HinduismNews

अवघा रंग एक झाला.. भाग ४

“अवघा रंग एक झाला”.. या १९ भागाच्या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

सकल समाजाला भक्तिमार्गाकडे नेणारे संत निवृत्तीनाथ महाराज..

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होत. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय । गहिनीनाथें सोय दाख​विली।।’, असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हटले आहे.

निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले. संत निवृ​त्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू त्यांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी भगवतगीता सामान्य लोकांना सहज समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाला मानवतेचा, समतेचा संदेश देणारी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिहिली.

योग,अद्वैत आ​णि कृष्णभ​क्ति वर आधारित सुमारे चारशे अभंग व भक्तिरसाचे मूर्तस्वरूप असलेला “ह​रिपाठ” संत निवृत्तीनाथांची आपल्याला दैवी देणगी आहे. या अभांगातून समाजातील भेदाभेदावर प्रहार करताना ते म्हणतात..

निवृत्तिचा देव सर्व हा गोविंद । नाही भिन्न भेद विश्वी इये ।।

अर्थात :- सर्व जीवांमध्ये एकाच परमात्म्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे ‘मी-तू’, जात-पात, उच्च-नीच किंवा इतर भेदभावाचा त्याग करून समता, एकात्मता आणि बंधुभाव जोपासावा.

संत निवृ​त्तीनाथांची ख्याती ही माउली ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले’ असे निवृ​त्तीनाथांबद्दल सदैव म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संतमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच. निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीता टीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तीनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते.

संत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी आपला देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते.

संत निवृत्ती आले ज्ञान दाना । पावन केले तेणे जगी जीवना ।

भक्तिपंथ दिधले वैष्णव जना । धन्य धन्य निवृत्तीनाथा ।।

अवघा रंग एक झाला
अवघा रंग एक झाला
Back to top button