असे राजे होते ज्यांनी आरमाराचें महत्व ओळखलं होतं. त्यांनी प्रयत्नपूर्वक आरमार उभं केलं. युद्धनौका बांधण्याची कला आपल्याकडच्या लोकांना अवगत नव्हती. त्यामुळे त्यांनी हुशारीने इंग्रज आणि पोर्तुगीज आरमारातल्या लोकांना अधिक वेतन देऊन युद्धनौका बांधण्यासाठी स्वतःच्या आरमारात घेतलं. त्याचवेळी त्यांना याचीही कल्पना होती की ईस्ट इंडिया कंपनी या लोकांवर कारवाई करेल आणि त्याना परत बोलावून घेईल. त्याच्या आतच आपल्या लोकांना युद्ध नौका बनवण्याची कला अवगत झाली पाहिजे. आणि ते त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीतून आणलेले लोक परत जायच्या आधी पूर्ण केलं. आरमाराच्या आधारावर संपूर्ण पश्चिम किनारा विदेशी आरमारा पासून सुरक्षित केला. विदेशी आरमाराला आपल्या किनाऱ्यापर्यंत येण्यापासून यशस्वीपणे रोखलं.
या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी सागर किनारा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अनेक सागरी किल्ले देखील बांधले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी उंदेरी असे अनेक सागरी दुर्ग त्यांनी बांधले. त्या काळातले ते असे पहिले राजे होते की ज्यांनी सागरी सत्तेचं महत्त्व ओळखलं होतं.
घरवापसी.
महाराज काळाच्या पुढे विचार करत असत आणि तो विचार अमलातही आणत असत. एकेकाळी शिवाजी महाराजांचे सरसेनापती असलेले नेताजी पालकर काही कारणामुळे आदिलशहाला आणि त्यानंतर मोगलाना जाऊन मिळाले. मोघलांच्या सेवेत असताना त्यांचं धर्म परिवर्तन करून त्यांचं नाव मोहम्मद कुली खान असं ठेवण्यात आलं. पण म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना दूर लोटलं नाही. त्यांना पुन्हा स्वराज्यात आणलं आणि त्यांची घरवापसी करून घेतली. आजच्या काळामध्ये घरवापसीचा विषय हिंदू समाजाने स्वीकारला असला तरी साडेतीनशे – चारशे वर्षांपूर्वी अशा प्रकारची घरवापसी करून घेणे हे एक मोठं क्रांतिकारी काम होतं. शिवाजी महाराजांनी ते केलं. विशष म्हणजे या विधीचं पौरहीत्य देखील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांनी केलं. महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी नेताजी पालकारांशी सोयरीक केली. नेताजींचा पुत्र जानोजी यांच्याशी आपली कन्या कमलाबाई हिचा विवाह करून दिला. बजाजी निंबाळकर यांना देखील आदिलशहाने पकडून जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावला होता. त्यांचीही घर वापसी केली आणि त्यांच्याशी देखील सोयरीक साधली. स्वतःची कन्या सखुबाई हिचा विवाह बजाजींचे पुत्र महादजी यांच्याशी विवाह लावून दिला.

देशद्रोहाला क्षमा नाही.
शिस्तीच्या बाबतीत शिवाजी महाराज अत्यंत कठोर होते. स्वराज्याशी इमान, स्वराज्याची सुरक्षा याबाबत त्यांना कोणतीही तडजोड मान्य नव्हती. खंडोजी खोपड्यानं गद्दारी केली. पन्हाळगडाच्या संकटाच्या वेळी आदिलशहाला जाऊन मिळाला. महाराजांनी त्याला देह दंडाची शिक्षा द्यायचं ठरवलं होतं. खंडोजी खोपडे याने कान्होजी जेधे यांच्यामार्फत रदबदली केली. कान्होजींचे स्वराज्यातील स्थान आणी त्यांचे वय लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी खंडोजीला देहांताची शिक्षा देणार नाही असं त्यांना आश्वासन दिलं. पण नंतर खंडोजीला एक दिवस गडावर बोलवून घेतलं आणि त्याचा एक हात आणी एक पाय कलम केले. यामुळे कान्होजी नाराज झाले तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना देखील हेच सांगितलं की देहांताची शिक्षा देणार नाही असं आश्वासन मी तुम्हाला दिलं होतं त्यामुळे खंडोजीला जीवे मारलं नाही. पण त्याच वेळी स्वराज्याशी बेईमानी केली तरी कोणाची तरी चांगली ओळख असेल तर आपली सुटका करून घेता येते असेही कोणाला वाटता कामा नये. जो स्वराज्याशी बेईमानी करेल त्याला शिक्षा मिळणारच, हाच संदेश स्वराज्यात सगळीकडे जाणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याचा एक पाय आणि एक हात कलम केला. कान्होजी जेथेंचे देखील या भूमिकेमुळे समाधान झाले.
‘महाराज’ ही भूमिका निभावणं सोपं नसतं.
‘छत्रपती शिवाजी महाराज’ ही भूमिका निभावणं हे सोपं काम नाही. अत्यंत कठोरतेने आणि संयमाने ही भूमिका निभावावी लागते. जेव्हा एखादा विजय मिळतो तेव्हा रयतेमध्ये आणि सैन्यामध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण संचारतं. पण राजांनी मात्र आनंदात मशगूल होऊन चालत नाही. मिळालेल्या विजयाच्या आधारावर पुढल्या योजना आखून त्या कशा सफल करायच्या याचा विचार करण्याची हीच वेळ असते. कधीतरी एखादा पराभव होतो. त्यावेळेला रयतेत आणि सैन्यात निराशेची, पराभवाची भावना निर्माण होते. अशा वेळी पराभवाच्या छायेतून आपल्या प्रजेला आणि सैन्याला बाहेर काढून पुन्हा त्यांना कामासाठी प्रेरित करण्याचं काम हे राजांनाच करावं लागतं. त्यांनी निरुत्साही होऊन चालत नाही. आपल्या राजाचा राज्याभिषेक होणार म्हणून सगळी प्रजा आनंदात असताना शिवाजी महाराजांना आठवतात ते बाजीप्रभू, मुरारबाजी, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, असे धारातीर्थी पडलेले अनेक वीर आणि प्रजा जेव्हा आनंदात असते तेव्हा महाराज मात्र आपल्या या साथीदारांच्या आठवणीने व्याकूळ होत असतात.
प्रशासन.
शिवाजी महाराजांनी एक भक्कम प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली. त्यांनी छापखाना उभा केला, टाकसाळ निर्माण केली, स्वतःची नाणी काढली, अष्टप्रधान मंडळ गठीत केलं आणि राज्य कसं चालवायचं याविषयी अनेक बारीक सारीक सूचना देखील त्यांना दिल्या. या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोककल्याणकारी राज्य केलं.
श्रीमंत योगी.
शिवाजी महाराजांचा स्वभाव हा मूलतः उपभोग घेण्याचा नव्हताच. त्यांचा स्वभाव समर्पण भावनेचा होता. श्रीशैलमला गेले तेव्हा त्यांना तिथल्या पवित्र वातावरणात वैराग्य आलं. सर्वकाही सोडून याच ठिकाणी आपण संन्यास घ्यावा अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. समर्थ रामदास गडावर आले असता त्यांनी समर्थांनाच आपली स्वराज्याची सनद अर्पण केली. हे राज्य, याचं वैभव हे मला नको, या वैभवाचा उपभोग मला नाही घ्यायचा असं त्यांनी समर्थां समोर आपलं मनोगत बोलून दाखवलं. तेव्हा समर्थांनी त्यांना म्हटलं तुम्ही राज्याचा उपभोग घेऊ नका, कर्तव्य म्हणून राज्य चालवा. एक जबाबदारी म्हणून तुम्ही हे राज्य चालवा. समर्थांनी शिवाजी महाराजांचं वर्णन ‘स्वराज्याचा उपभोग शून्य स्वामी’ असं केलं आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ असं म्हटलं.
भक्कम पाया.
शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा पाया विलक्षण भक्कम केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर हे राज्य गिळंकृत करायला औरंगजेब दख्खनला आला. त्यानं संभाजी महाराजांचं देखील बलिदान घेतलं. पण त्याला हिंदवी साम्राज्यावर ताबा मिळवता आला नाही. औरंगजेबाला उर्वरित आयुष्य दख्खनेतच घालवावं लागलं. तो दिल्लीला पुन्हा जाऊ शकला नाही. इथेच गाडला गेला. हे साम्राज्य नंतर अटक ते कटक पसरलं. एवढेच नाही तर दिल्लीचे सिंहासन देखील मराठ्यांच्या ताब्यात आलं. दिल्लीचा बादशहा हा नाममात्र राहिला.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, राज्याभिषेकाचा दिवस. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला आणि हिंदू समाजाच्या दृष्टीने देखील त्या काळातील परिस्थितीत हा परमोच्च बिंदू होता. शिवाजी महाराज राजे झाले. तीनशे वर्षाची कालरात्र संपली. हिंदूंना आपला स्वतःचा एक छत्रपती राजा प्राप्त झाला.
लेखक :- माधव गांगुर्डे.
साभार :- लोकवाहिनी वृत्तपत्र.
