HinduismNews

महाराष्ट्राची वारी परंपरा: भक्ती, समता आणि श्रद्धेचा अखंड प्रवाह

आषाढी कार्तिकी विसरू नका मज ।सांगतसे गुज पांडुरंग ॥ १ ॥
पतितपावन मी तो आहे खरा ।तुमचेनि बरा दिसतसे ॥ २ ॥
तुम्ही जाता गावा हुरहूर माझे जीवा ।भेटाल केधवा मजलागी ॥ ३ ॥
धावोनिया देव गळा घाली मिठी ।स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे ॥ ४ ॥
तिही त्रिभुवनी मज नाही कोणी ।म्हणे चक्रपाणी नामयासी ॥ ५ ॥

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात ‘वारी’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारकरी’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ सांगताना असे लक्षात येते की ‘वारी’ म्हणजे ठरावीक वेळी केलेली यात्रा किंवा प्रवाशांची टोळी होय. इतिहासकार कै. वि. का. राजवाडे यांच्या मते, ‘वारिः – री’ म्हणजे प्रवाशांची टोळी; यावरूनच ‘वारी’ हा शब्द रूढ झाला. जो नियमाने ही वारी करतो, तो ‘वारकरी’. या शब्दाच्या विशिष्ट अर्थाचा विचार केला तर महाराष्ट्रात जेजुरी किंवा गाणगापूर सारख्या इतर तीर्थक्षेत्री नियमाने जाणाऱ्यांसाठी व्यापक अर्थाने हा शब्द वापरता येत असला, तरी ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रवासात या शब्दाला एक विशिष्ट अनन्यसाधारण अर्थ प्राप्त झाला आहे. ‘वारकरी’ म्हटला की तो केवळ आणि केवळ ‘पंढरपूरचा वारकरी’ असाच अर्थ घेतला जातो आणि हा समज सर्वस्वी योग्य आहे.

वारकरी भक्ताची अंतर्बाह्य लक्षणे पाहता, संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांनी आपल्या अभंगांमधून ‘वारीकर’ या शब्दाचा गौरव केला आहे. संतांच्या वाङ्मयानुसार वारकऱ्याची बाह्य लक्षणे म्हणजे गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा (उटी), हाती शंख-चक्रादी शृंगार, गरुडटका आणि मोरपिसांचा कुंचा घेऊन मुखाने विठ्ठल नामाचा गजर करत निष्ठेने पंढरीची वारी करणे ही होत. तर अंतर्लक्षणे अशी की केवळ बाह्य वेशापेक्षा वारकऱ्याचे अंतःकरण महत्त्वाचे असते. त्याच्या मनात तीव्र वैराग्य असते, ज्यामुळे काम-क्रोधादी षड्विकारांना जिंकण्याचे सामर्थ्य त्याला लाभते. त्याच्या ठायी दया, क्षमा आणि शांती या सद्गुणांची संपन्नता असते. त्याचे हृदय सदैव भक्ती आणि प्रेमाच्या रसाने रसरसलेले असते आणि हा आनंद त्याच्या सर्व इंद्रियांतून ओसंडून वाहत असतो.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लाखो वारकरी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराकडे पायी चालत जातात, ही परंपरा सातशे-आठशे वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू आहे. जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत जुन्या सामूहिक पायी यात्रांपैकी ही एक मानली जाते. दरवर्षी सुमारे दहा ते वीस लाख वारकरी या यात्रेत सहभागी होतात, आणि हा आकडा सतत वाढत आहे.

पंढरपूर आणि विठ्ठल दैवताची प्राचीनता..

pandharpur
pandharpur

पंढरपूर आणि विठ्ठल दैवताची प्राचीनता अभ्यासताना समजते की ज्ञानेश्वरपूर्व काळातही विठ्ठल हे दैवत अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध आणि सर्वमान्य होते, याचे अनेक ऐतिहासिक, पुरातात्विक आणि साहित्यिक पुरावे मिळतात. आद्य शंकराचार्य (८ वे शतक) यांच्या काळाचा विचार केला तर शृंगेरीमठाने अधिकृत मानलेल्या आद्य शंकराचार्यांच्या प्रसिद्ध ‘पांडुरंगस्तोत्रात’ (“महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं…”) पांडुरंग आणि पुंडलीक यांचा स्पष्ट उल्लेख येतो. यावरून ८ व्या शतकात विठ्ठलभक्ती पूर्ण वैभवात होती हे सिद्ध होते. तसेच पंढरपूरच्या अस्तित्वाचा सर्वात जुना लेख राष्ट्रकूट ताम्रपट (इ.स. ५१६) चा असून तो म्हैसूर सरकारच्या पुराभिलेख (Archaeology) खात्याच्या १९२९ च्या अहवालात मिळतो. या ५१६ च्या ताम्रपटात राष्ट्रकूट राजा मानाङ्क याने ‘जयद्विट्ठ’ नावाच्या ब्राह्मणाला ‘पांडुरंगपल्ली’ (हल्लीचे पंढरपूर) या गावांसह इतर गावे दान दिल्याचा उल्लेख आहे.

शिलालेखीय पुरावे व लोकमान्यता पाहता होयसळ राजे आणि देवगिरीचे यादव राजे यांच्या काळात विठ्ठलाला मोठ्या प्रमाणावर देणग्या व दाने दिली जात होती. इ.स. १२१४ च्या शिमोगा येथील एका लेखात विठ्ठलेशास दान दिल्याची नोंद आहे. तसेच, प्राचीन काळापासून आपल्या मुलांची नावे ‘विठ्ठल’, ‘विठ्ठद्विज’, ‘विठ्ठपय्या’ किंवा ‘विठ्ठरस’ ठेवण्याची पद्धत जुन्या काळापासून चालत आली होती. संत ज्ञानदेवांच्या वडिलांचे नावही ‘विठ्ठलपंत’ होते, जे या लोकप्रियतेचे प्रतीक आहे.

वारीचा ऐतिहासिक उगम

वारीच्या प्रथेचा इतिहास आणि प्राचीनता लक्षात घेता, वारीची प्रथा नेमकी कोणी सुरू केली याची निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी ती ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वी कित्येक वर्षे आधीपासून चालू होती याला भक्कम पुरावे आहेत. इ.स. १२४८ चा कानडी शिलालेख जो धारवाडजवळील हेळ्ळी गावी देवगिरीचा यादव राजा कन्हर (कृष्ण) याच्या काळातील आहे, त्या लेखात पंढरपूरच्या विठ्ठलदेवाच्या वारीच्या हरिदिनी (एकादशीला) अन्नदान किंवा धर्माचे काम करण्यासाठी ‘कलुवर सिंग गाउंड’ याने जमीन किंवा उत्पन्नाची व्यवस्था (वृत्ती) करून दिल्याची स्पष्ट नोंद आहे. हा लेख ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या २७ वर्षे आधीचा आहे.

संतांचे साक्षित्व तपासले तर संत नामदेवांच्या गाथेतील उल्लेषांनुसार, ज्ञानेश्वरांचे आजे सिधोपंत यांनी विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या विवाहानंतर त्यांना कुलदैवत विठ्ठलाच्या दर्शनास नेले होते, तेव्हा पंढरपुरात मोठी यात्रा भरली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे नियमितपणे पंढरपूरला जात असत, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. यावरूनच वारीच्या प्रथेचा प्रारंभ झाला असे मानले जाते. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्याही आधीपासून विठ्ठल भक्त पंढरपूरला जात असल्याचे उल्लेख आढळतात. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांतून भागवत धर्माचा पाया घातला, आणि त्यांच्यामुळेच वारकरी संप्रदायाला एक सुसंघटित तात्त्विक अधिष्ठान मिळाले.

varkari
varkari

पुढे सतराव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा प्रसार अधिक व्यापक केला. सर्वसामान्य जनतेच्या भाषेत, त्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन तुकाराम महाराजांनी भक्तीचा सोपा मार्ग दाखवला.

या संपूर्ण जडणघडणीचे अत्यंत सुंदर आणि मार्मिक वर्णन संत बहिणाबाईंनी आपल्या एका प्रसिद्ध अभंगात केले आहे: –

संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ॥
तुका झालासे कळस । भजन करां सावकाश ॥
बहिणी म्हणे फडकतो ध्वजा । निरूपणा केलें बोजा ॥

संत तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी इसवी सन १६८५ मध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. ही घटना वारीच्या संघटित स्वरूपाची खरी सुरुवात मानली जाते.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला हैबतराव बाबा आरफळकर यांनी या यात्रेला सध्याचे शिस्तबद्ध स्वरूप दिले. हैबतराव बाबा हे शिंदे सरकारच्या पदरी असलेले एक सरदार होते आणि ते संत ज्ञानेश्वरांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी दिंड्यांची रचना, ठराविक वेळापत्रक, अश्वांचा सहभाग आणि मिरवणुकीची लष्करी शिस्त यांसारखे बदल घडवून आणले. त्यांच्यामुळेच आजची वारी एका सुव्यवस्थित, वेळापत्रकबद्ध यात्रेत रूपांतरित झाली.

लेखक :- प्रा. डॉ. प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी..

श्री विठ्ठल-रुख्मिणी..
श्री विठ्ठल-रुख्मिणी..
Back to top button